राज्यकर्त्यांनी लक्ष घातलं तर मराठवाड्याचे फटाके जगात चीनला देखील मागे टाकतील…

दिवाळी म्हटलं कि एक विषय हमखास चर्चेत येतो. फटाके. दरवर्षी सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी येतात आणि फटाके उडवू नका म्हणून सांगतात. कट्टर विचारांची पब्लिक त्याना झाडून शिव्या घालते. दिवाळीत फटाके उडवायचे नाहीत म्हणजे बॅटबॉल शिवाय क्रिकेट खेळल्यासारखं झालं हे. 

पण कधी कधी आपल्याला सुद्धा पटतं फटाके उडवावेत पण शिस्तीत उडवावेत. प्रदूषणाची, आजूबाजुला असणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांची काळजी घेऊन उडवावेत. 

फटाक्यांच्या बाबतीत आणखी एक येणारा मुद्दा म्हणजे चायनीज फटाके उडवू नका. आपल्याला हि गोष्ट देखील पटते. आपल्या देशाला त्रास देणाऱ्या शत्रूराष्ट्र चायनाचे फटाके उडवायचे नाहीत यावर तर सगळ्या सत्ताधारी विरोधी पक्षांचं देखील एकमत होतील.

मग अशावेळी भिडूला प्रश्न पडतो तर फटाके उडवावेत तर कोणते? चीनचे फटाके नाहीत तर आपल्याला आपल्या मातीतले फटाके उडवायला काय हरकत आहे?

होय आपल्या मातीत देखील फटाके तयार होतात आणि तेही जगातिक दर्जाचे. कुठं म्हणाल तर मराठवाड्यात.

सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर उस्मानाबाद जिल्ह्यात तेरखेडा हे ५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. तामिळनाडूच्या ‘शिवकाशी’  वरून या गावाला छोटी शिवकाशी हे बिरुद तेरखेड्याला लागले आहे. 

महाराष्ट्रातच नाही तर आंध्रप्रदेश तेलंगणा भागात इथले ‘तेरखेडी तोटे’ प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याबरोबरच सुतळी बॉम्ब, फुलबाजे, मातीचे भुईनळे, रंगीत आकर्षक फटाके सण, उत्सव याबरोबर राजकीय कार्यक्रमांना लागणाऱ्या आदल्यांचे उत्पादन येथे मोठय़ा प्रमाणात केले जाते. 

तेरखेडा येथील फटाका उद्योगाचा इतिहास मोठा रंजक आहे. 

गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. मराठवाड्याचा हा भाग हैद्राबादच्या निजामशाहीच्या राजवटीमध्ये येत होता. या भागातले अनेक तरुण निजामाच्या दरबारात दारूकाम करायचे. पुढे स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी हैद्राबाद संस्थानांवर लष्करी कारवाई केली. निजामाला आपली सत्ता भारतात विलीन करावी लागली.

 निजामाची राजवट संपल्यानंतर निजामाच्या दरबारी दारूकाम करणाऱ्या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यातूनच हुसेन नवाज सय्यद दारुवाले, अब्बास नवाज सय्यद दारुवाले आणि इब्राहिम मुल्ला आदीनी तेरखेडय़ात फटाका उद्योगाची सुरुवात केली. 

त्यांच्या पिढ्या या व्यवसायाला आल्या. खऱ्या अर्थाने तेरखेडा येथे १९८२ साली फटाके निर्मितीस प्रारंभ झाला. जेके फायर वर्क्‍स, अब्बास फायर वर्क्‍स आणि चातक फायर वर्क्‍स या तीन कारखान्यांनी उत्पादन सुरू केले. त्यानंतर क्रांती फायर वर्क्‍स, मयूर फायर वर्क्‍सही फटाका उद्योगात उतरले. 

आजमितीला या परिसरात २० भर फटाका कारखाने सुरू आहेत. 

छोट्या खेड्यातल्या या उद्योगाने महाराष्ट्राच नव्हे तर आता राज्याबाहेरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १०० हून अधिक वर्षांपासून चालणा-या या उद्योगाचा विस्तार वाढला आहे. ८० ते १०० एकर जागेत १५ कारखान्यांत मजुरांमार्फत फटाक्यांची निर्मिती होत असून हंगामात सुमारे ३ कोटींची तर वार्षिक ५ कोटींची उलाढाल होते. 

या कारखान्यामध्ये १ हजार मजूर काम करतात. हातावर करता येणारी कामे घरी करण्यासाठी दिली जातात. त्यामुळे कागदाच्या पुठ्ठ्यांवर चित्र चिकटवणे, कागदी बॉक्स तयार करणे अशी कामे महिला घरबसल्या क रू शकतात. विवाह समारंभ, मिरवणुका, उत्सवात लागणा-या शोभेच्या दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या तेरखेड्यात वेगवेगळ्या भागांतून व्यापारी खरेदीसाठी येतात. या व्यापाऱ्यांमार्फत तेरखेडची दारू आणि फटाका राज्याबाहेरही जाऊ लागला आहे.

मध्यंतरी तर एका उस्मानाबादच्या व्यक्तीमुळे तेरखेड्याचे फटाके भारताबाहेर कॅनडाला देखील पोहचले. तेव्हापासून कॅनडामध्ये फटाक्यांना मागणी होऊ लागली. मात्र, वाहतुकीच्या समस्येमुळे फटाके परदेशात पाठवता येत नाहीत.

दिवाळीच्या काळात तर जवळपास २० कोटी रुपयांची उलाढाल या भागात केली जाते. पण इतके असूनही तेरखेड्याचे फटाके जगात चीनसारख्या देशांशी स्पर्धा करू शकत नाही.

याला अनेक कारणे आहेत . फटाक्याच्या कारखान्यांसाठी सुरक्षित जागा नाही. कित्येकदा स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणूनच वाढत असलेली कारखान्यांची संख्या आणि उपलब्ध जागा पाहता या परिसरात फटाका कारखान्यांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी, अशी मागणी होत होती.

मागणीला प्रतिसाद म्हणून तरखेडा येथील फटाका उद्योगाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य सरकारने २००५ साली फटाका उद्योगासाठी स्वतंत्र एमआयडीसी निर्मितीची घोषणा केली. तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १३५ एकर जागा संपादित करण्यात आली. वाशी तालुक्यातील गोजवाडा येथे असलेल्या या जमिनीला खादी ग्रामोद्योग विभागानेही अनुमती दिली. मात्र, गावकऱ्यांनी विरोध केला. 

आणि फटाक्यांच्या स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचे घोंगडे तेव्हापासून भिजत पडले आहे. क्षमता असूनही 

हे ही वाच भिडू :

 

 

1 Comment
  1. Madan Jain says

    Opposition especially Pappu and leftists will not go against maaybaap China

Leave A Reply

Your email address will not be published.