बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपला दणका दाखवला..
शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ निर्बंधामुळे होवू शकला नाही. गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मर्यादीत स्वरूपात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहाने दसरा मेळावा पार पडला . बाळासाहेबांनी शिवाजी पार्क वर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती.
बाळासाहेब दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेब पुढे पक्षाची काय दिशा असेल यावर भाष्य करत. विरोधकांचा सुद्धा खरपूस समाचार ह्याच दसरा मेळाव्यात घेतला जात असे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, शरद पवार यांचा सुद्धा दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे.
विरोधकांवर टीका करण्याची हीच प्रथा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पुढे चालू ठेवली.याच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
बाळासाहेबांच्या निधनानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्यात एक अशी घटना घडली होती की जी आज ही प्रत्येक शिवसैनिक विसरलेला नाही.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या अनुपस्थित होणाऱ्या २०१३ च्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होतं. उद्धव ठाकरे ह्या दसरा मेळाव्यात कोणाला टोला लागवणार याकडे सर्वांची नजर होती.
पण तुम्हाला माहितीये का कि बाळासाहेबांच्या निधनानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी चक्क बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मनोहर जोशींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले होते त्याच मनोहर जोशींना टोला लगावला होता.
नक्की काय झालं होतं त्या दसरा मेळाव्याला तुम्हाला पण उत्सुकता लागलीये ना जाणून घ्यायची….सांगतो सविस्तर
ही गोष्ट आहे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची,२००४च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मनोहर जोशी यांना शिवसेनेने राज्यसभेवर पाठवले. त्यांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याऐवजी पक्षाने अनिल देसाई यांना राज्यसभेवर पाठवले होते. मात्र त्यानंतरही जोशी यांनी मतदारसंघात आपले काम सुरूच ठेवले होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा उमेदवारी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मात्र त्यांना दक्षिण मध्य मुंबईऐवजी कल्याणमधून उभे राहता येईल का, याची चाचपणी करण्यास पक्षाने सांगितले होते.
दक्षिण मध्य मुंबईतूनच आपण पुन्हा निवडून येऊ, असा जोशी यांना विश्वास होता. पण पक्षाने राहुल शेवाळे यांना मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश दिले.त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई च्या अनेक भागात राहुल शेवाळे यांचे फ्लेक्स झळकू लागले होते. अपेक्षेप्रमाणे राहुल शेवाळे यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून तिकीट सुद्धा मिळाले. यानंतर स्वाभाविकपणे मनोहर जोशी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मनोहर जोशी यांनी दादरच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या थेट टीकेने शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला होता.शिवसैनिकांमध्ये मनोहर जोशी यांच्या बद्दल नाराजी पसरत होती. तेवढ्यात काही दिवसांवर शिवसेनेचा दसरा मेळावा येऊन ठेपला होता. हा दसरा मेळावा पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितत होणार होता.
शिवाजी पार्कवर मेळाव्याला सुरुवात होऊनही बराच वेळ मनोहर जोशी व्यासपीठावर आले नव्हते. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमनानंतर मनोहर जोशी व्यासपीठावर आले.
जोशी आल्याचे दिसताच व्यासपीठासमोर असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात हाय, हाय, मनोहर जोशी मुर्दाबाद अशी घोषणाबाजी सुरू केली होती. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. मनोहर जोशी स्वत:ही बुचकळ्यात पडले. उद्धव ठाकरे यांनी हात उंचावून शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, शिवसैनिकांच्या घोषणा सुरूच राहिल्या. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मनोहर जोशी यांनी लगेचच तेथून काढता पाय घेतला. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही.
जोशी सरांच्या निमित्ताने मेळाव्यात झालेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चकार शब्दही काढला नाही. ‘शिवसेनेत मी बेबंदशाही खपवून घेणार नाही’, इतकाच इशारा उद्धव यांनी दिला. हा इशारा शिवसैनिकांसाठी होता की सरांसाठी हे मात्र कळू शकले नाही.
विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी चर्चेत असतो परंतु बाळासाहेबांनी ज्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं होतं त्या मनोहर जोशींचा ज्या दसरा मेळाव्यात अपमान झाला होता तो दसरा मेळावा सुद्धा चर्चेत राहिलेला आहे.
हे ही वाच भिडू :
- तेव्हा जावेद अख्तर यांना वाचवायला फक्त शिवसेनाच धावून आली होती
- आज जिथे दसरा मेळावा होणार, तो षण्मुखानंद हॉल सेनेच्या सर्वात मोठ्या शत्रूने उभारलाय..
- बाळासाहेबांनी शिवरायांच्या साक्षीने वचन दिलेलं की कॉंग्रेसबरोबर जाणार नाही.