मायक्रोसॉफ्टवाल्या सत्या नाडेलाच्या लग्नात खुद्द पंतप्रधान बिना निमंत्रणाचं घुसले होते..

भावांनो लग्नाचा सिझन वाया चाललाय. लॉकडाऊन मुळे सगळं फिक्क फिक्क वाटतंय. तुम्ही म्हणाल कि भिडू स्वतःच्या लग्नासाठी आतुर झालाय कि काय. तर तसा विषय नाही. विषय आपल्या बुंदीचा नाही तर दुसऱ्याच्या लग्नातल्या बुंदीचा आहे.

आपण तर जन्म जात सिंगल. गावात कोणाचं लग्न असलं कि निमंत्रण असो किंवा नसो आपण  पंगतीला हजर राहतो. आपण म्हणजे एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात देखील मन घट्ट करून जिलेबी मठ्ठा संपवून आलेला वाघ आहे. लॉक डाऊन काळात त्या  कलेक्टरन लग्न समारंभात भटजी बुवांपासून ते नवरदेवापर्यंत टिप्पिरे दिलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लोक खरोखरच नियम पाळायला लागलेत.

मोजून पंचवीस म्हणजे पंचवीस पाहुणे. फक्त पंचवीस जणांना निमंत्रण, त्यात म्हणेज दोन्ही कडच्या घरच्यांना बोलवल तरी यादी संपते. अशा कडक नियमामध्ये पत्रिका नसतानाही जेवायला येणाऱ्या लोकांची जमात नामशेष झाली आहे.

अशातच एक बातमी आली जगातला सर्वात श्रीमंत माणूस मायक्रोसॉफ्टचा मालक बिल गेट्स याच्या बायकोने सोडपत्र दिल आणि त्याने पण सिंगल लोकांच्या यादीत पदार्पण केलं. २०२०-२१ चा कोरोना काय कोणाला जगूच देत नाहीय हेच खरं.

असो. याच मायक्रोसॉफ्ट वरून आठवलं त्या मायक्रोसॉफ्टचा सध्याचा बॉस म्हणजे सत्याभाऊ नाडेला. हे भारतीय आहेत. हा त्यांचा संसार सुखाचा चाललाय. पण आम्ही आठवण काढली म्हणजे त्यांच्या लग्नात देखील एक बिना पत्रिकेचा आगंतुक घुसला होता. हा आगंतुक साधा सुधा नव्हता.

तर ते होते भारताचे पंतप्रधान.

आता तुम्ही लगेच काय पण अंदाज  बांधू नका. सद्याचे पंतप्रधान आमच्याप्रमाणेच सिंगल आहेत, त्यांना पण जगभर फिरून फोटो काढायची हौस आहे. पण आपण चर्चा करतोय ते पंतप्रधान हे नाहीत.

तर गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली.

सत्या नाडेला मूळचे आंध्रप्रदेशचे. जन्म झाला हैदराबाद मध्ये. त्यांची आई होती संस्कृत शिक्षिका तर वडील होते आयएएस ऑफिसर. एवढ्या हुशार लोकांच्या पदरी सत्या सारखंच पोरग जन्माला येणार यात कोणतीही शंका नाही. असो.

तर सत्याभाऊचे वडील म्हणजे बुक्कापुरम नडेला युगंधर हे १९६२च्या बॅचचे आयएएस ऑफिसर. केडर देखील गृह राज्य म्हणजे आंध्र प्रदेश मिळालं होतं. अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांना आंध्र प्रदेशमध्ये ओळखलं जायचं. सत्तरच्या दशकात जेव्हा एनटी रामराव तिथले मुख्यमंत्री बनले तेव्हा बी.एन.युगंधर हे राज्याचे मुख्य सचिव बनले. दोघांनी एकत्र येऊन राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.

दोन रुपयात तांदूळ हि पुढे देशभरात गाजलेली योजना हे बी.एन. युगंधर यांचीच आयडिया होती.

त्यांचा मुलगा सत्या लहानपणापासून हुशार होता. त्याच प्राथमिक शिक्षण हैदराबादच्या केंद्रीय विद्यालयात झालं. त्याला क्रिकेटची आवड होती. शालेय स्तरावर त्याच नाव देखील गाजल. मात्र त्याने क्रिकेटमध्ये करियर केलं नाही.

NadellaCricket

पुढे इंजिनियरिंग साठी कर्नाटकात मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे गेला. तिथे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली. याच काळात अमेरिकेमध्ये एमएस करण्यासाठी त्याला स्कॉलरशिप मिळाली. युनिव्हर्सिटी ऑफ व्हिस्कॉन्सिन अँड मिलवॉकीमधून त्याने पदवी मिळवली. तिथेच सन मायक्रोसिस्टीम मध्ये नोकरीला लागला.

दोन वर्षातच जगातील सर्वात मोठी कॉम्प्युटर कंपनी मायक्रोसॉफ्ट मध्ये जॉईन झाला.

त्याच्यासाठी हि मोठी अचिव्हमेंट होती. इकडे भारतात तेव्हा नवीन पंतप्रधान सत्तेत आले होते. त्यांनी आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण याचा स्वीकार करून देशाचं चित्र बदलून टाकलं होतं. जगभरातून टीका व कौतुकाचे धनी झालेले हे पंतप्रधान होते श्री.पी.व्ही.नरसिंह राव.

नरसिंह राव हे पूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिले होते. त्यावेळी त्यांना बी.एन.युगन्धर या लोकप्रिय अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेची ओळख झाली होती. दोघांचे सुरु चांगले जुळेल. पुढे नरसिंह राव केंद्राच्या राजकारणात गेले आणि त्यांचा संपर्क तुटला. मात्र पंतप्रधान बनल्या बनल्या नरसिंह रावांनी युगंधर यांना दिल्लीला बोलावून घेतले आणि पंतप्रधान कार्यालयात आपला सचिव म्हणून मोठी जबाबदारी दिली

पंतप्रधान कार्यालयाचे सचिव म्हणून युगंधर यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांची दिल्लीमधील इमेज एक स्वच्छ प्रतिमेचा कठोर अधिकारी अशीच होती.

देशातील सर्वात मोठे शक्तिस्थळ असणाऱ्या पदावर जाऊन ही युगंधर यांनी आपला साधेपणा सोडला नाही.

१९९२ साली त्यांच्या लाडक्या मुलाचा म्हणजेच सत्या नाडेला याचा विवाह त्यांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी व्ही.आर.वेणुगोपाल यांची मुलगी अनुपमा हिच्याशी ठरवला. अनुपमा हि देखील सत्याच्याच कॉलेजमध्ये मणिपाल इन्स्टिट्यूटमध्ये शिकली होती. त्यांची तेव्हापासूनची मैत्री होती. वेणुगोपाल हे देखील नरसिंहराव यांच्या पंतप्रधान कार्यालयात काश्मीर विषयक धोरणांचे सचिव होते.

इतक्या दोन मोठ्या दिग्गज अधिकाऱ्यांच्या मुलांचे लग्न म्हणजे मोठा थाटमाट असणार अशी दिल्लीकरांना अपेक्षा होती. त्यात सत्या नाडेला मायक्रॉसॉफ्ट सारख्या सगळ्यात प्रतिथयश कंपनीत उच्च पदावर होते. केंद्रातील सर्व मंत्री उच्च पदस्थ अधिकारी या लग्नाला हजर राहतील असं म्हटलं गेलं.

पण प्रत्यक्षात बी.एन.युगंधर यांची इच्छा आपल्या मुलाचं लग्न साधेपणानं करावं अशीच होती. त्यामुळे त्यांनी फक्त कुटूंब व काही मोजके मित्र यांना सोडून इतर कोणालाही निमंत्रण दिल नाही.

सत्या यांचं लग्न ठरलं आहे हि गोष्ट योगायोगाने पंतप्रधान नरसिंह राव यांना कळली. सत्या त्यांच्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झाले होते, त्यांनी आपल्या सेक्रेटरीला विचारलं,

“लग्न कधी आहे? मला पत्रिका दाखवा.”

सेक्रेटरी म्हणाले,

“सर युगंधर यांनी आपल्याला पत्रिका पाठवली नाही. आपले सुरक्षा कर्मचारी व कार्यकर्ते यांच्यामुळे लग्नाच्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो म्हणून त्यांनी तुम्हाला निमंत्रण देण्याचं टाळलं आहे.”

नरसिंह राव हसले पण काही बोलले नाहीत. लग्नाच्या दिवशी मात्र एका साध्या अँबेसेडरमध्ये कोणताही सरकारी ताफा न घेता ते अचानक विवाह स्थळावर आले. स्वतः पंतप्रधान वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत हे कळल्यावर मंडपात गडबड सुरु झाली.

नरसिंह राव यांनी सत्या नाडेला आणि अनुपम यांना स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि तिथूनच युगंधर व वेणुगोपाल या दोघांनाही निमंत्रण दिल नाही याबद्दल खरडपट्टी काढली. नरसिंह राव यांचा हा राग सत्या नाडेला यांच्यावरील प्रेमातून आला होता.

पंतप्रधान या समारंभात इतर पाहुण्यांप्रमाणे सहभागी झाले. जेवण केलं व पुन्हा पंतप्रधान निवासस्थानावर परतले.

आजही या अनोख्या लग्नाचे किस्से दिल्लीच्या चाणक्यपुरीत चवीने सांगितल्या जातात. पंतप्रधानांचे आशीर्वाद लाभलेला हा नवरा मुलगा पुढे मायक्रोसॉफ्टचा बॉस बनून जगभरात देशाचं नाव उज्वल करत आहे यामागे युगंधर यांनी दिलेले संस्कार व सच्चेपणाची शिकवण आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.