डांगेनी दिलेल्या एका धमकीला घाबरून काँग्रेसने महाराष्ट्राचा मुंबईवरचा हक्क मान्य केला..

गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन पेटले होते. मोरारजी देसाईंच्या सारख्या हेकेखोर मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला वैतागून महाराष्ट्रात वेगळे राज्य हवे हि भावना तीव्र झाली होती. आपला विकास गुजरात कडे वळवला जात असल्याचं चित्र डोळ्यासमोर होतं पण तेव्हाच केंद्रीय नेतृत्व मात्र वेगळा महाराष्ट्र द्यायचा नाही या मतावर ठाम होतं.

विशेषतः वाद मुंबई वरून सुरु होता. मुंबई शहरात मराठी लोकसंख्या जरी जास्त असली तरी आर्थिक नाड्या हातात असलेल्या गुजराती उद्योगपतींचं म्हणणं मुंबई आमची असं होतं. मुंबई काँग्रेसचे स.का.पाटील सारखे दिग्गज मराठी नेते देखील

“आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही”

अशा वलग्ना करत होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हि भावना वाढीस लागली होती. आंदोलनाने पेट घेतला होता. विशेषतः मुंबई मधील कामगार वर्ग या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला होता. आझाद मैदानात झालेल्या ५ हजार कामगारांच्या मोर्चावेळी मोरारजी देसाईंनी गोळीबार केला. त्यानंतर तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला तो सत्ताधाऱ्यांना आवरता येणार नाही एवढा वाढला.

सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले तरी लढ्याचं मुख्य नेतृत्व एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले.

श्रीपाद अमृत डांगे म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा व पर्यायाने देशभरातल्या कामगारांचा सर्वोच्च नेता. 

भारतात कामगारांचा पहिला संप घडवला तो डांगे यांनीच. त्यांनी भारतावरच्या ब्रिटिश राजवटीत आयुष्याची १३ वर्षे तुरुंगात काढली. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. डांगे हे अप्रतिम वक्ते होते. प्रारंभी शांत आणि सौम्य आवाजात सुरू झालेली त्यांची माहितीपूर्ण भाषणे प्रसंगी आणि अंती प्रक्षोभक असत.

मुंबईच्या गिरणीतील व इतर कामगारांचेही कॉ.डांगे हे एकमेव नेते होते. मध्यमवगीर्यांच्या अनेक संघटना त्यांच्याकडे होत्या. त्यामुळेच या चळवळीसाठी कामगारांची व इतर कर्मचाऱ्यांची फार मोठी फळी त्यांनी निर्माण केली. कामगारांच्या आणि नोकरदार वर्गाच्या पाठींब्यावरच कॉ.डांगे यांनी रणशिंग फुंकले.

डांगे आणि एस.एम.जोशी यांनी फार समजुतीने समितीचे नेतृत्व केले. कॉं.डांगे या चळवळीकडे केवळ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने पाहत नव्हते तर त्यात त्यांना पक्षबांधणी साधायची होती, पक्ष लोकप्रिय करायचा होता. लोकआंदोलन उभे राहिले की, त्यात आपण असावयास हवे हा कम्युनिस्ट पक्षाचा नेहमीचा विचार त्यामागे होता.

मुंबईवर पकड ठेवण्याचा प्रयत्न भांडवलशहा करीत होते व त्यांच्या विरोधात कॉ.डांगे यांनी मुंबईच्या कामगाराला उभे केले होेते. आंदोलन वाढल्यावर काँग्रेसचे नेते मुंबईला वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागे लागले होते.

कॉ.डांगे हे मुरब्बी राजकारणी. एकदिवस अचानक शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत कॉ.डांगे यांनी स्वतंत्र मुंबई राज्याला पाठींबा दर्शवला. त्यांच्या या भाषणानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले कार्यकर्ते संभ्रमात पडलेच पण त्यामुळे कॉंग्रेस जन हादरून गेले.

नेहरूंचे जवळचे समजले जाणारे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांनी ताबडतोब डांगे यांना फोन केला. डांगे त्यांना म्हणाले,

‘काका मामला सरळ आहे. मुंबईचे ग्रीसमधील सिटी स्टेटप्रमाणे स्वतंत्र राज्य झाले तर या मुंबईवर डाव्या पक्षांचा लाल बावटा फडकलाच म्हणून समजा.’

हे ऐकल्यावर गाडगीळ नेहरूंकडे गेले आणि डांगे यांचे म्हणणे त्यांनी नेहरूंच्या कानावर घातले. मुंबईवर कम्युनिस्टांचे राज्य येईल या भीतीने दोनच दिवसात मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा बंद झाली.

कॉ.डांगे यांचे डावपेच अशा तऱ्हेने उपयोगी पडले. कॉ.डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली.

सर्वात आधी महाराष्ट्र राज्यनिमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ.डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले,

‘अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा मे दिन हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.’

पुढे काही दिवसांनी कॉ.डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. ‘आम्हाला एप्रिल फूल करताय का?’ असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला.

संदर्भ- माधव गडकरीलिखित ‘संयुक्त महाराष्ट्राचे महारथी’

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.