जागतिक श्रीमंतांच्या यादीत कधीच रतन टाटा यांचं नाव का येत नाही ?

जगातल्या टॉप ५ श्रीमंतांच्या पंगतीत भारतातल्या अनेक उद्योगपतींची नावं येत असतात.  दर पंधरा दिवसाला ही श्रीमंत लोकांची आकडेवारी येते आणि त्याच्यात भारतीय नावं कितव्या नंबरला याची बातमी होते.

अंबानी-अदानी हे दोन गडी या बातम्यांमध्ये कॉमन असतात, त्यामुळं सारखी सारखी त्यांची नावं वाचून एक प्रश्न पडला की, हे अंबानी आणि अदानींचं ठीक आहे पण रतन टाटांचं नाव श्रीमंतांच्या यादीत का येत नाही ? म्हणजे एअर इंडियापासून पार ताज हॉटेलपर्यंत सगळं टाटांचंच आहे, कंपन्या पण लई आहेत. पण मग नाव अडतंय कुठं?

उत्तर जाणून घ्यायला इतिहास ते वर्तमान अशी सगळी माहिती घ्यावी लागेल.

हा माणूस लय श्रीमंत आहे, हे कसं ठरतं ? तर उगा वर्षाला दोन फोन, नव्या गाड्या, बायकोला गंठण करत असला तर आपण म्हणतो की हा बाबा आहे श्रीमंत.

पण जगातल्या श्रीमंत लोकांची यादी काढणाऱ्या फोर्ब्सचा विषय असा नसतो. ते नेटवर्थ मोजताना प्रॉपर्टी, वस्तू वगैरे मोजतात पण एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे स्वतःच्या नावावर असलेल्या कंपन्यांमधली शेअरहोल्डिंग कपॅसिटी.

सोप्या शब्दात सांगतो, माझी स्वतःची एक लिस्टेड कंपनी आहे, ज्याच्या १०० शेअर्सपैकी ५० शेअर्स पब्लिकचे आहेत आणि माझ्या नावावर ५० शेअर्स आहेत, याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनमधले निम्मे पैशे माझ्याकडे आहेत, साहजिकच माझं नाव श्रीमंतांच्या यादीत येऊ शकतंय. आता हेच माझ्या नावावर फक्त ५-६ शेअर असतील तर माझं नाव गिणतीत पण येत नसतंय.

टाटांचं नाव श्रीमंतांच्या यादीत न येण्याचं कारण समजून घेताना आपल्याला थोडा इतिहास समजून घ्यावा लागतोय.

टाटांच्या बिझनेस साम्राज्याची सुरुवात झाली जमशेदजी टाटा यांनी उभारलेल्या कॉटन मिलपासून. अगदी पहिल्या व्यवसायापासून टाटांनी कामगारांचं हित जोपासलं आणि लोकांची सेवा करत एक संस्था म्हणून बिझनेस वाढवणं हे तत्व जपलं. बँगलोर, जमशेदपूर सारखी शहरं उभारणं, पॉवर, आयर्न, एअरलाईन्स, हॉटेल्स अशा व्यवसायांसोबतच चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारणं यातून टाटांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्याप्रमाणं काम केलं. पण या सगळ्याचा स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला फायदा करुन देण्यापेक्षा टाटांनी हा पैसा स्वतः उभारलेल्या ट्रस्टच्या ताब्यात दिला.

सर दोराबजी टाटा ट्रस्ट, टाटा एज्युकेशन ट्रस्ट, टाटा मेमोरियल हॉस्पिटल या माध्यमातून त्यांनी समाजकार्य करण्यावर भर दिला. सुरुवातीपासून टाटांनी हाच सामाजिक उत्तरदायित्वाचा फॉर्म्युला जपला आणि रतन टाटांनी हा फॉर्म्युला आजही जपलाय.

टाटा सन्स ही टाटांची मूळ कंपनी. रतन टाटा हे या कंपनीचे एकेकाळचे सर्वेसर्वा. टाटा समुहाच्या एकूण २९ लिस्टेड कंपन्या आहेत, ज्यांचं एकत्रित मार्केट कॅपिटलायझेशन जातं ३२० बिलियन डॉलर्सपर्यंत.

पण यातला मोठा वाटा आहे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा यांचा. सर दोराबजी टाटा ट्रस्टकडे टाटा समूहाचे सर्वाधिक २७.९ टक्के शेअर्स आहेत, तर सर रतन टाटा ट्रस्टकडे २३.५ टक्के शेअर्स आहेत. आरडी टाटा ट्रस्टकडे २.१ टक्के, टाटा सोशल वेलफेअर ट्रस्ट आणि टाटा एज्युकेशन ट्रस्टकडे प्रत्येकी ३.७ टक्के, जेआरडी टाटा ट्रस्टकडे ४ टक्के शेअर्स आहेत. ही ट्रस्टची आकडेवारी सांगायचं कारण म्हणजे, स्वतः रतन टाटांकडे टाटा समूहाचे ०.८ टक्के शेअर्स आहेत.

थोडक्यात काय तर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य हेच टाटांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे.

त्यामुळेच टाटा ग्रुपचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स सामाजिक कार्य करणाऱ्या ट्रस्टच्या नावावर आहे. ३२० बिलियन डॉलर्सपैकी ०.८ टक्क्यांचं गणित लावलं की आपल्याला वर दिलेल्या संदर्भाचं स्पष्टीकरण मिळतं आणि १ बिलियन नेटवर्थ असणाऱ्या रतन टाटांचं नाव श्रीमंतांच्या यादीत का येत नाही हे सुद्धा समजतं.

आता ही झाली नाण्याची पहिली बाजू. दुसरी बाजू आहे अंबानी आणि अदानी या दोघांची. आपले मुकेशभाई म्हणजे रिलायन्स समूहाचे बादशहा. बिझनेस स्टॅण्डर्डच्या वृत्तानुसार रिलायन्स समूहाचं मार्केट कॅपिटलायझेशन जातं १९५ बिलियन डॉलर्सपर्यंत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण शेअर्सपैकी ४९.१४ टक्के शेअर्स अंबानी कुटुंबाच्या नावावर आहेत. त्यामुळेच अंबानींचं नेटवर्थ जवळपास ९५ बिलियन डॉलर्सपर्यंत जातं.

दुसरे आहेत गौतम अदानी. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतरच्या नुकसानादरम्यान अदानी ग्रुपचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे १८३ बिलियन डॉलर्स. अदानी एन्टरप्राइझेस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन्समध्ये गौतम अदानींचे ७५ टक्के शेअर्स आहेत. अदानी टोटल गॅसमध्ये ३७ टक्के, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ६५ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ६१ टक्के शेअर्सही अदानींचे आहेत. त्यामुळं गौतम अदानींचं नेटवर्थ आहे ८४.४ बिलियन डॉलर्स.

एका बाजूला अंबानींचे आपल्या कंपनीत ४९ टक्के शेअर्स आहेत, तर अदानींचे ७५ टक्के. दुसऱ्या बाजूला टाटांचे स्वतःच्याच कंपनीत ०.८ टक्के शेअर्स आहेत. 

जर टाटांचे अंबानींप्रमाणे टाटा समूहात ४९ टक्के शेअर्स असते, तर त्यांचं नेटवर्थ १५६.८ बिलियन डॉलर्स झालं असतं म्हणजे ते सहज अदानींपेक्षा श्रीमंत झाले असते आणि अदानींसारखे ७५ टक्के शेअर्स असते, तर टाटांचं नेटवर्थ असतं २४० बिलियन डॉलर्स.

म्हणजे अंबानी आणि अदानी या दोघांपेक्षाही लय श्रीमंत व्हायचा चान्स रतन टाटांकडे आहे, मात्र टाटा समूहाचे नियम, सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्याला वाहून घेतलेल्या ट्रस्टचं महत्त्व ओळखून असणारे रतन टाटा या रेसमध्ये काही येत नाहीत. एकदा रतन टाटांनाच एक प्रश्न विचारण्यात आला, अंबानी एवढे श्रीमंत आहेत मग तुम्ही का नाही ? टाटा म्हणाले,

‘दे आर बिझनेसमन अँड वी आर इंण्ड्रस्ट्रिऍलिस्ट.’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.