काँग्रेस मुख्यालयात म्हणायचे, सोनियांशी बोलणे शक्य नसेल तर ऑस्करशी बोला…

३१ ऑक्टोबर १९८४. संपूर्ण देश त्यादिवशी एका सर्वात मोठ्या धक्क्यातून जातं होता. त्यादिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. अशा या धक्क्यातून सावरत राजकारणात नवख्या असलेल्या राजीव गांधी यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली होती.

त्याचदिवशी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पुढे थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ३१ डिसेंबर १९८४ रोजी राजीव यांनी आपल्या नव्या कॅबिनेटची निवड केली. नव्या पंतप्रधानांसाठी ३ संसदीय सचिवांची देखील निवड केली. तिघांनी एकाच वेळी शपथ घेतली. याच संसदीय सचिवांना पुढे राजीव गांधी यांचे ‘अमर – अकबर – ऍंथोनी’ म्हंटले जाऊ लागले.

यात अमर म्हणजे अरुण सिंह, अकबर म्हणजे अहमद पटेल आणि ऍंथोनी म्हणजे,

ऑस्कर फर्नांडिस

१९८० च्या दशकांपासूनच काँग्रेसमधील सर्वोच्च आणि पहिल्या फळीतील नेते म्हणून ऑस्कर फर्नांडिज यांना ओळखलं जात होते. पुढे ते सोनिया गांधी यांचे देखील विश्वासपात्र बनले. इतके कि २४ अकबर रोडवर काँग्रेस नेत्यांमध्ये म्हंटले जायचे कि तुम्हाला सोनिया गांधी यांच्याशी बोलता येत नसेल तर तुम्ही ऑस्कर यांच्याशी बोला. ते सोनिया गांधी यांच्याशी बोलल्यासारखेच आहे.

२७ मार्च १९४१ साली उडपी शहरात ऑस्कर यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील रोक फर्नांडिस हे शिक्षक होते, सोबतच मणिपाल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पहिले अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पहिले. तर आई लियोनिसा फर्नांडिस या महिला न्यायाधीश होत्या. घरात पूर्वीपासून शैक्षिणक वातावरण असल्यामुळे ऑस्कर देखील अभ्यासात हुशार होते.

बीएची पदवी घेऊन त्यांनी LIC मधून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर काही काळ व्यवसाय देखील केला. ऑस्कर एक प्रगतशिल शेतकरी देखील होते. घराजवळ अंबालपडीमध्ये जमीन घेऊन ते तांदळाची शेती करत होते, यात त्यांना मणिपाल सिंडीकेट कृषी फाउंडेशनने बेस्ट राइस ग्रोवरचा पुरस्कार देखील मिळाला होता.

मात्र त्यांचा तरुणपणाचा काळ हा पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशा काँग्रेसच्या एका पेक्षा एक दिग्गज नेत्यांचा होता. संपूर्ण देश या नेत्यांच्या नेतृत्वाने भारावलेला होता. साहजिकरित्या ऑस्करदेखील काँग्रेसच्या संपर्कात आले.

त्यांनी आपली नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उडपी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले. १९७५-७६ साली ते नगरसेवक म्हणून निवडून देखील आले.

हळू हळू आपल्या मधाळ वाणीमुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये त्यांना ‘ऑस्कर भाई’ म्हणून ओळखले जाऊ लागले. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी २ वेळा जबाबदारी पार पाडली. या दरम्यान जनता पक्षाचं सरकार पडल्यानंतर १९८० झालेल्या निवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

अहमद पटेल देखील त्याच दरम्यान लोकसभेवर निवडून आले होते. काँग्रेसमधील पटेल, फर्नांडिस यांच्यारूपाने उत्साही तरुणांची फौज दिल्लीत पोहचली होती. या दोघांनी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी पायाला भिंगरी बांधली. कोणताही काम सांगावे आणि ते ऑस्कर यांनी पूर्ण करावे असं समीकरण तयार झालं होतं.

यानंतर देखील म्हणजे १९८४, १९८९, १९९१, १९९६ ऑस्कर उडपी लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले. असं म्हणतात कि ऑस्कर यांनी पंतप्रधान नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात आलेली संधी सोडून पक्ष बांधणीकडे लक्ष दिले होते. त्यामुळेच ते सोनिया गांधी यांचे विश्वासपात्र बनले. सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावं म्हणून देखील फर्नांडिस यांनी प्रयत्न केले होते.

पक्षाध्यक्षांच्या पदासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळे लहान मोठे विषय ऑस्कर फर्नांडिस यांनीच हाताळले होते. सोबतच ते काँग्रेस कमेटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष देखील होते. 

१९९९ साली लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होते. पुढे मनमोहनसिंग यांची सत्ता आल्यानंतर त्यांचा पहिल्यांदा श्रम आणि रोजगार, क्रीडा, युवक या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून समावेश झाला होता. त्यानंतर २०१३ साली रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी त्यांना मिळाली होती.

अलीकडे २ महिन्यांपूर्वी योगासन करताना पाय घसरून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेरीस आज त्यांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेसच्या अत्यंत महत्वपूर्ण सत्ता काळापासून ते अलीकडे पडत्या काळातील चित्र देखील ऑस्कर यांनी अत्यंत जवळून बघितले.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.