राज्य कोण चालवत आहेत ठाकरे की पवार ; ही ८ प्रकरणे पाहिलीत तर उत्तर मिळून जाईल…

सध्या ओबीसी आरक्षण, प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब अशा अनेक गोष्टीमुळे राज्य सरकारवर संकट आली आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये २९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २ तासांहून अधिक वेळ चर्चा झाली.

वास्तविक ही या दोन्ही नेत्यांची पहिली भेट नव्हती. याआधी देखील अनेकदा ठाकरे सरकारच्या मदतीला, संकटात मध्यस्थीला शरद पवार धावुन आल्याचं बघायला मिळालं आहे. सोबतचं जिथं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेणं गरजेचं होतं तिथं शरद पवार यांनी भूमिका घेतली होती, तिथं सरकारचे संकटमोचक म्हणून पवार पुढे आले होते.

त्यामुळेच सातत्यानं एक प्रश्न उपस्थित होतो कि हे सरकार नक्की कोण चालवत?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार?

या प्रश्नांचं उत्तर जर समजून घ्यायचं असले तर अश्या कोणकोणत्या घटनांमध्ये शरद पवार धावून आलेत, किंवा त्यांनी भूमिका घेतली होती हे बघणं महत्वाचं ठरत.. 

१. उद्धव ठाकरे यांचं सभागृहाचं सदस्यत्व

गतवर्षी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांना ६ महिन्यांमध्ये विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणं बंधनकारक होतं. त्यासाठी त्यांनी विधानपरिषदेचा रस्ता निवडला.

मात्र राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून भगतसिंग कोश्यारींनी त्यांना नकार दिल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर संकट ओढवलं होतं. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आले. २७ एप्रिल २०२० रोजी शरद पवार-उद्धव ठाकरे यांची भेट झाली.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपालांना संपर्क करण्यात आला, निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली आणि १ मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. २१ मे रोजी निवडणूक होऊन उद्धव ठाकरे यांची खुर्ची वाचली.

२. पुणे आणि मुंबईमधील कोरोना आऊट ऑफ कंट्रोल

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये राज्यातील पुणे आणि मुंबई या ठिकाणचा कोरोना हाताबाहेर जात असताना तो कंट्रोल मध्ये आणण्यासाठी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता.

त्यानुसार शरद पवार यांनी ५ सप्टेंबर रोजी पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी बैठका, भेटींचा सपाटा सुरु केला. त्यादिवशी त्यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेला भेट देत तिथल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सूचना दिल्या.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव तसंच इतर अधिकार्‍यांची बैठक घेत त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यात देखील त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. पवार इथंच थांबले नव्हते. त्यांनी ७ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींची बैठक देखील घेतली.

मुंबईत देखील त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत अनेकदा बैठक घेतली, चर्चा केली अशा बातम्या येत होत्या. सोबतचं खुद्द शरद पवारांनी आता राज्याचं नेतृत्व हातात घ्यावं अशी देखील मागणी दबक्या आवाजात केली जात होती.

३. सचिन वाझे – अनिल देशमुख

अंबानींच्या घराजवळ आढळलेली स्फोटके सापडल्यानंतर त्यामध्ये सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचं नाव पुढे आले होते. त्यामुळे थेट सरकारवर टिका करण्यात येत होती. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे हे थेट समोर येत नव्हते. ते बॅकफूटवर गेले का अशी चर्चा पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर १६ मार्च रोजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली, जवळपास १ तास चर्चा झाली.

यात माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार शरद पवार यांनी मंत्र्यांसह सरकारला काही सल्ले दिले. सोबतच या प्रकरणात आरोपांना चोख प्रत्युत्तर द्या, उगाच बॅकफूटवर जाण्याची गरज नाही, असा आदेश दिल्याचे सांगितले.

त्यानंतर मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप झाले. वास्तविक त्यावेळी देशमुख हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असले तरी ते त्यावेळी राज्य सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन भूमिका मांडणं गरजेचं होतं.

मात्र त्यावेळी देखील आक्रमकपणे शरद पवार यांनी देशमुख यांची भूमिका उचलून धरली होती. सोबतच राजीनामा देण्याची गरज नसल्याचं मत मांडलं होतं. दिल्लीत देखील त्यांनी अशा बैठका घेतल्या होत्या.

४. संजय राठोड प्रकरण

राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड हे एका महिलेच्या आत्महत्यामुळे चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी मागणी जोर धरत होती. पण ते गायब असल्यामुळे सरकारसाठी अडचणीचे ठरले होते. सोबतच त्यांनी पोहरादेवी मध्ये केलेल्या गोंधळामुळे राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली.

त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी संजय राठोड यांच्याबाबत  शरद पवार यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्याची माहिती माध्यमांमधून देण्यात आली होती.

सोबतच संजय राठोड यांच्यावर जे आरोप होत आहेत व पोहरादेवीमध्ये जो प्रकार घडला ते पाहता सरकार आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला फटका बसत आहे. त्यामुळेच तपास पूर्ण होईपर्यंत राठोड यांनीच पदापासून दूर राहावं, असा सल्ला देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता.

५. मंत्र्यांवरील नाराजी

मे च्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यात अजित पवार, जयंत पाटील यांनी काही निर्णयांवरून कॅबिनेटच्या बैठकीत उघड नाराजी व्यक्त केली असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

मात्र या दोन्ही मंत्र्यांचं वागणं उद्धव ठाकरे यांना आवडलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी २६ मे रोजी लगेचचं शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर, “हे सरकार चालवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही’  असं ठाकरेंनी पवारांना सांगितलं होतं.

मात्र त्यानंतर या तिन्ही पक्षातील तणाव निवळला होता.

६. शरद पवार – बाळासाहेब थोरात भेट 

पदोन्नती आरक्षण आणि कृषी कायद्याबद्दल चर्चा यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

पदोन्नती आरक्षणावरून राज्य सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बराच तणाव निर्माण झाला होता. सोबतच केंद्राच्या कृषी कायद्यात काही बदल करण्याबाबत देखील चर्चा केली होती.

त्यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम असे सगळे मंत्री उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या शिष्टमंडळाची सुमारे तासभर चर्चा झाली होती. त्यावेळी देखील शरद पवार सरकारमध्ये नसताना मंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे बरीच चर्चा झाली होती.

७. आशा सेविका संपात मध्यस्थी 

राज्यात मागच्या बऱ्याच दिवसांपासून आशा सेविकांचा संप चालू होता. त्यावेळी आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी करणं अपेक्षित असताना यात शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचं समोर आलं होतं.

कृति समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील हे अनेक दिवस शासनाशी चर्चा करत होते. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या बऱ्याच मागण्या फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे संप अधिकच चिघळाला.

मात्र अखेरीस १८ जून रोजी पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या वेळी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत लवकरच समाधानकारक तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन पवार यांनी दिलं आणि त्यांची मध्यस्थी यशस्वी ठरली, संप मागे घेण्यात आला.

८. राजू शेट्टी यांनी शरद पवारांकडे तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली…

राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी २९ मे रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात राज्य सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी पवारांकडे केली होती. त्यावेळी मेधा पाटकर या देखील तिथं उपस्थित होत्या.

मात्र त्यासोबतच शेट्टी यांनी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची देखील तक्रार शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन पवारांनी दिलं होतं. 

मात्र शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याच्या २४ तासांच्या आतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. काल सकाळी तक्रार केली कि संध्याकाळी ही भेट झाली होती.

मात्र आता या सगळ्या घडामोडींमुळे राज्यात मागच्या काही दिवसांमध्ये कोणतंही संकट आलं कि शरद पवार धावून येतात, कोणत्याही प्रश्नी ते यशस्वी मध्यस्थी करतात, त्यांच्याकडे तक्रार केल्यास मुख्यमंत्री लगेच ऐकतात असे काही मेसेज जात असल्याचं दिसून येत आहे.

सोबतच त्यामुळे राज्य नक्की कोण चालवत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कि शरद पवार असा प्रश्न देखील त्यातून उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.