हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही कारणं आहेत का ?
उत्तर प्रदेशातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत लग्नाची वरात आहे. या वरातीत नवऱ्या मुलाचे मित्र आनंदात नाचायत. सगळं आनंदी वातावर आहे. तितक्यात एक मित्र जमिनीवर कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो.
मित्राचं वय फक्त ३२ वर्ष. त्याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.
खरंतर, मागच्या काही दिवसांत हार्ट अटॅकमुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय. विशेषत: तरुणांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय. अगदी १८ वर्षांच्या मुलांचासुद्धा हार्टअटॅकमुळं मृत्यू होतोय. अश्याच काही घटनांचे कॅमेरामध्ये कैद झालेले व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या व्हिडीओजला सोशल मीडियावर #HeartAttack असं कॅप्शन देऊन शेअर केलं जातंय.
हे व्हिडीओ शेअर करताना काहींचं असं म्हणणं आहे की, अचानक हार्टअटॅकचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत कोरोना आणि कोरोनाची लस आहे.
उत्तर प्रदेशमधल्या बरेलीमध्ये २३ वर्षीय शिक्षकाचा शाळेत प्रार्थनेवेळी झालेला मृत्यू, भर मंडपात नवरदेवाच्या गळ्यात माळ घालता घालता नवरीचा झालेला मृत्यू आणि आज समोर आलेला १८ वर्षीय तरुणाचा चालता चालता झालेल्या मृत्यूचा व्हिडीओ… हे सगळे आणि असे बरेच व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
पण अचानक हे असं का होतंय? तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढलंय?
तर, मुळातच इतरांपेक्षा भारतीयांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. त्याचं कारण म्हणजे सी एच जी ए प्रमोटर हॅप्लोटाईप नावाचा जनुक (Gene) असतो. हा जीन सर्वांमध्येच असतो पण भारतातील ३५-४०% भारतीयांमध्ये या जीनचं प्रमाण अधिक आहे. पण यामुळे हे लक्षात येत नाही की, अचानक भारतीय तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय. त्यामागे काही कारणं आणि तरुणांच्या काही चुकीच्या सवयी आहेत. बघुया काय आहेत ती कारणं…
१) मानसिक ताण आणि कमी झोप:
तरुणांमधील हार्ट अटॅकचा अभ्यास केला तर, लक्षात येतं की, हार्ट अटॅक आलेल्या तरुणांपैकी अनेक तरुण हे मानसिक त्रास असलेल्या क्षेत्रात काम करत असतात, शिवाय या तरुणांमध्ये काम करत असताना किंवा कॉलेमध्ये शिकत असतानाही तरुणांमध्ये टेन्शनमुळे झोपेचं प्रमाणही कमी असतं. कमी झोप आणि मानसिक ताण हे हार्ट अटॅकसाठी कारणीभुत ठरू शकतात.
२) व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार:
पुर्वीच्या काळापेक्षा आताच्या काळात शारिरीक त्रास नसलेल्या कामांची संख्या अधिक वाढलीय. याशिवाय बरीच तरुण मंडळी एकसलग काम करत असतात. यामुळे शारिरीक हालचाल किंवा व्यायाम अजिबातच होत नाही. एकाच जागी १०-१२ तास बसून राहणं हे ह्रदयासाठी त्रासदायक असतं. याशिवाय, कामाचा व्याप मोठा असल्यानं वेळेवर आहार न घेणं, जंक फूड खाणं या सवयी तरुणांना लागतात.
जेवणाची वेळ ठरलेली नसेल कधीही जेवण केलं जात असेल तर, त्याचा हृदयावर अतिशय विपरीत परिणाम होतो, तर पुर्वीसारखं घरचं पौष्टिक अन्न खाण्याचं प्रमाणही कमी होऊन जंक फूड तरुणांना अधिक आकर्शित करतंय.
३) व्यसन:
तरुणांमध्ये सिगरेट पिण्याचं आणि दारू पिण्याचं प्रमाणही वाढलंय. एका रीपोर्टनुसार, हार्टअटॅकमुळं मृत्यू झालेल्या ४ व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण हे सिगरेटचं सेवन करणं असतं. याशिवाय, दारु पिल्यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढतं. मागच्या १७ वर्षांमध्ये सिगरेटचं सेवन करणाऱ्या भारतीयांमध्ये ३३% वाढ झालीय. याशिवाय अनेक एनर्जी ड्रिंक्समध्येही कॅफेन आणि इतर काही असे पदार्थ असतात की, ज्यामुळे हृदयाला त्रास होतो. अगदी खूप जिम करणाऱ्या मुलांना सप्लिमेंट्स (प्रोटिन पावडर) घेतात. या सप्लिमेंट्सचं अतिसेवनसुद्धा हृदयासाठी हानिकारक असतं.
या कारणांशिवाय कोरोना किंवा कोरोनाच्या लसीमुळेही हार्टअटॅकची शक्यता वाढते अशी एक चर्चा आहे.
आता कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकची शक्यता आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण, कोरोना होऊन गेला असल्यास ही शक्यता वाढते. कोरोना व्हायरस शरीरातील रक्तवाहिन्यांवर हल्ला करत असल्यानं ही शक्यता वाढू शकते.
तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागची कारणं पाहिली तर, मूळ कारण हे, भारतीयांमधील जेनेटीक प्रॉब्लेम्स असल्यानं भारतीयांमधील हार्ट अटॅक समुळ नष्ट करणं शक्य नसलं तरी, सिगरेट, दारूच्या सेवनावर नियंत्रण आणून, वेळेवर आणि योग्य आहार घेऊन आणि मानसिक ताण कमी करून हे प्रमाण कमी करता येऊ शकतं, असंही सांगण्यात येतंय.
हे ही वाच भिडू:
- एखाद्याला अचानक हार्ट अटॅक, कार्डिॲक अटॅक आला तर काय करायचं?
- या रिसर्चनुसार, कोरोनानंतर अमेरिकेतल्या लोकांनी भारताची “एकत्र कुटूंबपद्धती” स्वीकारली
- सगळ्यात गाजलेल्या हार्ट स्पेशालिस्टला पण बाळासाहेबांच्या ऑपरेशनवेळी भीती वाटलेली…