एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सोबतच या ७ भन्नाट गोष्टी झाल्या…

देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली तेव्हा युपी बिहारच्या लोकांनी तोंडात बोटं घातली असतील. काय दर्जाचं राजकारण चालूय. कुठलं हाऊस ऑफ कार्डस् आणि कुठला गेम ऑफ थ्रोन्स. आजवर युपी बिहारमध्ये अस धक्कातंत्राचं राजकारण व्हायचं, आपण ते ऐकून पण असायचो, पण गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रात जे चालूये त्यावर एक पिक्चर, आठ दहा वेबसिरीज होवू शकतील.

आता एकनाथ शिंदेंनी राज्याच्या तिसाव्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सोबतच ७ भन्नाट गोष्टी घडल्या.

१) पवारांच्या बंडाशी तुलना

आता या बंडाची पुर्णपणे शरद पवारांच्या बंडासोबत तुलना होऊ शकते. शरद पवारही सत्तेत होते. त्यांनी पक्ष फोडला. जनता पक्षाच्या पाठींब्यावर ते मुख्यमंत्री झाले. जनता पक्षाचे ९९ सदस्य होते. पवारांचे ४० आमदार होते. आता भाजपचे १०६ आमदार आहेत. शिंदे गटाचे ५० च्या दरम्यान आमदार आहेत. सत्तेत सर्वाधिक जागा तेव्हा जनता पक्षाकडे होत्या, आत्ता भाजपकडे आहेत.

तरी तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले होते आणि आत्ता एकनाथ शिंदे झाले आहेत. त्यामुळे पवारांच्या बंडासोबत एकनाथ शिंदेंचं बंड जुळतं.

२) सातारा जिल्ह्याचे चौथे मुख्यमंत्री

सातारा जिल्ह्याला ४ वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं. राज्याला पहिले मुख्यमंत्री देणारा सातारा जिल्हा. हा मान मिळाला तो कराडच्या यशवंतराव चव्हाण यांना. त्यानंतर साताऱ्याचे बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर हा मान मिळाला तो पृथ्वीराज चव्हाण यांना. त्यानंतर सातारा जिल्ह्यातला माणूस मुख्यमंत्री होण्याची ही चौथी वेळ.

एकनाथ शिंदे हे जावळी तालुक्यातल्या दरे गावचे. आत्ता दूसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सर्वाधिक मुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणूनही सातारा जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्याच्या मागोमाग लातूरमधून निलंगेकर आणि विलासराव देशमुख, यवतमाळमधून वसंतराव, सुधाकरराव नाईक, नांदेडमधून शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण अशी दोन-दोन मुख्यमंत्री देणाऱ्या जिल्ह्यांची यादी निघते.

३) मराठा जातीचा प्रभाव

राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर मराठा जातीचा पगडा राहिलेला आहे. यशवंतराव चव्हाण मराठा, शंकरराव चव्हाण मराठा, वसंतदादा पाटील मराठा, शरद पवार मराठा, बाबासाहेब भोसले मराठा, शिवाजीराव पाटील निलंगेकर मराठा, नारायण राणे मराठा, अशोक चव्हाण मराठा, विलासराव देशमुख मराठा, पृथ्वीराज चव्हाण मराठा आणि आत्ता एकनाथ शिंदे मराठा.

आजवर झालेल्या १९ मुख्यमंत्र्यांपैकी १० मुख्यमंत्री हे मराठा जातीचे राहिलेले आहेत. आता मराठा जातीतून आलेले एकनाथ शिंदे हे अकरावे मुख्यमंत्री ठरणार आहेत. तर गेल्या ६२ वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात २४ वर्षाहून अधिक काळ मराठा मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

४) ग्रास रुटवरून झालेले मुख्यमंत्री 

मारोतराव कन्नमवार हे सुरवातीच्या काळात चहाटपरी चालवायचे, वर्तमानपत्र विकायचे. मनोहर जोशीही सुरवातीच्या काळात दुध विकायचे, क्लासेस घ्यायचे. नारायण राणे हे सुरवातीच्या काळात इन्कम टॅक्समध्ये चतुर्थ श्रेणी कामगार होते. सुशिलकुमार शिंदे हे कोर्टात पट्टेवाला म्हणून कार्यरत होते. अशा नावांमध्ये सुरवातीला रिक्षाचालक असणारे आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळवणारे एकनाथ शिंदे ठरले आहेत. एकनाथ शिंदे यांचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्री होण्याचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.

५) सुत्रांना पण भनक नाही लागली

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याची जाणीव सुत्रांनाही लागली नाही. आपल्याकडची माध्यमं प्रत्येक बातमी सुत्रांच्या आधारे देतात. प्रत्येकानं बातम्या फोडल्या. बऱ्याचदा या बातम्या खोट्या निघायच्या पण अनेक बातम्या खऱ्याही निघाल्या आहेत. पण या बातमीचा अंदाज कोणालाच लागला नाही.

फक्त पत्रकार धवल कुलकर्णी यांचं नाव या यादीत येतं. तेच एकमेव होते ज्यांनी ट्विट करून, एकनाथ शिंदेना भाजप मुख्यमंत्री होण्यासाठी पाठींबा देईल असं सांगितलं होतं. सोबत ते असंही म्हणाले होते, की यामुळे भाजपला क्लेम करता येईल की आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत ना की कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणाऱ्या सेक्युलर शिवसेनेसोबत..

६) शिवसेनेचे चौथे मुख्यमंत्री

आजवर २० व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. शरद पवार चारवेळा, वसंतदादा पाटील ४ वेळा अशा टर्मचा विचार करता, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री ठरतात. या ३० टर्ममध्ये कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला २३ वेळा, पुलोद आघाडीला एकदा, भाजपला दोन वेळा आणि शिवसेनेला चार वेळा मुख्यमंत्रीपदाचा सन्मान मिळाला आहे. शिवसेनेच्या मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांना हा मान मिळाला आहे.

आत्ता तुम्ही म्हणाल भाजपला दोन वेळा कसा काय? तर देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा शपथविधी बऱ्याचदा मोजायचा विसरला जातो. आता तुम्ही म्हणाल, एकनाथ शिंदे शिवसेनेचे कसे? तर अजूनही विधिमंडळ गटनेते म्हणून शिंदे की चौधरी याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळं सध्या तरी एकनाथ शिंदे शिवसेनेचेच असं म्हणावं लागेल.   

७) महाराष्ट्राचे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री

हा मुद्दा तसा गृहित धरण्यासारखा नाही पण महत्वाचा आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्राला पहिल्यांदा कोणीतरी दाढी असणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. आजवरचे सर्व मुख्यमंत्री क्लिन शेव करुन असायचे पण एकनाथ शिंदे हे ओळखले जातातच त्यांच्या दाढीच्या लुकमुळे. भारताचा कॅप्टन रोहित शर्मालाही दाढी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दाढी आहे आणि आत्ता मुख्यमंत्र्यांनाही दाढी आहे.

यावरून एक वाचलेली जुनी गोष्ट आठवली, समाजकारणात आणि राजकारणात दाढीवाल्यांच्या नादाला लागायचं नसतंय.

बाकी आता या ७ गोष्टी लक्षात ठेवा, कट्ट्यावर चर्चा करताना उपयोगाला येतील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.