बोल्ड झालेल्या सचिनने त्याला लिहून दिलं, “असं पुन्हा कधीही होणार नाही.”
सध्या भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. या दोन्ही संघातील सामने नेहमीप्रमाणे चुरशीची होताना दिसत आहेत. एखादे महायुद्ध खेळल्याप्रमाणे अटीतटीने दोन्ही बाजू लढत आहेत. यातूनच कधी एकमेकाला स्लेजिंग करणे, खुन्नस दाखवणे हा प्रकार चालू आहे.
ही आजकालची गोष्ट नाही. ऑस्ट्रेलियन्स सुरवातीपासून अशा गोष्टी करताना दिसतात. मात्र पूर्वीचे खेळाडू त्यांना उत्तर आपल्या कृतीतून देत असतं.
हि घटना आहे २००७ सालची.
भारताने नुकताच धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. लगेच ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आली होती. या सिरीजमध्ये पहिल्यांदाच धोनीला वनडे टीमचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचं नेतृत्व करण्याची धोनीवरची ही पहिलीच वेळ होती.
त्यावर्षीचा वनडे वर्ल्ड कप जिंकलेली रिकी पॉन्टिंगची ऑस्ट्रेलियन टीम प्रचंड फॉर्ममध्ये होती. भारताला त्यांच्याच भूमीत हरवून आपणच खरे विश्वविजेते आहोत हे दाखवण्यासाठी ऑस्ट्रेलियन्स उत्सुक होते. पहिल्याच मॅच पासून त्यांनी हे सिद्ध करण्यास देखील सुरवात केली.
बेंगलोरमधली पहिली मॅच पावसामुळे वाया गेली मात्र त्यात क्लार्कच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व दाखवून दिल होतं. दुसऱ्या मॅचमध्ये तर त्यांनी सरळ विजय मिळवला. सिरीजमध्ये टिकून राहायचं असेल तर भारताला यात काहीही करून विजय मिळवणे गरजेचे होते.
भारतीय टीमला सगळ्यात जास्त चिंता सतावत होती ती सचिनच्या खराब फॉर्मची.
जगातला सर्वोत्कृष्ट समजला जात असणारा हा बॅट्समन अतिशय बॅडपॅच मधून जात होता. वनडे वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी खराब झाली होती. त्यातच या सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात डक वर आउट झाला होता. दुसऱ्या सामन्यात देखील चमकदार कामगिरी करता आली नव्हती.
सचिन आता संपला त्याने आता रिटायर झाले पाहिजे अशी चर्चा तेव्हा जोरात सुरु होती.
तिसरी वनडे हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होत होती. पॉंटिंगने टॉस जिंकून पहिली बॅटींग निवडली. सायमंड्स, हेडन,क्लार्क यांनी केलेल्या शानदार इनिंगमुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोर २९० इतका झाला. घरच्या मैदानात हा स्कोर आपल्यासाठी अवघड नव्हता.
मात्र भारतीय टीमने पुन्हा कच खाल्ली. गौतम गंभीर सुरवातीला स्वस्तात आउट झाला. त्याच्या मागोमाग उथ्थपा आणि द्रविड दोघेही शून्य धाव काढून आउट झाले. भारताची स्थिती ३ बाद १३ अशी झाली. आपण मॅच हातातून घालवली आहे यावर शिक्का मोर्तब झाला होता.
मग आला ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ युवराज सिंग.
युवराज आणि सचिनने अतिशय संयमी खेळी करण्यास सुरवात केली. बघता बघता त्यांनी डाव सावरला. पुढच्या वीस ओव्हर मध्ये त्यांनी जवळपास १०० धावा काढल्या पण विकेट पडू दिली नाही. जसा जसा वेळ जाऊ लागला रिकी पॉंटिंगला घाम फुटायला सुरवात झाली. त्याला माहित होतं हे दोघे इथून डाव फिरवू शकतात.
ब्रेट ली मिशेल जॉन्सन स्टुअर्ट क्लार्क हे प्रयत्न करून थकले होते. बॉलिंग ब्रॅड हॉग टाकत होता.
ऑस्ट्रेलियाचा नवा स्पिनर. शेन वॉर्नची रिप्लेसमेंट म्हणून हॉगकडे ऑस्ट्रलियन टीम बघत होते. त्याने मागच्या सामन्यात तीन बळी मिळवत आपली उपयुक्तता दाखवून दिली होती. खरे तर तो टीममध्ये नवा नव्हता. १९९६ पासून वॉर्न जेव्हा जेव्हा जखमी व्हायचा तेव्हा तेव्हा हॉगला संधी मिळायची. तो टीममधून आतबाहेर असायचा. अखेर गेल्या काही दिवसात वॉर्न रिटायर झाल्यापासून त्याला वनडे मध्ये पर्मनंट सीट मिळाली होती.
त्या दिवशी हॉग चांगल्या लयीत होता. २५वी ओव्हर तो टाकायला आला. त्याच्या समोर सचिन होता. सचिनने पहिल्या बॉलला एक धाव काढली. मग त्यानंतर युवराज सिंग आला. युवीने त्याला एक जोरदार षटकार ठोकला. हॉग थोडासा ताळ्यावर आला. त्याने पुढचा बॉल काळजीपूर्वक टाकला. युवराजने एक धाव काढून स्ट्राईक सचिनकडे दिला.
पहिले दोन बॉल सचिनने खेळून काढले. हॉगच्या लक्षात आले कि आपला डाव यशस्वी होत आहे, सचिनला आपली बॉलिंग खेळायला थोडे अवघड जात आहे. त्याने शेवटच्या बॉलसाठी थोडीशी फिल्डिंग बदलली. आपला सगळं अनुभव पणाला लावत त्याने फ्लाईट देत बॉल टाकला.
सचिन त्या बॉलला बिट झाला. हॉगने त्याचे दांडके उडवले होते.
फक्त ४४ धावा काढून तेंडुलकर पव्हेलियनमध्ये परतला. अख्खे स्टेडियम शांत झाले. मैदानात फक्त ऑस्ट्रेलियन टीम जल्लोष करत होती. हॉग तर बेभान होऊन नाचत होता. त्याच्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी विकेट होती. कायम शेण वॉर्नच्या छायेत राहिलेला ब्रॅड हॉग आता सचिनला आउट करणारा जागतिक दर्जाचा बॉलर झाला होता.
त्या मॅचमध्ये देखील ब्रॅड हॉगने तीन विकेट्स घेतल्या. त्याच प्रचंड कौतुक झालं. नेक्स्ट बिग थिंग फॉर ऑस्ट्रेलिया असं त्याला म्हटलं गेलं. पण हॉग साठी सचिनची विकेट, तो मोमेन्ट खूप महत्वाचा होता. त्याला कुठून तरी सचिन आउट होऊन परतत आहे आणि आपण आनंद साजरा करतोय हा फोटो मिळाला.
हॉगची इच्छा होती कि या फोटोवर सचिनने आपल्याला ऑटोग्राफ द्यावे.
चौथी वनडे मोहोलीला होती. ब्रॅड हॉग मॅचच्या आधी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला. त्याच्याजवळ तो सचिन आउट झालेला फोटो होता. सचिन जवळ जात त्याने त्यावर ऑटोग्राफ मागितला. नेहमी अत्यंत शांत आणि दिलदार वागणाऱ्या तेंडुलकरच्या मनात त्या दिवशी काय आले माहित नाही पण त्याने त्या फोटोवर सही केली आणि लिहिलं,
“It will never happen mate“
क्रिकेटच्या खेळात हे मोठं विधान होतं. हॉगला हे वाचून थोडस हसूच आलं. फॉर्ममध्ये नसलेला सचिन त्याला म्हणत होता कि मित्रा तू मला आता आऊट काढलंस पण पुन्हा असं कधीच होणार नाही. हॉगने मनाशी ठरवलं कि दुसऱ्याच दिवशी त्याला आउट काढू.
पण दुसऱ्या दिवशी तस काही घडलं नाही. सचिनने त्या सामन्यात ७९ धाव केल्या. हॉगने प्रचंड मेहनत घेतली पण त्याला शक्य झाले नाही. ती त्या सिरीजची शेवटची मॅच होती. हॉग मनाशी म्हणाला, पुढच्या सिरीजमध्ये करू.
पुढची सिरीज आली, तेव्हा देखील सचिन त्याला आउट झाला नाही. अशा असनेक सिरीज आल्या आणि गेल्या. दोघांनी कित्येक वनडे सामने खेळले, कसोटी सामने देखील खेळले. अगदी आयपीएलमध्ये देखील एमेकांच्या समोर अनेकवेळा आले. जवळपास सात वर्षांनी सचिन रिटायर देखील झाला. हॉग त्याच्या आधीच रिटायर झाला होता. दोघांनी त्यानंतर प्रदर्शनीय सामने देखील खेळले.
ब्रॉडने त्या घटनेनंतर शेकडो बॉल सचिनला टाकले असतील पण तो एकदाही त्याला आउट झाला नाही.
हॉग सांगतो कि सचिनने त्या दिवशी ते लिहिलं आणि तो विसरून देखील गेला असेल. पण माझ्या ते आयुष्यभर मनाशी कोरल गेलं. महान खेळाडू महान का असतात हे या एका उदाहरणावरून कळते. न स्लेजिंग करताही खेळावर राज्य करता येतं हे सचिनने दाखवून दिलं होतं.
हे ही वाच भिडू.
- भावाने दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सचिनने ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनां पुरतं रडवलं
- सचिनशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण आजही युवराजसिंगला भावूक बनवते
- आणि त्या दिवशी गांगुली आणि सचिननं मॅच फिक्सिंगला हरवलं !!
- सचिनने मुलाखतीमध्ये मान्य केलं, या बॉलरला खेळायची मला भीती वाटायची