शेक्सपियर म्हणाला होता, नावात काय आहे. “सज्जनकुमारांनी” ते सार्थकी लावलं..! 

सज्जन कुमार नावाचे नेते दुर्जन आहेत याबद्दल आज हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल आहे. आजच्या या निकालामुळे शिख दंगलीत झालेल्या अत्याचारांना पुन्हा वाचा फुटेल, मोदींच्या बाबतीत जसा गुजरात दंग्याचा विषय चर्चेत येतो तशाच प्रकारे कॉंग्रेसला कोंडींत पकडण्यासाठी शीख दंगल देखील राजकिय प्रचाराच्या अजेंड्यावर येईल हे नाकारता येणार नाही. तीन राज्यातील विजयाचा गुलाल अंगावरुन उतरत नाही तोपर्यन्तच आलेल्या या निकालामुळे कॉंग्रेस अडचणीत येईल का नाही हा राजकिय विश्लेषकांना नविन विषय मिळून जाईल. 

दिल्ली हाय कार्टाच्या या निकालामुळे दोन गोष्टी चांगल्या झाल्या आहे ते स्पष्ट करुन आपण सज्जनकहाणी ऐकण्यास सुरवात करुया. तर पहिली गोष्ट अशी की, या निकालामुळे शिख दंगलीत बळी पडलेल्या काही कुटूंबाना तरी न्याय मिळाल्याचं समाधान आहे. दूसरी गोष्ट अशी की, शेक्सपीयर नावात काय आहे अस म्हणाला होता. ते वाक्य आज सज्जनकुमारने सार्थकी लावलं आहे. 

आत्ता सुरवात सज्जन कुमार यांच्या राजकिय उदयाची. 

सज्जन कुमार एके काळी चहा विकायचे. दिल्लीच्या उपनगरातील मादीपुरा भागात चहा विकत ते राजकारण देखील करायचे. सामाजिक कामात सक्रिय असणारे सज्जनकुमार १९७० च्या आसपास संजय गांधींच्या नजरेत आले. संजय गांधी यांनी त्यांना महानगरपालिकेच्या इलेक्शनला “हात”भार लावला. सज्जन कुमार हे पहिल्यांदा संजय गांधींमुळे म्युन्सिपलवर निवडून गेले. दहा वर्षाच्या राजकिय कारकिर्दीचा एक टप्पा पुर्ण करुन त्यांनी १९८० साली लोकसभेची इलेक्शन जिंकली. चौधरी ब्रम्हप्रकाश यांचा सज्जनकुमार यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी पराभव केला होता. दहा वर्षाच्या कारकिर्दीत सज्जनकुमार हे खासदार सज्जनकुमार झाले. त्यांनी ज्यांचा पराभव केला होता ते चौधरी ब्रम्हप्रकाश हे कधीकाळी दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री राहिले होते. 

सुरवातीच्या काळात संजय गांधी आणि संजय गांधी यांच्या पश्चात इंदिरा गांधी यांच्यासोबत चांगले संबध प्रस्थापित केल्यामुळे सज्जनकुमार यांचा प्रभाव वाढत गेला. पुढे ते १९९१ देखील लोकसभेवर निवडून गेले. 

इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या दंगलीत सज्जनकुमार देखील आरोपी होते. शिख समुदायातील अंगरक्षकांनी इंदिरा गांधीची हत्या केल्याने दिल्लीसह इतर ठिकाणी शिख समाजातील व्यक्तींची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आली होती. अशाच प्रकारची घटना दिल्लीतल्या राजनगर भागात पाच जणांची हत्या करण्यात आली होती. 

हत्येसाठी प्रेरित करणे, दंगा भडकणे, प्रक्षोभक विधान करणे अशा विविध कलमांअंतर्गत कॉंग्रेसच्या सज्जनकुमार यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदारांचे जबाब, पुरावे यांसारख्या दिर्घ टप्याच्या कालावधीनंतर २०१३ साली कडकडडूमा कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं होतं. त्यांना निर्दोष सोडत असताना मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर पाच जणांना शिक्षा सुनावण्यात आली होती. 

सज्जनकुमार यांना सोडल्यानंतर कोर्टाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नारे देण्यात आले होते. एका व्यक्तीने तर न्यायाधिशांच्या अंगावर बूट फेकण्याचा पराक्रम देखील केला होता. न्यायाधिश एस मुरलीधर आणि न्यायाधिश गोयल यांच्या या निकालावर शिख समाजाकडून आक्षेप घेण्यात आले होते. 

या निकालाच्या विरोधात CBI ने दिल्ली हाय कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. व दिल्ली हायकोर्टाने ऑगस्ट २०१३ साली हि केस मंजूर करुन घेतली होती. पाच वर्षांच्या दिर्घ प्रक्रियेनंतर दिल्ली हायकोर्टाने आज सज्जनकुमार यांना दोषी मानलं. २०१३ साली कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय पलटवत सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुणावली तर ३१ डिसेंबर पर्यन्त त्यांना हजर होण्याचे आदेश दिले. 

शिख समाजाकडून सज्जनकुमारांना शिक्षा झाल्यामुळे हत्या करण्यात आलेल्या त्या पाच जणांना अखेर न्याय मिळाल्याचं समाधान केलं आहे. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.