बाळासाहेबांनी शिवरायांच्या साक्षीने वचन दिलेलं की कॉंग्रेसबरोबर जाणार नाही.
इतका दिवस चाललेला सत्तेचा तिढा अजून सुटलेला नाही. महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री सरकार स्थापन करणार याची घोषणा होणार होती. पण ऐन वेळी कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नाही आपण राजभवनात गेलेल्या शिवसेनेला तोंडावर पडावे लागले.
खरे तर शिवसेना आणि भाजपच्या युतीचा संसार तब्बल तीस वर्षाचा. आधी अनेक वर्ष रुसवेफुगवे चालले. पण गेल्या पाच वर्षापासून तर भांडणे विकोपाला गेली होती. कधी सरळ घटस्फोट दिला तर परत कधी तडजोडी करून परत संसार सुरु केला.
पण तरीही काल अधिकृतरित्या सेनाभाजप युतीचा काडीमोड केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राजीनामा दिलाच होता शिवाय भाजपने स्पष्ट केले की आम्ही पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापन करत नाही आहोत.
अनेक दिवसापासून नुसता चर्चेत असणारी शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस ही आघाडी प्रत्यक्षात येणार असे चित्र निर्माण झाले. तिला नावही देण्यात आले होते,
“महाशिवआघाडी”
मुंबईमध्ये मराठी माणसावर होणारा अन्याय रोखण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती. राजकारणात व समाजकारणात घडणाऱ्या व्यंगावर फटके मारणाऱ्या बाळासाहेबांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या जहाल विचारांचा वारसा होता.
प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्य पाच शिलेदारांपैकी एक होते. त्यांनी कॉंग्रेसच्या तत्कालीन नेत्यांवर ठाकरी भाषेत प्रचंड टीका केली होती.
याचा अर्थ असा नव्हता की त्यांचे कॉंग्रेसच्या नेत्यांशी वैयक्तिक वाद होते. बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिक या व्यंगचित्रसाप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाणांच्या हातून करण्यात आले. ठाकरेंवर यावरून टीकाही झाली. तेव्हा त्यांनी मार्मिक मधून त्याला उत्तर देण्यात आले,
“आम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी आहोत पण यशवंतराव हे ही महाराष्ट्राचे नेते आणि तरुण कर्तुत्वशीलपुरुष आहेत.”
पुढे शिवसेनेच्या स्थापनानंतर बाळासाहेबांची भूमिका आणि कॉंग्रेसची भूमिका एकमेकांच्या विरोधीच होती. पण महाराष्ट्र कॉंग्रेसचे अनेक नेते बाळासाहेबांच्या बद्दल सहानुभूती असणारे होते. यात सर्वात पुढे नाव होते वसंतराव नाईक.
जेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री बनले तेव्हा मार्मिकमधून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर स्तुती सुमनांची उधळन केली होती.
बाळासाहेब स्वतः मार्मिक मधून कॉंग्रेसचे नेते महाराष्ट्राशी कसे बेईमान आहेत हे सांगायचे पण त्याच मार्मिकच्या वर्धापनदिनाला हमखास कॉंग्रेस नेत्यांची हजेरी असायची. यात प्रमुख नाव असायचे बाळासाहेब देसाई. त्यांनी तर थेट आपल्या भाषणात सांगितलेलं,
“महाराष्ट्रीय माणसाना पुन्हा मर्द बनवण्यासाठी ठाकरे आपला कुंचला आणि लेखणी वापरणार असतील तर त्या कामास आपला आशीर्वाद असेल.”
६७ साली मुंबईत झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तर शिवसैनिकांनी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी संरक्षणमंत्री कृष्ण मेमन यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या स.गो.बर्वेंच्या विरोधात प्रचार केला. आचार्य अत्रेंची सभा उधळून लावली.
सेनेचा दरारा या विजयामुळे वाढला.
दाक्षिणात्य लोकांनी मुंबईतल्या मराठी तरुणांच्या नोकऱ्या हडपल्या या विरुद्धचे लुंगी हटाव आंदोलन तीव्र करण्यात आले. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करण्यात येत होते. मुंबईमध्ये चर्चा होती की यासगळ्याला मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा वरदहस्त आहे. पोलीसांच्या शिवसेनेवर कारवाईकरतानाच्या निष्क्रीयतेमुळे हा आरोप आणखी गडद होत गेला.
शिवसेनेला थेट वसंतसेना म्हणण्यात येऊ लागले.
परत १९७४ साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या बॅरीस्टर रामराव आदिक यांना पाठींबा दिला. यामागे कारण होते की आदिकांनी कृष्णा खोपडे खून खटल्यात बाळासाहेबांचे वकीलपत्र घेतले होते. याच निवडणुकीपासून कॉंग्रेस आणि शिवसेना अधिकृत आघाडी अस्तित्वात आली.
आणीबाणीच्या वेळेस तर संपूर्ण देशात इंदिरा गांधींच्या दडपशाही विरुद्ध जनमत बनले होते पण तरीही शिवसेनेने त्यांना थेट पाठींबा जाहीर केला. बाळासाहेबांच्या या भुमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. स्वतः संजय गांधीची बाळासाहेबांशी बोलणी झाली आहे व त्यामुळे शिवसेना आणिबाणीला पाठींबा देत आहे अशी वदंता होती.
असही म्हटल जात होत की जेलची भीती दाखवून कॉंग्रेसने त्यांचा पाठींबा मिळवला आहे.
आणीबाणी उठल्यावर काही शिवसैनिक कॉंग्रेसविरोधी जनता पक्षाच्या आघाडीत जाण्याची बाळासाहेबांना विनंती करत होते पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. तेव्हाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर यांच्या सारखे नेते पडले.
परत दोन वर्षांनी झालेल्या निवडणुकीत तर बाळासाहेबांनी इंदिरा कॉंग्रेस बरोबर डील केली की शिवसेना एकही उमेदवार उभा करणार नाही त्याबदल्यात कॉंग्रेसने त्यांचे दोन आमदार विधानपरिषदेवर पाठवायचे.
पण दरम्यान पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडून पुलोदचे सरकार बनवले. त्यात जनतापक्षापासून ते कम्युनिस्टपक्ष, समाजवादी पक्ष, जनसंघ असे टोकाची विचारसरणी असणारे पक्ष सरकारमध्ये होते, फक्त शिवसेना अजूनही सत्तेच्या आसपासदेखील नव्हती.
बाळासाहेब सगळ्या घटनाक्रमाकडे तटस्थपणे पहात होते. शिवसेना संपल्यात जमा होती.
जेव्हा कामगारांचे गिरणी आंदोलन सुरु झाले तेव्हा मराठी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनावर हल्ले झाले. हे हल्लेसुद्धा कॉंग्रेसच्या अंतुलेंनी गिरणी संप बंद पडावा म्हणून शिवसेनेला करायला लावले आहेत असेही आरोप झाले. बाळासाहेबांनी त्याला भिक घातली नाही. अन्तुलेंशी असलेली आपली मैत्री त्यांनी कधी लपवली नाही.
कॉंग्रेसने पुढे मुख्यमंत्री बनवलेल्या बाबासाहेब भोसलेंच्या विरुद्ध मात्र बाळासाहेब आक्रमक होते. याच काळात गिरणी संप चिघळला. कॉंग्रेसने शिवसेनेला दिलेली म्हाडाचे अध्यक्षपद वगैरे आश्वासने पाळली नाहीत. म्हणून अखेर बाळासाहेबांनी मुंबईत कामगार मैदानात मेळावा घेतला आणि तिथे जाहीर केले की
“आज दि. ९ सप्टेंबर १९८२ रोजी, आता ८ वाजून १० मिनिटांनी मी या तमाम मेळाव्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जाहीर करत आहे की इंदिरा कॉंग्रेसशी असलेली दोस्ती मी सोडत आहे. “
याच सभेत त्यांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री शरद पवार होतील अशी भविष्यवाणी देखील केली होती.
त्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात ठाकरेंच्या डाव्या उजव्या बाजूला कॉंग्रेसचे बंडखोर शरद पवार आणि डाव्या चळवळीचे बंद सम्राट जॉर्ज फर्नांडीस हे होते.
स्टेजवरील ही मैत्री राजकारणात प्रत्यक्षात येऊ शकली नाही. पवारांनी कॉंग्रेसमध्ये परतीची वाट धरली. सीमाप्रश्नाच्या लढ्यात दोघे एकत्र राहिले. वैयक्तिक जीवनात त्यांच्या दोस्तीमध्ये रंग भरले, पण पवारांची आणि बाळासाहेबांची वाट वेगळीच राहिली.
अखेर प्रमोद महाजन यांच्या मध्यस्तीमुळे बाळासाहेबांनी १९८७ साली भाजपशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पहिल्यांदा युतीचा प्रयोग केला.
हे ही वाच भिडू.