रक्ताने माखलेले हात धुण्यासाठी ती करतेय रामायणाचा जप…

एक काळ होता गुन्हेगारी विश्वात पुरुषांचं वर्चस्व होतं. मात्र काळ जसा पुढे पुढे गेला तश्या पुरुषांच्या  खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा पुढे आल्या. यात प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते फूलन देवीचं. मात्र, तिच्या बरोबरच अजून एक लेडी डाकू होती जिने एकाच वेळी १५ लोकांना गोळ्या घालून मारून टाकलेलं. इतकंच नाही तर, फुलन देवीच्या गँगमध्ये राहून तिच्याशीच वैर सुद्धा ठेवलं होतं

ही कहाणी आहे डाकीण कुसुमा नाइनची

कुसुमाचा जन्म उत्तरप्रदेश मधील जालोन जिल्ह्यात १९६४ मध्ये झाला. तिचे वडील हे गावचे सरपंच होते. ती चांगल्या घरात वाढली होती. त्यात ती घरातील सगळ्यात लाडकी होती. लहान वयातच ती  गावातली माधव मल्लाह या तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी तिचं वय फक्त १३ ते १४ वर्ष होतं. एक दिवस संधी पाहून ती माधव सोबत पळून गेली.

कुसुमाच्या वडिलांनी पोलिसांच्या मदतीने तिला घरी परत आणलं. काही दिवसांनी तिचं दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देण्यात आलं. पण ती एवढ्यात हार मानणारी नव्हती. कुसुमाची खरी कहाणी इथूनच सुरु झाली.

माधव आणि कुसूमचं पुन्हा मिलन झालं.

इकडे माधव कुसुमाला  विसरू शकत नव्हता. त्यातच गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. ७० च्या दशकात उत्तरप्रदेश मधील कुप्रसिद्ध असलेल्या विक्रम मल्लाहच्या गॅंग मध्ये तो सामील झाला. काही दिवसांनी माधव गॅंग मधल्या सहकार्यांसोबत कुसुमाच्या घरी गेला आणि तिला उचलून चंबळ भागात घेऊन आला. आता कुसुमा माधव सोबत विक्रम मल्लाहच्या गॅंग मध्ये सहभागी झाली.

विक्रमच्या गँगमध्ये कुसुमाला कुणी स्विकारलंच नाही.

विक्रम मल्लाहच्या गॅंग मध्ये एक लेडी डाकू अगोदरच होती. ती विक्रम मल्लाहच्या सगळयात जवळची होती. अगदी गँगमधला एकही जण हा तिच्या शब्दाबाहेर नव्हता. तिचं नाव होतं फुलन देवी… या फुलन देवीला कुसुमाचं गँगमध्ये येणं पटलं नव्हतं. त्यामुळे ती वेगवेगळ्या मार्गांनी कुसुमाला त्रास द्यायची आणि विक्रम आणि माधव हे दोघंही नेहमी फुलनचीच बाजू घ्यायचे. त्यामुळे फुलन ही आधीच वैतागली होती आणि त्यातच फुलनने स्वत:हून तिला गँगमधून बाहेर पडायची संधी दिली.

डाकू लालाराम याला प्रेमाच्या जाळ्यात फसवून मारण्यासाठी कुसुमाला पाठवलं

आता ती गेली होती ते लालारामवर प्रेम करण्याचं नाटक करायला पण, ती खरंच त्याच्या प्रेमात पडली. नंतर मग ती कालारामच्याच गँगमध्ये सामील झाली. असंही तिला विक्रम मल्लाहच्या गँगमधून बाहेर पडायचंच होतं. आता लालारामने तिला बंदुक आणि बाकीची हत्यारं चालवायला शिकवली. बघता बघता ती खून, दरोडे, मारहाण सगळे गुन्हे करायला लागली.

पुढे तिच्या नावाची दहशत इतकी पसरली की, मोठे मोठे गुंड, डाकू तिच्या नावाने घाबरायला लागले. या सगळ्या दरम्यान तिचा मल्लाह आणि फुलन देवी बद्दलचा राग कमी झाला नव्हता. म्हणून मग तिने लालारामला सोबत घेऊन विक्रम आणि माधव मल्लाह यांना मारलं.

१९८२ मध्ये फुलन देवीने सरेंडर केलं आणि मग चंबळ नदीच्या भागात कुसुमा एकटी डाकू उरली.

हे इतकं सगळं झालं तरीही कुसुमाचा मल्लाह वरचा राग काही शांत झाला नव्हता. म्हणूनच तिने १९८४ मध्ये मईअस्ता गावात जाऊन एकटीने १५ जणांचा गोळ्या घालून खून केला कारण, या गावात जास्तकरून मल्लाह लोक राहत होते.

कुसमाच्या आयुष्याला धार्मिक वळण लागलं.

आता तिच्या नावाची भिती प्रचंड वाढली होती… एकेदिवशी रागाच्या भरात तिने लालारामची साथ सोडली आणि थेट फक्कड बाबाच्या सोबत आली

हा फक्कड बाबा म्हणजे गुन्हेगारी करता करता देवधर्मही करणारा डाकू होता…

अनेक डाकू फक्कड बाबाला आपला गुरू मानायचे. या फक्कड बाबाच्या संगतीत राहून राहून मग कुसुमाला सुद्धा देव-धर्म करायची सवय लागली. आता ती गुन्हे तर करत होतीच पण एका बाजुला अध्ययन आणि प्रार्थना सुद्धा करायला लागली.

तिने एका रिटायर्ड एडीजीला किडनॅप केलं आणि मग ५० लाखांची रक्कम मागितली. ही रक्कम दिली नाही म्हणून तिने गोळ्या घालून त्याची हत्या केली. आता ती पोलिसांच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये येऊन बसलेली.

पोलिसांनी तिला पकडण्यासाठी जंग जंग पछाडलं पण तिला पकडण्यात पोलिसांना कधीच यश आलं नाही… शेवटी कुसुमा आणि फक्कड बाबा या दोघांनीही स्वत:हून सरेंडर केलं. आता कुसुमा तुरूंगात भगवान शंकरांची प्रार्थना करतेय. ती इतर कैद्यांना रामायणाचे धडे देतेय आणि सोबतच स्वत:सुद्धा रामनामाचा जप करतेय. आता तिच्या या रामनामाच्या जपामुळे पापं धुतली जातील का हे सांगता येत नाही, पण ती तुरूंगात गेल्यामुळे चंबळ नदीच्या खोऱ्यात काही अंशी शांतता पसरली असेल हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.