मुख्यमंत्री राहिलेला माणूस राज्याच्या जलसंधारणासाठी छोटं पद स्वीकारायला देखील तयार झाला.

महाराष्ट्र राज्याचे १३ वे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असणारे सुधाकरराव नाईक यांची जनमानसात ओळख हि बाणेदार आणि पाणीदार नेता अशी होती. अगदी सरपंचापासून ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय रंजक आहे. अल्प काळासाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली काम अत्यंत महत्वाची होती.

यवतमाळच्या पुसदमधल्या गहुली गावी त्यांचा जन्म झाला. वडील लोकनेते बाबासाहेब नाईक हे अत्यंत कडक शिस्तीचे आणि स्वभावाचे होते तर काका वसंतराव नाईक हे मायाळू स्वभावाचे होते. अशा जेष्ठांच्या तालमीत सुधाकरराव समाजकारणाचे आणि राजकारणाचे धडे गिरवत होते.

गहुली गावच्या सरपंचपदी ते विराजमान झाल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवासाचा आलेख हा कायम उंचावत राहिला. काँग्रेस पक्षाचे ते नेते होते. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणी राज्यपाल असा त्यांचा उल्लेखनीय राजकीय प्रवास होता.

महाराष्ट्राच्या मातीशी त्यांची नाळ अगदी घट्ट जुळलेली होती. साहित्य, कला , संस्कृती यांच्याविषयी त्यांना पुरेपूर जाण होती. या गोष्टी पुढे जाण्यासाठी ते कायम प्रयत्नशील होते, त्यांच्या या कामामुळे जनमानसात ते ‘ मनाने कवी आणि मनगटाने प्रशासक ‘ अशी ओळखले जात.

सुधाकरराव नाईक हे मुख्यतः त्यांनी महाराष्ट्रात आणलेल्या जलसंधारण योजनेसाठी लक्षात राहतात. राज्यातील शेतीचा प्रश्न बागायतीचा नसून कोरडवाहू आहे हे त्यांना आधीच लक्षात आलं होत. या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि जलसंधारणाचा प्रकल्प महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राबवायला सुरवात केली.

जलसंधारण हे स्वतंत्र खातं आणि या खात्यासाठी मंत्री देखील स्वतंत्र असा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि हा धाडसी निर्णय यशस्वी देखील करून दाखवला.

केवळ उठसूट धरणचं न बांधता पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याच्या उपाययोजनाही अंमलात आणाव्या असे आदेश त्यांनी दिले. जलसंधारणाची छोटी आणि महत्वाची कामं केली तर शेतकरी निराधार होणार नाही आणि जास्त जमिनी सिंचनाखाली येऊ शकते आणि शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न कायमचे मिटतील या दृष्टीने त्यांनी हि तरतूद केली होती.

शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलचं अचूक निरीक्षण आणि दांडगा अभ्यास यामुळे जलसंधारण करून त्यांनी हरितक्रांतीची पहाट महाराष्ट्रात आणली. भविष्यात महाराष्ट्राचं वाळवंट होणार हे त्यांच्या दूरदृष्टीने ओळखलं होतं त्यामुळे जास्तीत जास्त जलसंधारणाच्या कामांशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या १०००० रु कर्जाचा व्याजदर त्यावेळी १०% होता तो त्यांनी एका झटक्यात ६% केला. या कामाचा त्यांना प्रसिद्धीसाठी खूप गवगवा करता आला असताना पण आपल्या शांत स्वभावामुळे ते प्रसिद्ध होण्याच्या भानगडीत न पडता प्रामाणिकपणे आपलं काम करत असे.

मुख्यमंत्री झाल्यावर राजकीय अस्थिरतेचं त्यांना चांगलं भान होतं. त्यांनी छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या दहा तर जनता पक्षाच्या नऊ आमदारांना काँग्रेसमध्ये आणत विधिमंडळात काँग्रेसचं संख्याबळ वाढवलं आणि बहुमताच्या सीमेपार नेऊन ठेवलं. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे असा त्यांचा होरा होता.

गुन्हेगारी क्षेत्रातील धनदांडग्यांना त्यांनी चांगलाच आळा घातला. मात्र १९९३ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्याने त्यांच्या मुख्यमंत्री पदावर गदा अली आणि त्यांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. मुंबईच्या सुरक्षेत ते कमी पडले असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यावेळचे केंद्रीय मंत्री असलेले शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सुधाकररावांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले.

हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालपदी त्यांचं मन रमलं नाही आणि वर्षभरात ते महाराष्ट्रात परत आले. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेची स्थापना केली. जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या सुधाकरराव नाईक यांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले.

मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष पद स्वीकारतील की नाही अशी विलासरावांना शंका होती. मात्र जलसंधारणाचे काम करण्याची संधी मिळाल्याने सुधाकरराव मनातून आनंदित झाले. ठप्प झालेल्या जलसंधारण कामांना गती देण्यासाठी सुधाकरराव यांनी दृढ निश्चय केला.

सुधाकरराव यांच्या काळात जी जलसंधारणाची कामे झाली ती नंतर मागे पडत गेली आणि सत्ताधाऱ्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. सुधाकररावांनी मात्र आणलेली जलक्रांती हि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना चांगलीच उपयोगी पडली होती.

सुधाकरराव यांचा स्मृतिदिन हा महाराष्ट्रभरात जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.