योगी चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांना यामुळे लिहिले कोरे पत्र ?

संत ज्ञानेश्वरी हिंदू धर्मातील एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ. ज्याचे लिखाण संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या १६ व्या वर्षी केले. संत ज्ञानेश्वरांवरील चित्रपट असेल व त्यांच्याबद्दल कीर्तनातून अनेकांनी ऐकल असेल. जेव्हा संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख होतो तेव्हा योगी चांगदेव यांचेही नाव आपल्या कानी पडत.

चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात.

तापी-पयोष्णीच्या तीरावरील चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले.

याच योगी चांगदेवांनी आजच्या दिवशी म्हणजे २२ जानेवारी १२२७ रोजी समाधी घेतली. चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांना एक कोरे पत्र लिहिले होते आणि त्याला उत्तर म्हणून संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्ठी लिहिली.

ही चांगदेव पासष्ठी नेमकी काय आहे ? 

११३८ च्या सुमारास कुळकर्णी घराण्यातील ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यांना पत्नी निराई हिच्यापासून पंचावन्नाव्या वर्षी एक पुत्र झाला. त्यांचे नाव विठ्ठल आणि आळंदीतील थोर ब्राह्मण सिदोपंत ह्यांची कन्या रखुमाई यांच्या पोटी निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव  आणि मुक्ताबाई अशी चार रत्ने जन्मली.

१२ व्या शतकातला तो काळ होता. ज्ञानेश्वरांनी नेवाश्यामध्ये प्राकृत गीतादेवी म्हणजे ज्ञानेश्वरी रचली. आणि त्यानंतर निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव  आणि मुक्ताबाई हे चार भावंड नेवाश्याहून आळंदीकडे आली. सर्वांनी तेथेच कायम वसती केली. या सर्व प्रकारामुळे संत ज्ञानेश्वरांची ख्याती सर्वत्र पसरली होती. दीर्घजीवी वृद्धयोगी चांगदेवांच्या कानी त्यांची कीर्ती गेली. आणि स्वत:च्या विद्येचा आणि तपश्चर्येचा गर्व असलेल्या योगी चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांना एक पत्र लिहिले.

चांगदेवांना संत ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली होती. पण, आपण इतके महान मग आपण का त्यांना भेटायला जायचे. उलट पत्र पाठवून त्यांनाच भेटीचा सांगावा धाडूया असे म्हणून चांगदेवांनी पत्र लिहायला घेतले.

पत्र लिहायला घेतले खरे पण त्याचा मायना काय लिहावा असे मोठे कोडे चांगदेवांना पडले. ते साक्षात चिरंजीव लिहावं तर ते साक्षात देवाचे अवतार आणि तीर्थरूप लिहावं तर ते वयाने लहान आहेत अशा, संभ्रमावस्थेत असताना अखेर चांगदेवांनी एकही अक्षर नसलेले कोरेच पत्र ज्ञानेश्वरांना पाठविले. 

हे पत्र पाहून योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले.

चांगदेवपासष्टी हे पासष्ट ओव्यांचे प्रकरण चांगदेवांकरिता ज्ञानदेवांनी लिहिले. यात त्यांनी शांकर-मायावादाचा सिद्धांत सांगून नंतर चिद्विलासाचा अद्वैतवाद प्रतिपादिला आहे. ह्यात चांगदेवांचा चांगया व चक्रपाणी ह्या दोन नावांनी निर्देश केला आहे.

ज्ञानदेवांनी या चांगदेवपासष्टीच्या ३६ व्या ओवीपर्यंत परमात्म्याचे वर्णन केले असून ३७ ते ६५ व्या ओवीपर्यंत जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य कसे आहे हे अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे.

चांगदेवांचे कोरे पत्र व त्याला दिलेले ज्ञानदेवांचे उत्तर म्हणजे चांगदेवपासष्टी होय.

या पत्रानंतर चांगदेव वाघावर आरूढ होऊन आपल्या सिद्धीचे सामर्थ्य दाखवीत आळंदीस पोहचले. तेव्हा ही चारी भावंडे एका भिंतीवर बसली होती. चांगदेवांच्या स्वागतासाठी ज्ञानदेवांनी भिंतच चालून दाखवली. भिंतीवरून येत असलेल्या या चार भावंडाना पाहून ते व्याघ्रा-वरून खाली उतरून ते या चौघांना शरण आले. नंतर ज्ञानदेवांच्या आदेशावरून चांगदेवांनी मुक्ताबाईंचा अनुग्रह घेतला. चांगदेवांना उपदेश करणारे मुक्ताबाईंचे अनेक अभंग व एक पदही प्रसिद्ध आहे.

अशा या चांगदेव आणि ज्ञानोबा माउलींच्या चांगदेव पासष्टीचे महात्म्य आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.