वडिलांच छत्र हरपल्यानंतर जयंत पाटलांना खरा आधार दिला तो शरद पवारांनी म्हणूनच..

नुकताच एकनाथ खडसे यांचं भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगमन झालं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षांतर पार पडले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून जयंत पाटलांची ओळख आहे.

पण एक काळ होता जयंत पाटील पवारांच्या पक्षात येण्यास इच्छूक होते आणि शरद पवार इतरांचा पक्ष फोडायचा नाही म्हणून जयंत पाटलांचा पक्षांतरास विरोध करत होते.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली.

सांगली जिल्ह्याचे लोकनेते माजी मंत्री राजारामबापू पाटील यांचे अकाली निधन झाले. बापूंनी वाळवा तालुक्यात सहकाराचे जाळे पसरलेले होते, अनेक कारखाने उभारले होते, वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या होत्या. मात्र हा सगळं विकास त्यांच्या निधनामुळे पोरका झाला.

बापूंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे सुपुत्र जयंत पाटील यांना तालुक्याचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. नुकताच अमेरिकेतून इंजिनीयरिंगचं शिक्षण पूर्ण करून आलेले जयंत पाटील अवघ्या २१-२२ वर्षांचे होते. त्यांना कोणताही राजकीय अनुभव नव्हता. अशावेळी त्यांच्यावर खूपच मोठी जबाबदारी येऊन पडली होती.

निधन झालं तेव्हा राजाराम बापू जनता पक्षात होते. मूळच्या काँग्रेसी विचारांच्या राजाराम बापूंचे जिल्ह्यातच वसंतदादा पाटील यांच्याशी उभा दावा होता. या वादातूनच बापूंनी १९७८ साली काँग्रेससोडून जनता पक्षात प्रवेश केला होता.

शरद पवारांनी जेव्हा वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केलं तेव्हा बापू त्यांच्या सोबतच होते. पवारांच्या मंत्रिमंडळात राजाराम बापू कॅबिनेट मंत्री होते. पण इंदिरा गांधी यांनी पुनरागमन केल्यावर पुलोद सरकार बरखास्त केले.  

सत्ता गेल्यावर शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेस पक्षातून जवळपास ५० आमदार पक्ष सोडून गेले.

त्यांचे विरोधी पक्ष नेतेपद देखील गेलं होतं. पवारांनी पुन्हा शून्यापासून सुरवात केली. त्यांनी महाराष्ट्रभर काढलेल्या शेतकरी दिंडीत त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांमध्ये राजाराम बापू आघाडीवर होते.

दोघांचे पक्ष वेगळे होते मात्र एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास होता.

राजाराम बापूंच्या मृत्यूनंतर जयंत पाटलांना राजकारणात वडिलकीचा आधार पवारांचाच उरला होता. शरद पवार हे जयंत पाटलांसाठी लहानपणापासून आदर्श राहिले होते. दहा वर्षांचे असताना शिमला येथे काँग्रेसच्या अधिवेशनात पवारांना त्यांनी जवळून पाहिलं होतं. तेव्हा पासून ते पवारांचे फॅन बनले होते.

१९८४ साली जयंत पाटील त्यांच्या भागातील कार्यकर्त्यांसह शरद पवारांच्याकडे गेले.

या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना आम्हाला पक्षात घ्या असे साकडे घातले. शरद पवार पक्ष बांधणी करत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले नेते त्यांच्या पक्षात आले तर त्यांना चालणारच होतं मात्र तरीही ते जयंत पाटील यांना म्हणाले,

“नुकताच बापूंचे निधन झाले आणि लगेच मी तुम्हाला घेतल्यावर जनता पक्ष फोडल्याचा माझ्यावर आरोप होईल. त्यामुळे आता थोडा काळ तुम्ही थांबा. “

शरद पवार राष्ट्रीय पातळीवर जनता पक्षाच्या आघाडीत होते. आपला पक्ष मोठा करण्यासाठी आपला मित्र पक्ष फोडणे त्यांना पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी जयंत पाटलांना सहज शक्य असूनही पक्षात घेतलं नाही.

पुढे बापू घराण्याशी अनेक वर्षांचा वाद असूनही वसंतदादा पाटलांनी तीनचार वेळा आग्रह करून जयंत पाटलांना काँग्रेसमध्ये आणले. पुढे शरद पवार देखील काँग्रेसमध्ये आले. मुख्यमंत्री देखील झाले.

१९९१ साली जेव्हा पवारांना हटवून सुधाकरराव नाईक याना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तेव्हा सांगली जिल्ह्यातील सर्व नेते शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुधाकरराव नाईक यांच्या गटात गेले होते. नव्यानेच आमदार म्हणून निवडून आलेले जयंत पाटील देखील या गटात होते. जयंत पाटलांच्या या कृतीमुळे पवारांच्यात व त्यांच्यात थोडंसं अंतर पडलं होतं.

मात्र जेव्हा शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी जयंत पाटलांना एकदा भेटायला बोलावून घेतले आणि तुमचा मतदारसंघ पाहायची इच्छा आहे असं सांगितलं. जयंत पाटलांनी वाळवा तालुक्यात मोठी सभा आयोजित केली.

शरद पवारांच वाळव्यात जबरदस्त भाषण तेव्हा झालं. या सभेनंतरच दोघांच्यातील सूर जुळले, त्यांच्यातील अंतर गळून पडलं.

पुढे जेव्हा १९९९ साली शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला तेव्हा जयंत पाटलांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले,

“बापूंचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. पण मला राजकीय कोण गॉडफादर नाही. “

यावेळी मात्र शरद पवार त्यांना म्हणाले,

“तू माझ्या मुलासारखा आहेस. काही काळजी करू नकोस. तू तुला योग्य वाटेल तो निर्णय घे.”

त्यानंतर मात्र जयंत पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झाले.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.