मोदींची जंगी सभा झाली तरी गायकवाडांनी मनोहर जोशींना हरवलं होतं..

२००४ सालचा एप्रिल महिना. डोक्यावर उन्हे प्रचंड तापली होती आणि त्याच बरोबर देशात लोकसभा निवडणुकांचा प्रचार देखील तापला होता. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लोकप्रियता शिगेला पोहचली होती. त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रमोद महाजनांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा सल्ला दिला होता.

शायनिंग इंडियाच्या कॅम्पेनिंगनी संपूर्ण देशात बीजेपीची हवा सुरु होती. निवडणूक तज्ञ तर डोळे झाकून सांगत होते की भाजप जिंकणार. 

महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेसोबत युती होती. बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्यातील परस्पर आदर आणि मैत्रीमुळे दोन्ही पक्षांचे संबंध तसे चांगले होते. कोणत्याही कुरबुरी न होता तिकीट वाटप झालं होतं. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देखील जायचे.

शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते. यापूर्वी त्यांना केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश केला जायचा. त्यांनी लोकसभेचे सभागृह ज्या हातोटीने सांभाळले होते त्याच कौतुक विरोधी पक्ष देखील करत होते.

साठच्या दशकापासून दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला. स्वतः बाळासाहेब ठाकरे एकेकाळी दादर मध्ये राहायचे शिवाय मनोहर जोशींनी वॉर्ड स्तरापासून ते लोकसभेपर्यंत या मतदारसंघाची मजबूत बांधणी केली होती. मुख्यमंत्रीपद गेल्यावर बाळासाहेबांनी त्यांना दिल्लीच्या राजकारणात पाठवले तेव्हा ते मुंबई उत्तर मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले होते.

यंदा त्यांच्या साठी हि निवडणूक एकदम सोपी मानली जात होती.

त्यांच्या विरुद्ध उभे होते काँग्रेसचे एकनाथ गायकवाड.

एकनाथ गायकवाड मूळचे सातारचे. एका गरीब कुटूंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या नोकरी निमित्त मुंबईला आलेल्या गायकवाडांच बालपण धारावीच्या झोपडपट्टीत गेलं. परिस्थितीशी टप्पे टोणपे खात ते  मोठे झाले. धारावीच्या मातीने त्यांना चिवटपणा शिकवला. काँग्रेस पक्षाचं काम सुरु केलं. यातूनच राजकारण समाजकारण याची ओळख झाली. महापालिका पुढे धारावीतून आमदारकी जिंकली.

सलग चार वेळा धारावीचा आमदार झाल्यावर विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं.

पुढे मुंबई उत्तर मध्य मधून जेव्हा मनोहर जोशी यांनी उमेदवारी दाखल केली तर त्यांच्या विरुद्ध कोण उभं  राहणार हा प्रश्न समोर आला. तेव्हा दिल्लीतून आदेश आले ग्राऊंड वरचा कार्यकर्ता असणाऱ्या एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी.

दोन्ही उमेदवारांचे प्रचार सुरु झाले. मनोहर जोशी राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते. त्यांना वाटत होते आपल्याला हि निवडणूक सोपी जाईल. पण तस झालं नाही. एकनाथ गायकवाड यांचा तळागाळाशी संपर्क मजबूत होता. शिवाय धारावी तर त्यांचा गड होता. त्यांनी दिवसातले सतरा सतरा तास प्रचार करून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

मनोहर जोशींनी आपली निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवायचं ठरवलं होतं. त्यांनी आपल्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना उतरवलं. शिवसेनेच्या जोशींच्या प्रचारासाठी दिल्लीवरून राजनाथ सिंग, वरुण गांधी आले.

मनोहर जोशींची सर्वात गाजलेली प्रचार सभा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची झाली. 

मोदी तेव्हा अजून राष्ट्रीय नेते झाले नव्हते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात दंगलीमुळे त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. तेव्हा पासून कट्टर हिंदुत्ववादी तरुणांमध्ये ते बरेच फेमस झाले होते. हि हिंदुत्व वादी मते आपल्याकडे ओढून आणता येईल शिवाय दिल्लीत सुद्धा आपलं वजन वाढेल या विचाराने जोशींनी त्यांची प्रचार सभा आयोजित केली.

मोदींची सभा अपेक्षेप्रमाणे गाजली. त्यांनी धारावीच्या जनतेला हिंदुत्वाला मत द्या म्हणून साद घातली. आता तर मनोहर जोशी डोळे झाकून विजयी होणार असच मानलं गेलं.

पण एकनाथ गायकवाडांनी आपला प्रचार संपूर्ण पणे मोदींवर केंद्रित केला. मनोहर जोशी पराभवाला घाबरले आहेत म्हणून भाजपच्या नेत्यांना प्रचाराला बोलवत आहेत असं गायकवाडांचे कार्यकर्ते म्हणू लागले.

मनोहर जोशींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि केंद्रीय मंत्रिपदाच्या काळात मुंबईसाठी काय केलं हा सवाल एकनाथ गायकवाड आपल्या प्रचारात म्हणत होते. वाढती महागाई, मनोहर जोशींचा सर्व सामान्य जनतेशी तुटलेला संवाद याह प्रनिअम दिसत होता. धारावीत फक्त एकच प्रचार सुरु होता,

एकनाथ गायकवाड़ रहेगा तभी धारावी बचेगी वरना वो लोग तो इसे उजाड़ ही देंगे

मनोहर जोशींच्या विरोधातील असंतोष वाढत गेला. बघता बघता सोपी वाटणारी निवडणूक मनोहर जोशींच्या हातातून निसटली. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या विरुद्ध काम केलं असं म्हटलं गेलं.

मागच्या वेळी दीड लाख मतांनी निवडून आलेले मनोहर जोशी एकनाथ गायकवाड यांच्या विरोधात तेरा हजार मतांनी पडले. गायकवाड यांना देशभरात जायंट किलर म्हणून ओळखलं गेलं.

पराभवानंतर मनोहर जोशींना कारण विचारलं तर त्यांनी मोदींच्या सभेमुळे मला मुस्लिम मते मिळाली नाहीत व याचा काँग्रेसला फायदा झाला असं म्हणत पराजयाच खापर मोदींच्या डोक्यावर फोडलं. शिवाय उद्धव ठाकरेंची मी मुंबईकर ही कँपेन योजना देखील फसली याचाही तोटा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

या निवडणुकीनंतर एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेस मध्ये दिग्गज नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. मुरली देवरा, गुरुदास कामत, सुनील दत्त, कृपाशंकर सिंग या मोठ्या नेत्यांच्या मांदियाळीत त्यांचंही नाव घेतलं जाऊ लागलं. त्यांनी दोन वेळा खासदारकी जिंकली. 

पुढे मतदारसंघात झालेले बदल, मोदी लाट यामुळे एकनाथ गायकवाड यांचा पराभव झाला. मात्र मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद देखील त्यांनी काही काळ सांभाळलं. त्यांच्या कन्या वर्ष गायकवाड यांना गेल्यावर्षी ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

गेले काही दिवस एकनाथ गायकवाड कोरोना इन्फेक्शनने आजारी होते. आजच त्यांचे दुःखद निधन झाले. मुंबई काँग्रेसमध्ये जे काही मोजके लोकनेते उरले होते यात एकनाथ गायकवाड यांचा समावेश केला जायचा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.