पाच लाख पगार, ३४० खोल्यांच्या राष्ट्रपती भवनाबरोबरच द्रौपदी मुर्मू यांना या सुविधा मिळतील

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपतोय. त्याआधी नवीन राष्ट्रपती निवडणं गरजेचं होतं म्हणून गेल्या महिन्याहून जास्त काळ झाला देशभरात राष्ट्रपती निवडणुकीचा गोंधळ सुरु होता. उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली तेव्हा सत्ताधारी पक्षाकडून नाव समोर आलं द्रौपदी मुर्मू यांचं. 

द्रौपदी मुर्मू यांचं नाव समोर आलं तसं अर्धे वोट त्यांच्याबाजूने गेल्याचं दिसलं. यामागचं कारण राहिलं त्यांचं बॅकग्राउंड…

द्रौपदी मुर्मू आदिवासी समूहाच्या आहेत, याच टॅगलाईन खाली सगळ्या बातम्या आजवर झळकल्या. देशाचे मूळ रहिवासी म्हणजे आदिवासी. अशा आदिवासी व्यक्तीला राष्ट्रपती बनवून खऱ्या अर्थाने ‘पहिल्या नागरिकाचा’ सन्मान होईल आणि त्याने भारताचा नवीन इतिहास लिहिला जाईल, अशा  आशयामुळेमतांच्या तराजूचं पारडं त्यांच्याच बाजूने राहिल्याचं बोललं जातं.

काल २१ जुलैला जेव्हा मतांची मोजणी झाली तेव्हा भरघोस मतांनी मुर्मू भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाल्या. वयाच्या ६४ वर्षी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती बनणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची खासियत म्हणजे…

त्या भारताच्या आजवरच्या सगळ्यात तरुण राष्ट्रपती ठरल्या आहेत आणि राष्ट्रपती पदावर निवडल्या जाणाऱ्या अशा पहिल्या व्यक्ती बनल्या आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झालाय.

राष्ट्रपती पदाच्या नुसत्या रेसमध्ये आल्यापासून अनेक सुविधांचा भरघोस फायदा घेतलेल्या मुर्मू यांना राष्ट्रपती झाल्यावर आणि निवृत्त झाल्यावर सुद्धा खूप सुविधा मिळणार आहेत.

कोणत्या? बघूया… 

१) पगार

भारताचे राष्ट्रपती हे भारतातील सर्वाधिक पगार घेणारे सरकारी अधिकारी असतात. भारताच्या राष्ट्रपतींचं वेतन हे १९५१ च्या प्रेसिडेंट अचिव्हमेंट अँड पेन्शन ऍक्टनुसार निश्चित केलं जातं. राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचीनुसार मुळात भारताच्या राष्ट्रपतींना महिन्याचा पगार होता १० हजार रुपये. १९९८ मध्ये त्यात वाढ करण्यात आली आणि पगार झाला ५० हजार रुपये.

परत त्यामध्ये वाढ होऊन पगार दीड लाख करण्यात आला. २०१७ पर्यंत हाच पगार राष्ट्रपतींना मिळत होता. मात्र नंतर त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली. 

नवीन पगाराच्या नियमानुसार द्रौपदी मुर्मू यांना महिन्याचा पगार असणारा आहे ५ लाख रुपये.

२) निवासस्थान

याव्यतिरिक्त राहायला फ्री घर मिळतं. राष्ट्रपतींच्या घराला राष्ट्रपती भवन म्हणतात. राष्ट्रपती भवनाला एकूण ३४० खोल्या आहेत. यामध्ये अतिथी कक्ष आणि इतर कार्यालये तसंच अनेक बागा असतात. ३४० खोल्यांपैकी राष्ट्रपती कोणत्या खोलीत असतात हे कुणालाच सांगितलं जात नाही. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. 

या व्यतिरिक्त अजून दोन रिट्रीट राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली असतात. शिमला इथली ‘द रिट्रीट बिल्डिंग’ आणि हैदराबादमधील ‘राष्ट्रपती निलायम’ हे दोन ठिकाणं यामध्ये आहेत. उत्तरेकडे एक आणि दक्षिणेकडे एक असलेली ही दोन्ही ठिकाणं आपल्या देशाच्या वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांच्या एकतेचं प्रतीक मानली जातात. 

यातील शिमल्याच्या रिट्रीट बिल्डिंगमध्ये राष्ट्रपती उन्हाळ्यात किमान दोन आठवडे राहतात आणि इथूनच ऑफिशियल कामकाज सांभाळतात. तर हिवाळ्यात दोन आठवडे राष्ट्रपती निलायम इथे राहून राष्ट्रपती ऑफिशियल कामकाज सांभाळतात. 

३) कार्यालयातील भत्ते

कार्यालयीन खर्चासाठी राष्ट्रपतींना वार्षिक १ लाख रुपये राखीव असतात. राष्ट्राध्यक्षांना जगात कुठेही प्रवास मोफत असतो. मग तो प्रवास रेल्वेने असो किंवा विमानाने असो. भारताच्या राष्ट्रपतींच्या गाड्या वेळेनुसार आणि तंत्रज्ञानानुसार अपडेट होत असतात. 

शिवाय लँडलाइन कनेक्शन आणि मोबाइल खर्च देखील फ्रीच असतो. त्यांना दोन शिपाई, एक खासगी सचिव आणि एक पर्सनल असिस्टंट दिला जातो.  राष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय सुविधा देखील मिळतात. 

४) सुरक्षा 

प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड (पीबीजी) भारताच्या राष्ट्रपतींना सुरक्षा पुरवतात. पीबीजी हे भारतीय सशस्त्र दलातील सर्वात जुनं युनिट आहे. शिवाय एकमेव घोडेस्वार लष्करी युनिट आहे. राष्ट्रपतींचे अंगरक्षक शांततेच्या काळात औपचारिक युनिट म्हणून काम करतात. तसंच युद्धाच्या वेळी देखील त्यांना तैनात केलं जाऊ शकतं कारण ते प्रशिक्षित पॅराट्रूपर्स म्हणून ओळखले जातात. 

शिवाय त्यांच्या कारला देखील कडक सुरक्षा असते. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असलेल्या कस्टम-बिल्ड हेविली आर्मर्ड मर्सिडीज बेंझ एस ६०० मध्ये राष्ट्राध्यक्ष प्रवास करतात. लायसन्स प्लेट नसलेली ही गाडी बुलेट आणि शॉकप्रूफ असते.  बॉम्ब, गॅस हल्ले आणि इतर स्फोटकांचा सामना करण्यासाठी तिला  स्पेशिअली मॉडिफाइड केलं जातं. 

राष्ट्रपतींची कार कुठे बनवली जाते, त्याचं मॉडेल आणि रजिस्ट्रेशन नंबर हे ‘स्टेट सिक्रेट’ असल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

५) सेवानिवृत्तीनंतर देखील फायदे

पदावर राहून अनेक लाभ मिळवणाऱ्या राष्ट्रपतींना पदावरून निवृत्त झाल्यावर देखील आजीवन फायदे मिळतात. यामध्ये पेन्शन स्वरूपात महिन्याला दीड लाख रुपये दिले जातात. त्यांना राहण्यासाठी जे घर दिलं जातं त्याचं भाडं आकारलं जात नाही. ५ कर्मचारी देखील दिले जातात ज्यांचा वार्षिक पगार ६० हजार रुपये असतो.

राष्ट्रपतींच्या जोडीदाराला (राष्ट्रपती जर महिला असेल तर पती आणि जर राष्ट्रपती पुरुष असेल तर पत्नी) महिन्याला ३०,००० रुपये सचिवीय सहाय्य म्हणून मिळतात. दोन फ्री लँडलाइन आणि एक मोबाइल फोनची सुविधा दिली जाते. 

प्रवासाबद्दल बोलायचं तर रेल्वे किंवा विमान कसाही प्रवास असो तो मोफत दिला जातो. तेही एकट्याला नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला देखील फ्री प्रवास असतो. 

अशाप्रकारे अनेक सुविधा आता द्रौपदी मुर्मू यांना मिळणार आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजाला मोठी अपेक्षा असल्याचं बोललं जातंय. २५ जुलैला मुर्मू पदाची शपथ घेणार आहे. 

तेव्हा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ कसा असणार? देशात कोणते बदल त्या घडवून आणणार? भारताच्या इतिहासातील ‘पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती’ म्हणून त्या कोणती छाप सोडणार? हे बघणं महत्वाचं असणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.