१९९१ च्या जागतिकीकरणामध्ये मनमोहन सिंग यांच्यासोबत एका मराठी नेत्याचं देखील योगदान आहे..

डॉ.मनमोहन सिंग यांनी १९९१ साली देशाचं ऐतिहासिक आर्थिक बजेट सादर केलं आणि देशात खुले धोरण लागू झाले.

या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात, राजकारणात अमुलाग्र बदल घडून आला.

भारताचा इतिहास नव्याने लिहायचा झाला तर १९९१ पूर्वीचा भारत आणि १९९१ नंतरचा भारत असे सरळ सरळ दोन भाग करता येतील. या क्रांतीचे जनक होते डॉ. मनमोहनसिंग!!

डॉ. मनमोहन सिंग हे खरे तर अर्थकारणी. त्यांचा आणि राजकारणाशी थेट संबंध कधी आला नव्हता. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशा देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध येणाऱ्या पदांवर त्यांनी काम केलं होत.

देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ज्ञाची नेमणूक करायची म्हणून पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी  मनमोहन सिंग यांना बोलावलं होतं. मनमोहन सिंग यांना त्यांची धोरण ठरवण्यासाठी पंतप्रधानांनी पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यांच्या निर्णयात कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही याचे आश्वासन देण्यात आले होते.

त्यांच्या मदतीला एका अशा नेत्याला जोडून देण्यात आलं होत ज्याची ओळख स्वच्छ प्रतिमेचा अजातशत्रू नेता अशी होती.

चंद्रपूरचे खासदार शांताराम पोटदुखे

इंदिरा गांधींच्या काळापासून विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. जेव्हा आणीबाणीनंतर  सगळ्या देशाने साथ सोडली होती तेव्हा विदर्भातील कार्यकर्ते इंदिरा काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यावेळच्या निवडणुकांमध्ये जे तरुण खासदार निवडून आले त्यात शांताराम पोटदुखे यांचा समावेश होतो.

गोवा मुक्ती संग्रामात लढलेले ते स्वातंत्र्यवीर. चंद्रपूर गडचिरोली भागात त्यांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून झाला. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण या नेत्यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ते काँग्रेसच्या राजकारणात आले.

यशवंतरावांच्या नंतर मुख्यमंत्री बनलेल्या दादासाहेब कन्नमवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचं कार्य सुरु केलं. अगदी तळातल्या कार्यकर्त्यापासून ते जिल्ह्यातील एक मातब्बर नेता म्हणून त्यांनी प्रगती केली. मात्र या नेते बनण्याच्या काळातही त्यांनी आपला साधेपणा जाऊ दिला नाही.

१९६७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांनी मागितली होती. त्यावेळी संसदीय निवडणूक मंडळात मुलाखतीत वसंतराव नाईक व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी त्यांना सरळ प्रश्न विचारला,

‘तुमच्याखेरीज दुसरा कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो?’

क्षणाचाही विलंब न लावता ‘अ‍ॅड. एकनाथराव साळवे’ असे उत्तर त्यांनी दिले. या एका उत्तरामुळे त्यांचा मनाचा मोठेपणा तर कळतोच पण कोणत्या संस्काराच्या मुशीतून ते घडले होते याच देखील उदाहरण सांगतो.

स्वतंत्र विदर्भ मागणीची चळवळ जेव्हा आकारास येत होती तेव्हा ते तिथल्या अशा काही मोजक्या नेत्यांपैकी होते ज्यांनी या मागणीला स्पष्ट विरोध केला होता.

राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता  ते त्याकाळापासून आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत संयुक्त महाराष्ट्रात राहण्यातच विदर्भाचे हित होते व आहे, ही भूमिका मांडत राहिले.  

ज्या ज्या वेळी काँग्रेस फुटली त्या त्या वेळी ते इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे होते. या निष्ठेमुळे त्यांना  १९८० साली पक्षाचे तिकीट मिळाले. शांताराम पोटदुखे यांनी जोरदार प्रचार केला. त्यावेळच्या इंदिरा लाटेत त्यांनी जनता दलाचे लोकप्रिय खासदार राजे विश्वेश्वरराव यांचा मोठा पराभव केला.

तिथून सलग चारवेळा त्यांनी चंद्रपूर लोकसभेतून विजय मिळवला.

इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव यांच्याशी त्यांचे जवळचे नाते राहिले. मूळच्या आंध्रप्रदेशच्या नरसिंह राव यांना सलग दोन वेळा रामटेक मतदार संघातून निवडून आणण्यास त्यांचा मोठा वाटा होता.

१९९१ साली राजीव गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर काँग्रेस नेत्यांच्या चढाओढीत विजयी ठरले आणि त्यांनी पंतप्रधानपद पटकावलं. विदर्भाने आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून नरसिंह राव यांनी शांताराम यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं. फक्त इतकंच नाही तर त्यांचा अभ्यास, त्यांचे स्वच्छ चारित्र्य यामुळे त्यांना मनमोहन सिंग यांच्या अर्थमंत्रालयात राज्य मंत्री बनवलं.

अगदी शपथविधीपर्यंत शांताराम पोटदुखे यांना धक्का बसला होता, न मागूनही त्यांना मिळालेले हे मंत्रिपद अनेकांना बुचकळ्यात पडणारे ठरले.

आपल्या अर्थराज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी जागतिकीकरणाचे बजेट बनवण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग याना मोलाची साथ दिली. सभागृहातील व सभागृह बाहेर पत्रकारांच्या अवघड प्रश्नांना त्यांनी अभ्यासू उत्तरे दिली.

त्यावेळी नरसिंह राव यांच्या अर्थखात्यात तीन राज्यमंत्री होते. शेअर मार्केटमधला कुप्रसिद्ध हर्षद मेहता घोटाळा याच काळात झाला. त्यावेळी थेट पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावर देखील लाच स्वीकारल्याचे आरोप झाले. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा यात हात असण्याच बोललं जात होतं. डॉ.मनमोहन सिंग यांचा हात नसणार हे तर लहान पोराला देखील माहित होतं.

अशा काळात संशयाची सुई अर्थखात्यातील राज्यमंत्र्यांकडे फिरू लागली. अर्थराज्यमंत्र्यांमध्ये शांताराम पोटदुखे यांचा देखील समावेश होता. त्यावेळचे विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या घोटाळ्याच्या तपासाची मागणी जोरदार पणे लावून धरली होती.

एकदा त्यांनी भोपाळ येथे हर्षद मेहता घोटाळ्या बद्दल एक पत्रकार परिषद घेतली तेव्हा पत्रकारांनी थेट अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे नाव घेऊन प्रश्न विचारले, तेव्हा अडवाणींनी स्वतःचा निर्वाळा दिला की,

‘त्यांचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही.’

राजकारणाच्या धकाधकीत आपले चारित्र्य सांभाळणारे शांताराम पोटदुखे अशा मोजक्या नेत्यांपैकी होते ज्यांच्याकडे विरोधक देखील बोट उगारु शकत नव्हते. 

१९९६ साली त्यांचा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहिर यांनी पराभव केला. तिथून सक्रिय राजकारणातून ते निवृत्त होत गेले. मात्र शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मात्र त्यांनी शेवट पर्यंत चालू ठेवलं. सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक जाळे विणले होते. विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती.

विदर्भाच्या विकासासाठी धडपडणारा अजातशत्रू म्हणून ओळखलाओळखल्या जाणाऱ्या या नेत्याचं २०१८ साली वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. आजही त्यांच्या आठवणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून जिवंत आहेत.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.