दाढदुखीच निमित्त झालं अन् सुनिल गावस्कर असा विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

१९७०-७१ साली भारतीय क्रिकेट संघ हा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात पाच टेस्ट मॅचेस खेळल्या गेल्या. हा दौरा भारतीय क्रिकेट संघासाठी खुप महत्वाचा ठरला गेला. कारण भारताने ही मालिका १-० अशी जिंकली. भारताचा वेस्ट इंडिजवर हा पहिलाच कसोटी विजय होता. आणि तसेच वेस्ट इंडिजच्या मैदानावर सुद्धा भारतीय संघाचा हा प्रथम विजय होता.

ह्या दौऱ्यात भारताचा लेजंड फलंदाज सुनिल गावस्कर हा पदार्पण करत होता. ह्या पदार्पणाच्या मालिकेत सुनिल गावस्करने ४ शतके व एक द्विशतक ठोकली होती. गावस्कर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने भारतीय क्रिकेट इतिहासातला एक पहिलाच पराक्रम केला होता.

पाहिली टेस्ट जखमेमुळे गावस्करला मिळाली नाही. दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने ६५ व ६७ नाबाद अश्या धावा केल्या. तिसऱ्या टेस्टमध्ये ११६ आणि ६४ नाबाद. चौथ्या टेस्टमध्ये १ आणि ११७ नाबाद. आणि पाचव्यात १२४ आणि २२०.

पोर्ट ऑफ स्पेन या मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्टमध्ये सुनिल गावस्करने पाहिल्या डावात १२४ आणि दुसऱ्या डावात २२० धावा करून एक विक्रम केला. असा करणारा तो प्रथम भारतीय खेळाडू ठरला.

पण ही दोन्ही शतक सुनिल गावस्करने कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या मनःस्थितीत केली आहेत हे माहितीये का तुम्हाला..?

पाचव्या टेस्टपुर्वी गावस्करला दाढदुखी उद्भवली. प्रचंड दाढदुखी.

तहान लागली म्हणून पाणी पिण्याचे निम्मित झाले आणि पाणी पिताना एक गारगार बर्फाचा खडा गावस्करच्या दाढेच्या पोकळीत जाऊन अडकला. तिथेच तो बर्फ वितळला आणि गावस्करची दाढ जोरात दुखू लागली. त्याला रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिलीच फलंदाजी आल्यामुळे लगेच त्याला खेळायला सुद्धा जावं लागले.

गावस्करला खुप वेदना होत होत्या आणि त्या परिस्थितीत त्याने खेळायला सुरुवात केली. मैदानावर धावा करण्यासाठी तो पळू लागला आणि दातांना धक्का लागण्यास सुरुवात झाली आणि दात अजुन जोराने दुखू लागले.

या सगळया परिस्थितीवर गावस्करने मात करायचे ठरवले आणि दाढदुखीवरचे लक्ष हटवण्यासाठी त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. आणि तसचं झाल, दातांच दुःख विसरण्यासाठी त्याची खेळातली एकाग्रता वाढत गेली. तो खेळू लागला आणि त्याच्या डोळ्यांना चेंडु फुटबॉल सारखा दिसू लागला आणि तो दाढदुखी पार विसरूनच गेला.

दिवसाचा खेळ थांबला आणि त्याची दाढदुखी परत सुरु झाली. दुखणारे सगळे दात उपटून काढावे अस त्याला वाटू लागले. त्याला साध हसता येतं न्हवत की गार पाणी पिता येत न्हवत. त्यात टीम मॅनेजरने त्याला दाढ काढायला मनाई केली आणि पेन किलरचे इंजेक्शन घेण्यास सुद्धा मनाई केली. आणि ह्याच अवस्थेत त्याला ५ दिवस काढावे लागणार होते. ५ दिवस तो झोपला सुद्धा न्हवता. त्याला फक्त एकच जाणवत होत ते म्हणजे त्याची दाढदुखी.

शरीराचे आणि मानाचे द्वंद सुरु झाले. भारताचा दुसरा डाव सुरु झाला. सुनिल गावस्कर मैदानात आला. पुन्हा ते द्वंद सुरु झाले. दाढदुखी विसरण्यासाठी त्याने पुन्हा खेळावर लक्ष केंद्रित केले. यामुळे त्याचा खेळ सुधारला. त्याच्या धावा वेगाने निघू लागल्या.

खेळताना त्याच दुःख नाहीस होत होते. एकाग्रतेमुळे त्याने दुसऱ्याही डावात एक शतक ठोकले. म्हणजे दोन डावात दोन शतके. विजय हजारेंच्या विक्रमासोबत त्याने बरोबरी केली. पण एवढ्यावरच तो थांबला नाही.

शतकानंतरही सुनिल गावस्कर पुढे खेळू लागला आणि त्याने द्विशतक मारले. अस करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला होता.

पदार्पणाच्या मालिकेतच त्याने एक विक्रम आपल्या नावावर करून घेतला. दाढदुखी सारख्या विचित्र परिस्थितीतही गावस्करने पराक्रम केला होता. सगळीडे सुनिल गावस्कर या नावाची वा-वा सुरु झाली. पण त्यावेळी त्याचे दुःख काय होते आणि तो कोणत्या परिस्थितीत खेळत होता हे त्याचेच त्याला माहित होते.

– भिडू कपिल जाधव

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.