जगाला उल्टा चष्मा दाखवणारी आजवरची सगळ्यात मोठी रेकॉर्डब्रेक आणि लोकप्रिय मालिका….

आपल्या देशात सिनेमापेक्षा जास्त प्रेम मिळतं ते छोट्या पडद्यावरील मालिकांना. शनिवार- रविवारचे रियालिटी शोज सोडले तर आठवडाभर चालणाऱ्या मालिका प्रचंड प्रमाणात आहेत. काही मालिका सुरु व्हायच्या आतच बंद झाल्या, काही अर्ध्यातूनच मध्यवर्ती पात्र भूमिका सोडून गेलं म्हणून बंद झाल्या, काहींना खराब टीआरपी रेटिंगमुळे गाशा गुंडाळावा लागला.

सासू- सुनांच्या भांडणांच्या मालिका आपल्याला काही नवीन नाही, मोठ्या कुटुंबात सुनबाई किंवा अजून कोणीतरी कारस्थान रचतं, प्रेमप्रकरण, घरात खजिना दडलाय, भुतांचा प्रवेश, आजी, नातू, सासू , सासरे, गुन्हा घडून पोलीस येणे अशा बऱ्याच बारीकसारीक गोष्टींवर या मालिका सुरु असतात. महिने सोडाच चक्क वर्षच्या वर्ष या मालिका चालतात.

पण २००८ साली एक मालिका टीव्हीवर आली आणि तिने सिरीयल प्रकारचे सगळे परिमाणं तोडले. दररोजच्या रटाळ गोष्टी आणि प्रत्येक मालिकेतले आलटून पालटून होणारे प्रकरणं बघून वैतागलेल्या प्रेक्षकांना हि मालिका संजीवनी देऊन गेली. अगदी घरातल्या म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलांपर्यंत सगळं घरदार हि मालिका बघतं.

आजवरची सगळ्यात लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा.

मागील १३ वर्षांपासून अगदी सुसाट वेगात हि सिरीयल सुरु आहे. विनोदी पद्धतीने केलेलं सादरीकरण हि या मालिकेची जमेची बाजू असून यामधली पात्र अगदी आपल्या घरातली वाटतात किंवा आपण त्या लोकांच्या अगदी घरातले आहोत इतकी प्रसिद्ध हि मालिका आहे. लोकांच्या प्रेमावर आणि विश्वासावर हि मालिका चालते.

या मालिकेची खरी सुरवात केली ती तारक मेहता या गुजराती विनोदी लेखकाने. १९२९ साली अहमदाबाद, गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला.

सुरवातीच्या काळात ते वृत्तपत्रांमध्ये लिहायचे, नाटककार तर ते होतेच पण विदेशी भाषांमधली उत्तमोत्तम नाटकं त्यांनी गुजरातमध्ये आणली. मेहता १९४५ साली ते मॅट्रिक झाले , मुंबईमध्ये गुजराती विषय घेऊन त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. १९५८ ते ५९ या काळात गुजराती नाट्यमंडळात ते कार्यकारी मंत्री होते. प्रजातंत्र या दैनिकात ते उपसंपादक होते.

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचा जन्म कसा झाला-

तारक मेहता हे चित्रलेखा या साप्ताहिकात दुनिया ने उंधा चष्मा या सदरामध्ये लिहीत असत. १९७१ साली हे सदर छापून आले आणि पुढची तब्बल ४० वर्ष ते या सदरात लिहीत होते. समाजातील विविध गोष्टींवर त्यांनी यातून विनोदी भाष्य केले. सुरवातीच्या काळात या सदरात टपू आणि चंपकलाल या दोन पात्रांवर हे सदर होते नंतर हळूहळू याला सोसायटीचं रूप त्यांनी दिलं.

गोकुळधाम नावाच्या या सोसायटीत विविध धर्मी आणि विविध प्रांताचे लोक होते, गुजराती व्यापारी जेठालाल गडा आणि त्याच्या परिवारातील बायको दया, वडील चंपकलाल आणि मुलगा टपू. मराठी भिडे कुटुंब, पंजाबी सोढी, साऊथ इंडियन अय्यर, कोलकाताची बबिता, भोपाळचा पत्रकार पोपटलाल अशी अनेक पात्रे यामध्ये त्यांनी लिहिली होती.

पुढे नीला टेलिफिल्म्स अंतर्गत असितकुमार मोदी यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या या लिखाणाला पडद्यावर आणलं. या मालिकेचा पहिला एपिसोड २८ जुलै २००८ रोजी सब टीव्हीवर प्रदर्शित झाला. अल्पावधीतच या मालिकेने तुफ्फान प्रसिद्धी मिळवली. सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर या मालिकेने गारुड निर्माण केलं.

जेठालालवर सतत येणारी संकटं आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे सोसायटीवाले धमाल आणतात. केवळ मध्यवर्ती भूमिका करणारे पात्रचं नाही तर इतर किरकोळ भूमिका करणारे पात्रसुद्धा हिट झाली. जेठालालचा साला सुंदरलाल, जेठालालच्या दुकानात काम करणारे नटुकाका आणि बागा, बावरी  हि पात्रे विशेष गाजली.

सोसायटीमध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि त्यावर कुशलतेने केलेली मात विनोदी अंगाने सादर केली जाते. विविधता असूनही तितक्याच आपुलकीने आणि जिव्हाळ्याने सोसायटीतले लोकं एकमेकांना वागवतात हि जमेची बाजू आहे.

शैलेश लोढा हे तारक मेहतांच्या भूमिकेत हि मालिका आपल्याला सांगून पुढे नेत असतात. ह्या मालिकेने ३००० हजाराहून अधिक एपिसोड पूर्ण केले असून अजूनही हि मालिका त्याच वेगाने सुरु आहे. पुढे २०१७ साली या मालिकेचे जनक खुद्द तारक मेहता यांचं निधन झालं पण शो मस्ट गो ऑन मुळे हि मालिका पुढे चालू राहिली.

तारक मेहता का उलटा चष्मा हि आजवरच्या सर्वात जास्त काळ चालवणाऱ्या सिरीयलपैकी एक आहे. सलग १३ वर्षांपासून हि मालिका अविरतपणे सुरु आहे.

टीआरपी साठी या मालिकेला कधीही जास्त धडपड करावी लागत नाही. केवळ विनोदाच्या दर्जावर आणि निखळ मनोरंजनाच्या जोरावर हि मालिका आघाडीवर आहे. सीआयडी नंतर सगळ्यात जास्त चालणारी हि मालिका आहे. सोसायटीमध्ये सर्व प्रकारच्या धर्मांचे उत्सव त्याच उत्साहाने साजरे केले जातात, विनोदाबरोबरच एकता, देशप्रेम, बंधुता या गोष्टी या मालिकेतून पोहचवल्या जातात

भारतात तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हि मालिका पाहिली जाते कि टीआरपी रेटिंगच्या पहिल्या पाचात हि मालिका अजूनही आहे. तारक मेहतांच्या पात्रातून देशाचे दर्शन घडते ते उगाच नाही. विविधता में एकता असं या सोसायटीचं ब्रीद आहे.

प्रॉब्लेम्स तो हे सबके साथ बस नजरिये कि हे बात….

यासाठी हवाय तारक मेहता का उलटा चष्मा

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.