राष्ट्राध्यक्ष ओबामाच्या पण आधी द रॉकला कळलेलं, “लादेनचा गेम झालाय”

१ मे २०११ रोजी अंदाजे २ वाजेच्या सुमारास अमेरिकेच्या सैन्य दलांनी अल कायदा या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या दहशतवादी तळावर हल्ला केला. या हल्ल्याच्या चाळीस मिनिटांनी ओसामा बिन लादेन मरण पावल्याचं स्पष्ट झालं.

त्यानंतर तासाभराने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना अधिकृतरीत्या माहिती मिळाली कि, लादेनला ठार करण्याच्या मोहिमेत आपल्या फौजेला यश आले आहे. अमेरिकेत संध्याकाळी सातच्या सुमारास ओसामा बिन लादेन ठार झाल्याचं वृत्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देशाला भाषणातून सांगणार होते. आणि सकाळी ११: ३० वाजता हि ऐतिहासिक बातमी टीव्ही माध्यमांवर दाखवली जाणार होती.

इथपर्यंत सगळं क्लियर आहे. पण यात एक खतरनाक ट्विस्ट आला आणि हा ट्विस्ट आणणारा भिडू होता द रॉक.

द रॉक हा जरी जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय असला तरी त्याची थोडक्यात माहिती बघू-

त्याचं मूळ नाव ड्वेन जॉन्सन आहे. मूळचा कालिफोर्नियाचा. त्याचे वडील रॉकी जॉन्सन हे एक प्रोफेशन रेसलर होते. त्याच्या आई वडिलांच पटत नसल्यामुळे तो वाढला न्यूझीलंडला आपल्या आजोळी. पुढे शाळेच्या निमित्ताने अमेरिकेला परत आला. कित्येक शाळा बदलल्या. प्रत्येक ठिकाणी याची भांडण व्हायची. 

तो अभ्यासात सोसो असला तरी खेळात त्याला प्रचंड गती होती. न्यूझीलंड मध्ये रग्बी शिकला, अमेरिकेच्या शाळेत फुटबॉल, रनिंग, लांब उडी अशा सगळ्या खेळात भाग घ्यायचा.

वयाच्या सतराव्या वर्षीं पर्यंत चोरी, मारामारी, धमकावणे अशा अनेक कारणांनी त्याला जेल मध्ये देखील जाऊन यावं लागलं होतं. पण लवकरच गडी शहाणा झाला. कॉलेजला ऍडमिशन घेतलं. स्पोर्ट्स कोट्याच्या स्कॉलरशिप वर शिकला. तिथे युनिव्हर्सिटीच्या फुटबॉल टीमकडून चांगलाच चमकला.

कर्मींची सायकोलॉजी वर त्याने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.पण खेळातच करियर करायचं त्याच्या डोक्यात पक्के होतं. फुटबॉल टीममध्ये देखील त्याची निवड झाली होती. पण अखेर त्यानं निवडलं कुस्तीला. ते हि WWE कुस्ती.

आपण लहानपणी ज्याचे डायहार्ड फॅन होतो त्या तेव्हाच्या WWF मध्ये जॉन्सन प्रोफेशन रेसलर म्हणून उतरला.

खरं तर त्याच्या घरात WWFची जुनी परंपरा होती. त्याचे आजोबा हे या स्पर्धेत खेळणाऱ्या देशातल्या पहिल्या कृष्णवर्णीय पहिलवानांपैकी एक होते. त्यांचा वारसा चालवण्यासाठी ड्वेन देखील स्पर्धेत उतरला. तयच सुरवातीचं रिंग मधलं नाव वडिलांच्या व आजोबांच्या नावावरून रॉकी मालविया असं ठेवण्यात आलं होत. पण पुढे त्याने ते बदलून द रॉक असं केलं.

द रॉक हा WWE म्हणजे आपल्याकडचं डब्ल्यू डब्ल्यू एफ या हाणामारीच्या कार्यक्रमात सगळ्यात खतरनाक खेळाडू होता. जबरदस्त बॉडी, खांद्यावर आणि छातीवर अक्राळविक्राळ टॅटू आणि टक्कल असा लूक असणारा द रॉक WWE च्या रिंगमध्ये एकेकाळी बॉस होता.

त्याच्यासमोर कितीही खंदा खेळाडू येऊ द्या हा गडी त्याला बदडून बदडून हरवणार म्हणजे हरवणारचं. त्याच्याइतकी दहशत WWE मध्ये कदाचितच कोणाची असेल.

भुवया वर करून आपल्या खास स्टाईलमध्ये त्याची सिग्नेचर पोझ प्रचंड गाजायची. WWF होत तेव्हा पासून ते WWE पर्यंत या स्पर्धेतले बरेचशे टायटल तो जिंकलादेखील. WWE चॅम्पियनशिपचा तो बराच काळ विजेता होता. सलग दोन वर्षे तो अपराजित होता आणि टायटल त्याने राखून ठेवलं होतं. द रॉक हा पहिला असा WWE खेळाडू होता कि ज्याला जगातलं सगळ्यात मोठं सुपरस्टार स्टारडम लाभलं.

पुढे वाढती लोकप्रियता पाहून त्याने WWE ला रामराम ठोकला आणि तो हॉलीवूडकडे वळला. WWE शी करार तोडूनही तो रिंगमध्ये खास पब्लिकच्या मनोरंजनासाठी, त्याच्या चाहत्यांसाठी यायचा.  हॉलिवूडमध्ये सुद्धा त्याने आपल्या ग्लॅमरची जादू दाखवली. अभिनेता म्हणून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा तो पहिला सुपरस्टार होता.

द ममी रिटर्न्स या चित्रपटातून त्याने अधिकृतरीत्या पदार्पण हॉलिवूडमध्ये केलं. द स्कॉर्पिओन किंग, द रनडाऊन, वॉकिंग टॉल, जुमानजी अश्या अनेक हिट चित्रपटांतून तो झळकत राहिला. हॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याचं कारण म्हणजे त्याला WWE मुळे लाभलेली अफाट प्रसिद्धी. तर हे झालं द रॉकचं थोडक्यात वर्णन.

परत आपल्या मूळ मुद्यावर येऊ. भारतीय वेळेनुसार २ मे २०११ रोजी सकाळी ७.४५ वाजता म्हणजे अमेरिकेच्या १ मे च्या संध्याकाळच्या साधारण ७ वाजता द रॉकने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून एक ट्विट टाकलं.  

या ट्विट मध्ये रॉक म्हणत होता की त्याला नुकतीच एक बातमी कळली आहे जी ऐकून सगळं जग हादरून जाईल. शूरांचा देश..अमेरिकन असल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतोय.

रॉकच्या फॉलोवर्सना काही कळलं नाही. सगळ्यांनी त्याला लाईक केलं, रिट्विट केलं. काय तर मोठं असणार याची सगळ्यांना खात्री होती. कोण म्हणाल तो पाळ्या नवीन पिक्चरचं प्रमोशन करत असेल. पण तस नव्हतं.

साधारण तासाभरात तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केलं कि अमेरीकन स्पेशल सील कमांडोंच्या टीमने पाकिस्तानमधल्या अबोटाबॅड मध्ये घुसून खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा खातमा केला आहे.

आता प्रश्न उभा राहिला की द रॉकने ओबामाच्या अगोदर ओसामा बिन लादेन मेल्याची न्यूज डिक्लेर केली होती. या घटनेबद्दलच ट्विट त्याने केलं पण त्यात लादेनच्या नावाचा उल्लेख टाळत त्याने अमेरिकन असल्याचा गर्व आहे असा उल्लेख केला होता.

त्यावेळी द रॉक अशा विषयांवर बोलत नसला तरी त्याच हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड गाजलं. रॉक ला हि गोपनीय माहिती कशी कळली हा प्रश्न जगापुढे पडला होता. 

विशेषतः अमेरिकेत त्याच्या या ट्विटवर बराच गदारोळ झाला.काहीजणांनी असं सांगितलं कि ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी जी सील कमांडोंची टीम पाकिस्तानला गेली होती त्यात रॉकचा चुलतभाऊ होता. त्याने हि माहिती रॉकला पुरवली असणार असा अंदाज वर्तवला जाऊ लागला.

इतर लोकांनी सांगितलं कि अमेरिकेच्या संरक्षण आणि गृहखात्याचे ट्विट द रॉकने जसेच्या तसे छापले. पण हे शक्य नव्हतं कारण सगळ्यात आधी द रॉकने ट्विट केलं होतं आणि लादेन मेल्याचं जगभर कोणालाही माहिती नव्हतं.

हि बातमी सार्वजनिक होण्यापूर्वी केवळ रॉकलाच माहिती होती यात काहीतरी काळंबेरं असल्याचं सगळीकडून बोललं जाऊ लागलं.

पण त्याच्या फॅन्सच म्हणणं होतं कि,

द रॉकने ट्विट अगोदर केलं काय आणि ओबामांनी अधिकृतरीत्या सांगितलं काय फरक काहीच पडणार नाही , सध्या सगळ्यात महत्वाचं आहे लादेन मेलाय आणि सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास टाकलाय.

आज जवळपास दहा वर्षे झाली. मधल्या काळात दोन ओबामा जाऊन ट्रम्प तात्या आले, ते हि गेले आणि ज्यो बायडेन नाना आलेत. पण अजूनही द रॉक च्या आत्या ट्विटच गूढ उकललेलं नाही. अनेक जण म्हणतात तो आता राजकारणात येतोय, पुढच्या काही वर्षात राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक देखील लढवेल. बघू रॉकच्या भविष्यवाणीत काय काय दडलेय ते.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.