संजय उपाध्याय राज्यसभेवर कसे निवडून येणार याचं गणितच चंद्रकांतदादांनी सांगून टाकलं…

महाराष्ट्रात सध्या राज्यसभेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी काँग्रेसकडून माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. आता सत्ताधारी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने पाटील यांची राज्यसभेवर निवड होणे हि केवळ औपचारिकता बाकी आहे.

मात्र अशातच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे कि संजय उपाध्याय राज्यसभेवर जाणारच. चंद्रकांतदादा आता नुसते दावा करूनच शांत झाले नाहीत तर त्यांनी संजय उपाध्याय यांच्या विजयाची काही गणित देखील मांडली आहेत.

नेमकी काय आहेत चंद्रकांतदादांनी मांडलेली गणित?

रजनी पाटील यांचा अर्ज बाद होणार?

चंद्रकांतदादा पाटील यांनी सगळ्यात मोठं गणित मांडलं आहे किंवा दावा केला आहे म्हणू तो म्हणजे अर्ज छाननीतून रजनी पाटील बाहेर पडतील. त्यांच्या म्हणण्यानुसार रजनी पाटील यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहेत. त्यामुळे अर्ज छाननी करताना त्या बाहेर पडतील.

मात्र यावेळी त्यांनी ही नेमकी ऑब्जेक्शन काय आहे हे सांगायला नकार दिला आहे. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही असं सांगतं त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे रजनी पाटील या राज्यसभेच्या मैदानातून बाद संजय उपाध्याय निवडून येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

१२ आमदारांना मिळालेला मतदानाचा अधिकार : 

काल निवडणूक आयोगाने भाजपच्या १२ निलंबित आमदारांना देखील मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यांना फक्त सभागृहाच्या आवारात जाता येणार नाही. मात्र गेटवर जाऊन मतदान करता येणार आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व १०६ आमदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि,

आमचे १०६ आणि १३ अपक्ष आमदार म्हणजे ११९ आमदार होतात. आता ५६ वाले मुख्यमंत्री होतात. ५४ वाले उपमुख्यमंत्री होतात. ४४ वाले महसूल मंत्री बनतात. मग १०६ वाले देखील राज्यसभेत जाऊ शकतात. त्यामुळे उपाध्याय राज्यसभेत जाणारच. अजून अपक्ष मिळाले तर १२७ किंवा १२८ चा आकडाही आम्ही गाठू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

महाविकास आघाडीमधील नाराज आमदारांची मदत मिळणार?

चंद्रकांत पाटील यांच्या अजून एका गणितानुसार त्यांना महाविकास आघाडीमधील नाराज आमदारांची मदत मिळणार असल्याचे संकेत आहेत.

कारण पाटील म्हणाले कि,

राष्ट्रपती आणि राज्यसभेच्या निवडणुकीत व्हीप मोडून मतदान केले तर डिस्कॉलिफिकेशन होत नाही. केवळ मी कोणाला मतदान करणार आहे हे दाखवावं लागतं. पण त्यामुळे निलंबित होण्याची भीती याबाबत नसते. त्यामुळेच भाजपचा उमेदवार राज्यसभेत जाणारच असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मात्र यातून एक प्रकारे भाजप महाविकास आघाडीमधील नाराज आमदारांना हाताशी धरून आपला उमेदवार निवडून आणणार आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे.

पंढरपूरची पुनरावृत्ती होणार?

याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने आपला उमेदवार निवडून आणला होता. त्यावेळी पर्यंत सीटिंग लोकप्रतिनिधीच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विरोधक आपला उमेदवार देत नाहीत असा संकेत होता.

मात्र त्यानंतर देखील भाजपने राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते. त्यामुळे आता देखील या पोटनिवडणुकीत भाजप उपाध्याय यांना निवडून आणण्यात यशस्वी होणार का हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.