यंदाची प्रजासत्ताक दिनाची परेड या गोष्टींमुळे आतापर्यंतच्या परेडपेक्षा वेगळी ठरली…

कर्तव्य पथ इथे आज ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख पाहूणे असलेले इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

इजिप्तच्या सशस्त्र दलाने यंदा परेडची सुरूवात केली. इजिप्तच्या दलातील १४४ जवानांची तुकडी यात सहभागी होती. इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या प्रमुख शाखांचं प्रतिनिधित्व करत त्यांनी मार्च केला.

यंदाच्या परेडमधलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे, सेंट्रल रिझर्व्ड पोलीस फोर्समधील सर्व महिलांच्या एका तुकडीने केलेला मार्च. नौदलासह इतर अनेक मार्चिंग तुकड्यांमध्ये महिलांचा समावेश होता. एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील नौदल तुकडीमध्ये ३ महिला आणि ६ अग्निवीर म्हणजेच नवीन सशस्त्र दल भरती योजनेच्या पहिल्या तुकडीतले सैनिक होते.

आत्मनिर्भर भारतच्या पार्श्वभुमीवर विशेष प्रयोजन केलं होतं.

शस्त्रांच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर आहे हे दाखवण्यासाठी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय बनवाटीची शस्त्र होती. विशेष म्हणजे, यंदा रशियन टँक्स न वापरता भारतात बनवलेले अर्जून सारखे टँक्स होते.

शिवाय आकाश ही भारतीय बनावटीची मिसाईल सिस्टीमसुद्धा दाखवण्यात आली. आत्मनिर्भरतेचा संदेश देण्यासाठी हे करण्यात आलं.

वंदे भारतम् ही नृत्य स्पर्धा सुद्धा खास होती.

संपुर्ण देशभरातून ४७९ डान्सर्स या वंदे भारतम नृत्य स्पर्धेसाठी निवडले गेले होते. त्या ४७९ कलाकारांनी कला सादर केली. विशेष म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेसाठी संपुर्ण देशातून कलाकार निवडण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे.

मोटरसायकल वरील प्रदर्शनही आकर्षण ठरलं.

कॉर्प्स ऑफ सिग्नल्सच्या डेअर डेव्हिल्स संघाने मोटारसायकल वरचं प्रदर्शन सादर केलं. हे करत असताना विविध आकृत्या साकारत त्यांनी प्रेक्षकांना रोमांचित केलं. सर्वात जास्त रोमांचित केलं ते त्यांच्या योग प्रदर्शनाने.

शिवाय, ज्या लहान मुलांना शौर्य, कला आणि संस्कृती, क्रीडा, नवोपक्रम आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो ती मुलंही यावेळी उपस्थित होते आणि ते सुद्धा परेडमध्ये सहभागी होते.

दरवर्षीचंच खास आकर्षण असतं ते म्हणजे फ्लायपास्ट म्हणजेच हवाई दलाकडून केला जाणारा एअर शो.

या शोमध्ये ४५ विमांनांचा सहभाग होता. भारतातल्या अगदी सगळ्यात आधुनिक विमानापासून ते व्हिंटेज विमानापर्यंत विमानांचा या शोमध्ये सहभाग होता. या एअर शोची मजा कमी झाली ती धुक्यामुळे. धुकं असल्यामुळे आपल्या हवाई दलाने सादर केलेला एअर शो तितकासा स्पष्टपणे दिसू शकत नव्हता.

देशाच्या नव्या राफेल विमानांचाही या शोमध्ये सहभाग होता. खरंतर मागच्या दोन वर्षांपासूनच राफेलचा या परेडमध्ये सहभाग केला जातो.

विशेष म्हणजे ही परेड बघण्यासाठी यंदा देशातील विविध ठिकाणांवरून सामान्य लोकांना बोलवण्यात आलं होतं.

यामध्ये कर्तव्यपथ, संसदेची नवीन इमारत हे बांधण्यासाठी काम केलेले लोक, दूध विक्री करणारे लोक, भाजी विक्रेते शिवाय रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक अशा लोकांना देशभरातून बोलवण्यात आलं होतं.

या लोकांना गॅलरीमध्ये विशेष स्थान दिलं गेलं होतं.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात एकूण २३ चित्ररथ सहभागी झाले होते. यातले १७ हे विविध १७ राज्यांचे चित्ररथ होते तर, ६ चित्ररथ हे ६ मंत्रालयांचे होते. भारताचा सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचं चित्रण या सर्व चित्ररथांकडून करण्यात आलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.