काँग्रेस पक्षाचे खजिनदार असलेले मोहिते पाटील विश्व हिंदू परिषदेचे स्वागताध्यक्ष बनले..
उंचापुरा बांधा, राकट वर्ण, पहिलवानी शरीर, डोक्यावर ऐटबाज गांधी टोपी. शंकरराव मोहिते पाटील यांना पाहिलं तरी त्यांचा दरारा जाणवून येई. दुष्काळी अकलूज माळशिरस भागात सहकाराची गंगा आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. प्रतिसरकारच्या चळवळीत बॉम्ब आणि बंदुकांसोबत खेळणारा हा क्रांतिकारक, नाना पाटलांच्या मुशीत त्यांची जडणघडण झाली.
शंकरराव मोहिते पाटलांचा मूळ पायाच काँग्रेसी विचारांचा होता. ग्रामीण भागातील बहुजन हितासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची राज्यात ओळख होती.
पुढे स्वातंत्र्यानंतरचा शेकापमध्ये गेलेला काही काळ वगळता त्यांचं संपूर्ण आयुष्य काँग्रेस मध्येच गेलं. हिंदुत्ववादी विचारसरणीपासून त्यांनी कायमच अंतर राखलं. हिंदुत्ववादी पक्ष देखील त्यांच्यापासून फटकून असायचे. साखर कारखाने, डेअरी उद्योग,
१९४९ साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राम्हण समाजाच्या विरोधात प्रचंड मोठी दंगल उसळली. सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची घरे जाळून टाकण्यात आली. लुटालूट झाली. अनेकांनी गाव सोडून पुण्यामुंबईची वाट धरली. या जळीतकांडामध्ये काँग्रेस कार्यकर्ते होते असे आरोप आरएसएस व हिंदू महासभेने केले.
या सगळ्या दंगलीमध्ये अकलूजमधून शंकरराव मोहिते पाटलांचं देखील नाव आलं. मोहिते पाटील आणि त्यांच्या भावांना अटक झाली. त्यांना काही महिने येरवडा जेलमध्ये कारावास सहन करावा लागला. पुढे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या.पर्यंत हे प्रकरण गेलं. मोहिते पाटील निर्दोष असल्याचं सिद्ध झालं आणि त्यांची सुटका झाली.
पण तेव्हापासून आरएसएस व हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून फटकून अंतर राखलं.
पुढे १९५२ साली विधानसभा निवडणुका आल्या. शंकरराव मोहिते यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. पुढे ते शेकापमध्ये गेले. सत्तेत नसून हि त्यांनी सहकारी चळवळ अकलूजच्या भागात रुजवली. डेअरी, सहकारी बँक, साखर कारखाना उभारला. त्यांची हि जिद्द बघून स्वतः यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं.
इथून पुढे काँग्रेसचा झेंडा त्यांनी नेहमी खांद्यावर धरला.
त्यांनी सहकाराची जादूची कांडी वापरून अकलूजच्या भागात विकासाने बदलले चित्र पाहायला दूरदूर वरून लोक येत असत. त्यांच्याबद्दल काही व्यक्तींनी जाणीव पूर्वक गैरसमज पसरवण्याचा देखील प्रयत्न केला. मुलाच्या लग्नासाठी त्यांनी आयोजित केलेल्या लक्षभोजनाची चर्चा तर दिल्लीपर्यंत झाली. पण शंकरराव मोहिते डगमगले नाहीत.
१९७७ साली त्यांना काँग्रेसचा खजिनदार बनवण्यात आलं. उभा महाराष्ट्र पिंजून त्यांनी पक्षाला मजबूत बनवण्याचं काम केलं. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. साखर कारखानदारीची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली. टीका टिप्पणी होत असूनही मोहिते पाटलांचं राजकारण कधी मागे पडले नाही.
एके दिवशी सकाळीच माळशिरसचे विष्णुपंत कुलकर्णी शंकररावांच्या बंगल्यावर भेटायला आले. त्याकाळी पंढरपूर येथे विश्व हिंदू परिषदेचे संमेलन होणार होते. विष्णुपंत कुलकर्णी या संमेलनाचे आयोजक होते. त्यांच्याबरोबरच विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादासाहेब आपटेही आले होते.
शिवराम शंकर आपटे उर्फ दादासाहेब हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक महामंत्री होते. एक विद्वान व तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची भारतभरात ओळख होती.
विष्णुपंतांनी आपटे येणार आहेत या बद्दल दोन दिवसांपूर्वीच शंकररावांना कल्पना दिली होती. दादासाहेब आपट्यांसारखा विद्वान माणूस आपल्याकडे चर्चेसाठी आला आहे याचा शंकररावांना फार आनंद झाला. त्यांच्या अगत्यशील बोलण्याचा आपट्यांवर खूपच प्रभाव पडला. पहिल्याच भेटीत मोहिते पाटलांनी आपट्यांना जिंकले.
या भेटीत दादासाहेब आपटे यांनी शंकरराव मोहिते पाटलांना पंढरपूरच्या विहिंपच्या संमेलनास येण्याचं आमंत्रण दिलं.
विश्व हिंदू परिषद म्हणजे हिंदू धर्माची परिषद होती; परंतु मोहिते पाटलांना स्वतःच्या धर्माचा जसा अभिमान होता तसा इतर धर्माबद्दलही आदर होता. सगळ्या धर्मामध्ये जगाला व्यापून राहिलेला मानवता हाच श्रेष्ठ आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
अनेकांना असे वाटत होते की, ‘शंकररावांसारखा काँग्रेसचा राजकारणी माणूस या धार्मिक कार्यक्रमात येणे कठीण आहे’; परंतु शंकरराव सकारात्मक विचार करणारे होते. नकारात्मक विचारांनी त्यांना कधी ग्रासले नाही. जे चांगले, उदात्त आणि मानवतेला धरून आहे ते करण्यात ते मागेपुढे पाहत नव्हते. इतरांच्यासारखे ओठात एक आणि पोटात एक असे ते करीत नव्हते.
मोहिते पाटलांनी आपली भूमिका निःसंदिग्धपणे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कळविली आणि ते यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवाचन दिले. विश्व हिंदू परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष’ म्हणून येण्याचे त्यांनी जाहीर करून टाकले.
त्यांना माहीत होते की, या अधिवेशनात अनेक लोकांशी संवाद साधण्याची एक संधी यानिमिताने मिळणार आहे. धर्मातील अधोगामी रूढी परंपरा-चालिरीती याबाबत सर्वसामान्य जनतेला काही विचार देता येईल यासाठीचे एक साधन म्हणून त्यांनी या परिषदेच्या अधिवेशनाकडे पाहिले.
काँग्रेस पक्षाच्या मोठ्या पदावर काम करत असतानाही विश्व हिंदू परिषदेचे स्वागताध्यक्ष होण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे श्रेष्ठत्वच सिद्ध करतो.
हे ही वाच भिडू.
- शंकरराव मोहिते-पाटलांवर बॉम्बहल्ला झाला होता
- मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी यशवंतरावांनी मान्यता नसलेल्या कारखान्याची फीत कापली
- ४५ हजार लोकसंख्या अन् ७ कोटीचं बजेट असणाऱ्या अकलूजमध्ये अजून ग्रामपंचायत का आहे?