शहिदांच्या कुटुंबीयांना मोबदला देताना तारीखमर्यादा एकच, ती म्हणजे 15 ऑगस्ट 1947.

भारताच्या राजकारणात जे काही मोजके संवेदनशील नेते होऊन गेले त्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा निश्चितच समावेश केला गेला पाहिजे. त्यांचं वक्तृत्व अफाट होतं. संसदेत त्यांनी अनेक लढाया लढल्या, वाग्बाणांनी विरोधकांना घायाळ केलं. पण दिलदार स्वभावामुळे आपल्या विरोधकांच्या मनात देखील त्यांनी स्थान निर्माण केलं होतं.  

सदा हसतमुख व मृदू स्वभावाचे अटलजी वेळ प्रसंगी आपल्या कणखरतेचं देखील दर्शन देत.

कारगिल युद्धात संपूर्ण जगाला याची प्रचिती आली. शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तानशी त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला होता पण तिथल्या नेतृत्वाने अटलजींच्या विनम्रतेला त्यांचा दुबळेपणा समजण्याची चूक केली. भारतात घुसलेल्या पाक सैन्याला पुरेपूर निपटून काढायसाठी पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी अनेक कणखर पावले उचलली. त्यांनी आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास दाखवला. वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांना युद्ध नीती ठरवण्याची मोकळीक दिली. स्वतः खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिले.

वाजपेयींच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम कारगिल युद्धात भारतीय सेनेने पाकिस्तानला हरवून पळवून लावलं. 

मात्र याच काळातल्या वाजपेयींच्या संवेदनशीलतेची आणि जागरुकतेची आठवण भाजपचे माजी खासदार  व उत्तरप्रदेशचे सध्याचे राज्यपाल राम नाईक यांनी एके ठिकाणी सांगितली आहे. 

कारगिल युद्धकाळात राम नाईकांच्या मतदारसंघातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वासुदेव पै निवर्तले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनास राम नाईक गेले. त्यांचा मुलगाही नाईक यांचा कार्यकर्ता होता. अजून तेरावाही व्हायचा होतं; पण पै वहिनींनी आपले सर्व सुवर्णालंकार काढून राम नाईक यांना दिले आणि सांगितलं,

“कारगिल शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अटलजींना द्या.” 

वासुदेव पै यांच्या पत्नीचं ते औदार्य पाहून सारेच स्तीमित झाले. दिल्लीला परतल्यावर राम नाईकांनी ते दागिने घेताना पंतप्रधान वाजपेयी यांच्याकडे सोपवले. ते दान स्वीकरताना अटलजी गहिवरले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 

 त्या प्रसंगी वाजपेयींना एक प्रश्न पडला. “युद्धकाळात भारतीय स्त्रियांनी असं दान केलं आहे; त्या सोन्याचं पुढं काय होतं?’ 

त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडे याची विचारणा केली. दुर्दैवानं बांगलादेश युद्धापासून मिळालेल्या सुवर्ण देणग्या रिझर्व्ह बॅंकेत पडून होत्या. अटलजींनी सूत्रे हलवली. तात्काळ त्याच्या योग्य विनियोगाची तरतूद केली.

देशासाठी प्राणपणाला लावणारे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल वाजपेयींना विशेष आदर आणि प्रेम होतं. 

एकदा एक विचित्र प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले. पंतप्रधान म्हणून अटलजींकडे एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी अधिकारी बऱ्याचदा तिजोरीतली तूट भरून काढण्यासाठी नामी शक्कल लढवत असतात. पंतप्रधानांची सही झाल्यावर तयांचयावर शिक्का मोर्तब होत असतो.

एकदा कुठल्यातरी अधिकाऱ्याने सरकारी तिजोरीतलं धन वाचवण्यासाठी १९९६ च्या आधीच्या शहीद जवान कुटुंबांना कोणताही मोबदला दिला जाऊ नये, अशा आशयाचा आदेश काढला

अटलजींच्या टेबलावर जेव्हा ती फाईल आली तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करत त्यांनी तो प्रस्ताव अमान्य केला. नामंजुरी देताना त्यांनी फक्त एकच वाक्‍य लिहिलं,

“शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोबदला देताना जवान कधी शहीद झाला यासाठीची शेवटची तारीखमर्यादा एकच, ती म्हणजे १५ ऑगस्ट १९४७.’

अटलजींच्या संवेदनशील नेतृत्वामुळे देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियावर अन्याय होता होता वाचला.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.