ब्रिटिशांनी देखील वारीवर बंदी घातलेली, ती मोडण्यासाठी सावरकरांनी एक प्लॅन बनवलेला…

सध्या कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारीला बंदी घालण्यात आलीय. कडक नियम आणि बंधने पाळून बसने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला येणार आहेत व तिथून प्रतीकात्मक दीड किलोमीटरची पायी वारी निघणार आहे. पण या वारीच्या निमित्ताने वाद उफाळून आला आहे.

नुकतेच श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आषाढी वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत असून ​आषाढी वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल,असा दावा त्यांनी केला. शिवाय मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे अशी ही मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळ केली.

गेली शेकडो वर्षे प्रवाहीपणे सुरु असलेली पंढरीची वारी खंडित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील एकदा विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांना बंदी घालण्यात आली होती.

तो काळ होता पारतंत्र्याचा. साल होते १९४४.

दुसरे महायुद्ध पेटले होते. हिटलर संपूर्ण जगाला गिळण्याचा प्रयत्नात होता. दोस्त राष्ट्रे त्याला रोखण्याच्या प्रयत्नात होती. भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे इच्छा नसतानाही दुसरे महायुद्ध आपल्यावर लादण्यात आले होते. भारतीय जवान अरबी वाळवंटात जाऊन इंग्लंडसाठी लढत होते. फक्त सैन्यच नाही तर भारतातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा युरोपात पाठवण्यात आला होता. त्यामुळे तयार झालेल्या कृत्रिम दुष्काळामुळे बंगाल व बिहार मध्ये लाखो लोक मेले.

हिटलर ज्यूंवर अत्याचार करत असल्याची भूमिका मांडणारे इंग्रज भारतीयांना मात्र कस्पटासमान वागणूक देत होते.

अशातच मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने फतवा जारी केला कि राज्यात अन्नधान्याची टंचाई असल्यामुळे वारीवर बंदी घालण्यात येईल.

जनता या विरोधात होती. जनतेने एकमताने ही बंदी उठवण्याबाबत शासनाकडे अर्ज केला होता. पंढरपूरची वारी ही पंढरपूरचा आर्थिक कणा असल्याने पंढरपूरचे अर्थकारण अडचणीत आले होते. त्यामुळे लोकांनी शासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. सोलापूरकरांनी हजारो सह्याचा अर्ज मुंबई सरकारच्या चीफ सेक्रेटरीकडे पाठवला होता.

आळंदी येथून पालखी हलवण्यासाठीही बंदी घालण्यात आली होती.

संबंधी दि. १५ जून १९४४च्या पत्रकात सावरकरांनी लिहिले, काही तरी चुकीच्या समादेशामुळे राज्यपालांनी ही बंदी घातलेली दिसते. त्यांना बहुधा पंढरपूरचे महत्त्व माहीत नसावे. ख्रिश्चनांना रोम जितके पवित्र वाटते तितकेच मराठ्यांना पंढरपूर पवित्र वाटते. इतिहासकाळात पंढरपूरची मूर्ती फोडणाऱ्या मुसलमान सरदारांचे शिरच मराठ्यांच्या राजाने छाटून टाकले आणि ते थेट विजापूरला घुसले. हाजच्या यात्रेला या युद्धकाळातही अनुज्ञा देणाऱ्या शासनाने पंढरपूर यात्रेला बंदी करावी हा हिंदूवर अन्याय आहे.

सावरकरांनी पंढरपूर यात्रेमुळे युद्ध प्रयत्नात किंवा अन्न धान्य उत्पादनात नि वाटपात कोणताही अडथळा येणार नाही. असा विश्वास ब्रिटिश गव्हर्नरला सांगितला आणि बंदी उठवण्याची मागणी केली.

सावरकरांनी हे गव्हर्नरला आवाहन करणारे पत्रक तर काढलेच शिवाय वारकऱ्यांच्या गटप्रमुखांना आणि हिंदुमहासभा शाखांना एक पत्र लिहिले. या पत्रात आषाढी वारीवरची बंदी कशी मोडायची याबद्दल योजना सांगितली होती.

ते म्हणतात,

(१) वाटेत अडविलेल्या सर्व वारकऱ्यांनी ती बंदी न मानता पंढरपुराकडे चालू लागावे. मग ते वारकरी १० असोत, वा १० सहस्त्र असोत.

(२) अटक झाल्यास त्यांनी विठ्ठलाचे नावे बंदीवास भोगावा. पांडुरंगाची मंदिरे दोन : दर्शनासाठी पंढरपूरचे नि कार्यासाठी कारागृहाचे. कारागृहात जाणाऱ्यांना दुप्पट पुण्य लागेल. कारण अशा प्रतिकारामुळे पुढच्या वार्यांवर बंदी येणार नाही.

(३) ह्या अटकेच्या प्रसिद्धीमुळे जी जागृती होईल ती अनेक वाच्यांनी होणार नाही.

(४) ज्याला जसे जमेल त्या मार्गे पंढरपूरला पोचावे.

(५) एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील सर्वांनी घराबाहेर पडून भगवी पताका खांद्यावर टाकून भगवंताचे दर्शनाला जावे. संगिनी उभारल्या तरी त्यास न मानता पुन्हा पुन्हा देवळाकडे विद्या न्याव्यात.

(६) ‘देह जावो अथवा राहो माझा पांडुरंग भावो’ ही गर्जना कसोटीस लागण्याची वेळ आली
आहे असे समजून हे व्रत आचरावे.

याच काळात जगन्नाथ महाराज, सोनोपंत दांडेकर, सरदार विंचूरकर, आळंदी संस्थानचे केळकर, प्रा. धनंजयराव गाडगीळ आदींनी एकत्रित येऊन प्रयत्न करून जिल्हाधिकारी तसेच चीफ सेक्रेटरी यांच्याकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. म्हणून या प्रयत्नांना ब्रिटिश सरकारने थोडी सवलत दिली आणि १ ते ३ जुलै १९४४ या काळात बंदी तात्पुरती उठवून पादुका मोटारीने पंढरपूरला नेऊन लगेच परतण्याची ताकीद दिली.

आषाढी यात्रेच्याच दिवशी मुंबई हिंदुसभेचे नेते सी. के. बोले यांचा ७६वा जन्मदिन होता. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भरलेल्या सभेला सावरकरही उपस्थित होते. बोले यांचे अभिनंदन करून सावरकर पुढे म्हणाले,

‘हज यात्रा बंदी केली तर मुसलमान खळखळ करतील म्हणून शासनच त्या यात्रेची व्यवस्था करते. तर उलट हिंदू वैध मार्गानि जातात, सभ्यपणे वागतात म्हणून शासन त्यांना दुर्बल समजून दाबू पाहते. पुरोगामी हिंदू म्हणतात की पंढरपुरातच काय आहे? आता देवळे जाऊन तेथे चित्रपटगृहे येतील. पण त्यांना माहीत नाही की सध्या चित्रपटगृहांतून देव-देवतांचे जयजयकार चालले आहेत!!

मी देवपूजा करीत नसलो तरी ती पूजा निष्ठेने नि भक्तीने करणाऱ्यांवर जर कोणी अन्यायाने बंदी घातली तर त्या अन्यायाचे परिमार्जनासाठी आपण धावून गेले पाहिजे.

पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय आहे. जगातील मानवांचे अधिकार रक्षिणे हे जितके न्याय्य, तितकेच हिंदूंचे अधिकार रक्षिणे हेही न्याय्य आहे. हिंदूंतील जागृतीमुळे आणि या प्रकरणी वाटाघाटी आणि लढाई या दोन्ही मार्गांनी सिद्धता केल्यामुळे पंढरपूरची बंदी उठली. हा हिंदुत्वनिष्ठेचा विजय आहे. याचे परिणाम दूरवर होतील. ”

आचार्य बाळाराव सावरकर यांनी लिहिलेल्या अखंड हिंदुस्थान लढापर्व या पुस्तकात या प्रसंगाचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात सावरकरांच्या या सावधानतेमुळे किंवा शासनाला बंदी घालणे इष्ट न वाटल्याने कसेही असो, पण ही बंदी पुन्हा आली नाही आणि पंढरपूरची यात्रा प्रतिवर्षापेक्षाही अधिक उत्साहाने आणि हिंदू संघटनेच्या जागृतीने यशस्वी झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.