भारतातली ही संघटना पण तालिबानच्या धर्तीवर मुलींसाठी फतवे काढते.

तालिबान्यांनी अफगाणिस्तातनात सत्तेत आल्यापासून उच्छाद मांडलाय नुसता. जागतिक बातम्यांच पान काढून बघितलं तर सगळीकडे फक्त तालिबान, अफगाणिस्तान आणि तिथे होणारे महिला मुली, सामान्य लोकांवरचे अत्याचार. तस बघायला गेलं तर, तालिबान शरिया कायद्याचा आधार घेऊन वेगवेगळ्या मार्गाने महिला मुलींवर बंधन घालायला मागे पुढे पाहत नाही. त्यांची आधीची राजवट पाहता ते दिसून ही येत.

तर हल्लीच त्यांनी एक फतवा काढला होता, तो म्हणजे महिला आणि मुलींना मुलांबरोबर एकत्र शिकता येणार नाही. तसेच शाळेत शिकवण्यासाठी कोणताही पुरुष शिक्षक असणार नाही. हा फतवा जगभरातल्या अखिल मुस्लिम धर्मीयांसाठी नाही. हे एखाद्या शहाण्या जाणत्या माणसाला पण समजेल. पण आपल्या भारतात काहींनी याचा संबंध लगेचच इकडं जोडला.

तर विषय असा झालाय कि,

मुस्लीम धर्मातील तरुण मुलींचे धर्मांतरण करण्याच्या प्रमाणावर जमीयत उलेमा ए हिंद संघटनेने चिंता व्यक्त केली होती. यावर मुस्लीम मुलींचं धर्मांतर रोखण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याची गरज असल्याचं या संघटनेने म्हटलं आहे. मुस्लिम मुलींचे धर्मांतरण का होत आहेत? किंवा यामागे काय कारणं आहेत याबाबत जमीयत उलेमा ए हिंदने अजून खुलासा केलेला नाही. पण एक पत्रक जारी करून याबाबत मुस्लिम मुलींनी मुलांबरोबर शिकू नये असा अजब फतवा काढला आहे.

जमीयत-उलेमा-ए-हिंदने फतव्यात अजून काय काय म्हण्टलंय ?

काही गैरमुस्लीम युवक संघटित पातळीवर मुस्लिम मुलींना फुस लाऊन लग्न करत आहेत. त्यांना यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मुस्लिम मुलींना धर्मांचे योग्य ज्ञान नसल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा असाव्यात आणि त्यात मुलांचा समावेश नसावा अशी भूमिका जमीयतची आहे.

जमीयत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी हे मुस्लिम मुलींच्या धर्मांतरणावर बोलताना म्हणाले की, मुलींसाठी मुस्लिमांबरोबरच गैरमुस्लिमांनीही वेगळ्या शाळा सुरू करायला हव्या. त्यामुळे हे प्रकार रोखले जातील.

पण आपल्याला बघावं लागेल की, की हे जमीयत-उलेमा-ए-हिंद संघटना नक्की आहे तरी काय आणि, त्यांचा फतवा कम्पल्सरी असतो काय ?

यासंदर्भात बोल भिडूच्या प्रतिनिधीने मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 

जस जमात- ए- इस्लामी हि मुस्लिम समाजातील राजकीय विचारसरणी वाढवणारी धर्मवादी संघटना आहे. जस तबलिग-जमत हे धार्मिक प्रसार करणारी संघटना आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जे काही शरियाचे पारंपरिक कायदे आहेत त्याच्यात बदल न करू देणारी संघटना आहे. अशाच पद्धतीने जमीयत-उलेमा-ए-हिंद हि मुस्लिम पुरोहितांची संघटना आहे. मुल्ला मौलवी, उलेमा हे स्वतःला धर्मगुरू समजतात. त्यांनी हा फतवा काढला आहे.

फतवा म्हणजे काय यावर बोलताना ते म्हंटले,

तर हा फतवा म्हणजे, एखाद्या प्रश्नावर काही सल्ला मागितला असेल तर हि संघटना किंवा मुल्ला मौलवी मार्गदर्शन करीत असतात. मुळात हि संकल्पना आहे. पण समाज अज्ञानी असतो त्यांना धार्मिक ज्ञान नसत. मग अशा लोकांवरती वैचारिक प्रभाव राहावा आणि त्यांनी आपली म्हणणं ऐकावं यासाठी हे फतवे काढले जातात.

फतवे कम्पल्सरी असतात का ?

आत्तापर्यंत असे अनेक फतवे निघाले असतील. उदाहरण घ्यायचं झालं तर, मुस्लिम लोकांनी विमा उतरवू नये असा फतवा मध्यंतरी निघाला होता. विमा काढला तर त्यात जे व्याज घेतलं जात ते इस्लाम ला मान्य नाही. माणसाच्या जीवनाची शाश्वती अल्लाशिवाय कोणीच घेत नाही असं या फतवाधारकांच मत असत. असे प्रतिगामी फतवे काढले जातात. त्यात मग कधी स्त्रियांनी घराबाहेर पडू नये, असे फतवे असतील. तर आपल्याकडे अशा फतव्याला कोणी दाद देत नाही. दखल घेतली जात नाही. प्रतिगामी लोक आपलं नाणं वाजवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या प्रभावाखाली असणारे लोक हे असले फतवे मानतात. बाकी सर्वच मुस्लिम समाज हे फतवे मानतोच असं नाही.

यावर आमच्या प्रतिनिधीने या फतव्यावर त्यांचं वैयक्तिक मत काय आहे, हे विचारले असता ते म्हंटले, 

हा कालविसंगत फतवा आहे, लोक याला केराची टोपली दाखवणार आहेत. त्यामुळे अशा गोष्टी राजकारण समोर ठेऊन कोणी करत असेल तर ते टेम्पररी असत. समाजाने त्याकडे दुर्लक्ष करावं. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.