सरपंचाचं मानधन काय? त्याला कामे कोणती करावी लागतात?

भावा आज ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. गुलाल उधळण्यात कार्यकर्ते बिझी आहेत. काही ठिकाणी पॅनेलमध्ये हमरीतुमरीवर येत भांडणं सुरु आहेत तर काहीजणांनी सगळं विसरून पार्टीला सुरवात देखील केली.

पण या सगळ्या गोंधळात देखील आम्ही तुमच्यासाठी मुख्य विषय घेऊन आलोय. सरपंच झाल्यावर कामे काय काय करायची असतात.

कसंय की आपले आमदार असतात मुंबईला आणि खासदार असतेत दिल्लीला. जनतेची छोटी मोठी कामे असतात ती बघायला हे नेते येत नाहीत.  उद्या आपल्या गल्लीतला रस्ता उकरला, गटार तुंबली तर आपण गावच्या  सरपंचाकडे जातो. मग कधी कधी तो आपल्याला हे काम आमच्याकडे येत नाही त्यासाठी जिल्हापरिषदेकडे जावा, पंचायत समितीकडे जावा असं सांगतो. आमदार खासदार तर आम्ही फक्त कायदे बनवतो असं सांगतात.

मग अशावेळी प्रश्न पडतो कि ग्रामपंचायतीची कामे काय ?

जशी राज्याच्या कामांची यादी आणि अधिकार सांगणारी राज्यसुची असते, केंद्राची केंद्रसूची असते अगदी त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे अधिकार आणि कर्तव्ये सांगणारी ग्रामसूची असते. त्यात नमूद केलेल्या गोष्टींचा विकास करणे हे ग्रामपंचायतीचे काम असते.

यानुसार गावातील कर गोळा करून मूलभूत सोयी सुविधा पुरवणं हे ग्रामपंचायतीचं मुख्य काम असत. आपल्या हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर, व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर असे विविध कर गोळा करायचे असतात.

पण हे नुसतं कर गोळा आपल्याकडे ठेवायचे नसतात, तर वर सांगितल्या प्रमाणे मूलभूत गोष्टी पण द्यायच्या असतात. यात गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या आणि खर्चाच्या पाण्याची सुविधा, गावातील साफ-साफई अशा गोष्टी असतात. हे केल्यानंतर देखील ग्रामपंचायतीची जबाबदारी संपत नाही.

या कामांशिवाय जलसंधारण आणि गावातील सार्वजनिक पाणवठयाची देखभाल, सार्वजिनक आरोग्य व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, पशुसंवर्धन, पर्यावरण, कुपोषण, पीक पद्धती, शेती आणि शेतकरी विकास, अतिक्रमणे आणि अवैध बांधकामे, वृक्षतोड, वनीकरण, साक्षरता आणि शिक्षण, रोजगार, सार्वजनिक मालमत्तांची देखभाल, ग्रामसुरक्षा, गावातील दारूबंदी, प्रदूषण नियंत्रण, अंधश्रद्धा निर्मूलन, बालमृत्यू रोखणं, बाजारव्यवस्था, गटशेती, सौरउर्जा अशी किती तरी कामे सांगता येतील.

विशेषतः सरपंचाची मुख्य कामे खाली दिलेल्याप्रमाणे असतात.

  1. मासिक सभा बोलावणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.
  2. गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे
  3. ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
  4. योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे.
  5. ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे.

आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार म्हणतात,

ग्रामपंचायत ही गावाची आई असते. तिला गावाचं संगोपन, विकास, पालनपोषण करावं लागतं. गावाचं मानसिक, बौद्धिक व भौतिक अंगाने वातावरण सांभाळावं लागतं.

ही सगळी काम फक्त सरपंच आणि ग्रामपंचायतच करू शकतो. सरपंचांची भूमिका खूप मोलाची आहे. ते केवळ मानाचं, राजकारणाचं साधन नसून गावविकासाचं किवा समाजकारणाचं प्रभावी साधन आहे हे सरपंच मंडळींनी ध्यानात घ्यायला हवं, असे ही पवार म्हणतात.

आपल्या देशात एका गावाकरता केंद्र, राज्य सरकार आणि इतर अशा मिळून जवळपास ११४० योजना असतात. आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं, कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं, यानुसार ठरतं.

निधीच म्हणाल तर जर संबंधित योजना राज्य सरकारची असेल तर १०० टक्के निधी राज्य सरकार देतं आणि केंद्राच्या बहुतांश योजनांसाठी ६० टक्के केंद्र सरकार, तर ४० टक्के राज्य सरकार देतं.

१ एप्रिल २०२० पासून १५ वा वित्त आयोग सुरू झाला आहे. त्यानुसार सरकार गावातल्या प्रति माणसी प्रति वर्षी सरकार ९५७ रुपये देत आहे. १४ व्या वित्त आयोगासाठी ही रक्कम ४८८ रुपये होती.

आता सरकार आपल्यावर प्रत्येक वर्षी ९५७ रुपये खर्च करत म्हणल्यावर त्यावरून तरी समजून घ्या कि मतदान करणं किती महत्वाचं असतं.

आता हि झाली ग्रामपंचायतीची कामं. किती जरी झालं तरी लष्कराच्या भाकऱ्या भाजून पोट भरत नसतं. सरपंच जरी झाला तरी त्याला पण घरदार पोरंबाळं असतात. त्याच्या कामाला मानधनपण पाहिजे. सरकारने याचा पण विचार करून ठेवलेला आहे.

सरपंचाचे मानधन ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांना अतिथी भत्ता म्हणून वार्षिक अंदाजपत्रकांच्या २% किंवा ६०००/- रु यापैकी जी मोठी रक्कम असते ती दिली जाते. सरपंच, उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी ७५ टक्के खर्च सरकार उचलते तर  उर्वरित २५ टक्के मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो.

आता हि रक्कम किती तोकडी आहे हे आपण देखील जाणतोच.  महागाई वाढली त्याप्रमाणे हे मानधन सरसकट १५ हजार इतके वाढवा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सरपंचांच्या संघटनेतर्फे सुरु होती. दोन वर्षांपूर्वी याची दखल घेत काही बदल करण्यात आले.

तत्कालीन राज्यसरकारने सरसकट मानधनाची मागणी धुडकावून लावली मात्र पूर्वीप्रमाणे लोकसंख्येचा निकष ठेवून सरपंचाच्या मानधनामध्ये अडीचपट वाढ केली.

दोन हजारापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी सरपंचाचे मानधन एक हजाराऐवजी तीन हजार, २००१ ते ८ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी १५०० ऐवजी चार हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन हजार ऐवजी पाच हजार रूपये असे मानधन वाढविण्यात आले आहे.

तर कार्यकर्त्यांनो निकाल लागलाय. तर आता झाडून कामाला लागा. तुमच्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंचाला काम काय असते हे देखील सांगा आणि मानधन किती हे सुद्धा वाचायला द्या. सुजाण नागरिकाचं कामच असतंय हो ते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.