तेंव्हाच कळालं होत कॅप्टन आणि राहुल गांधी मध्ये काही तरी बिनसलंय
आज काँग्रेसवाल्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब पडला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. पक्षातला शेवटचा लोकनेता म्हणून त्यांना ओळखलं जातं होतं. पण हा अचानक पडलेला बॉम्ब नाही.
पंजाब काँग्रेसमध्ये सार काही आलबेल नाहीये हे काही दिवसांपासून जाणवत होतं. कधी कुठून वाद उफाळून येईल सांगता यायचं नाही. कुठं तरी ट्विटरवर एकमेकांच्या विरोधात बोलायचं आणि मग सगळ्या जगाला कळत की, काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे.
याच ज्वलंत उदाहरण १५ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेमध्ये होत.
झालं असं की, जालियनवाला बागेच्या नूतनीकरणावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली होती तरी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्या ‘सुशोभीकरणा’च समर्थन केलय. तेव्हाच राजकीय पंडितांना जाणवलं की पिक्चर क्लियर आहे, बाबा कॅप्टन आणि राहुल गांधींमध्ये काहीतरी नाराजीनाट्य आहे.
पण त्याआधी हा सुशोभिकरणाचा मुद्दा नक्की काय आहे ते वाचा.
जालियनवाला बागेमध्ये १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायर याच्या आदेशाने झालेल्या बेछूट गोळीबारात एक हजार लोकांचा बळी गेला. या क्रूर घटनेची साक्ष देणाऱ्या खुणा दाखवणारी जालियनवाला बागेकडे जाणारी छोटी गल्ली जशीच्या तशी ठेवण्यात आली होती. मात्र या गल्लीचे नूतनीकरण झाल्यामुळे जुन्या खुणांचा मागमूस राहिलेला नसून हा बदल म्हणजे इतिहासापासून फारकत घेणे असल्याची सार्वत्रिक टीका होत आहे. यावरच राहुल गांधींनी मोदींवर तोफ डागली.
पण हे शीतयुद्ध काय प्रकार आहे ?
ब्रिटिश राजवटीतला तो काळा दिवस कोणताही भारतीय विसरणार नाही असाच आहे. जालियनवाला बाग हत्याकांड. या अमानुष घटनेच्या जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांचा केंद्र सरकारने अपमान केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. ते आपल्या ट्विट मध्ये म्हंटले,
ज्यांना हौतात्म्य पत्करणे म्हणजे काय, याचा अर्थ माहिती नाही तेच हुतात्म्यांचा अपमान करण्याचे धाडस करतात. मीही एका शहिदाचा मुलगा असून जालियनवाला बागेचे नूतनीकरण करून शहिदांचा झालेला अपमान कधीही सहन केला जाणार नाही. नूतनीकरणाच्या या असभ्यतेचा आणि क्रूरपणाचा काँग्रेस विरोध करत आहे.
राहुल गांधींच्या या ट्विटमुळे निदान एवढं तरी समजत कि बाबा संपूर्ण काँग्रेसचं याविरोधात सुर आळवणार. म्हणजे हा वाद काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंगणार. पण स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आला तो कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामुळे.
अमरिंदर सिंग यांनी नूतनीकरणाचे समर्थन करताना ट्विट करत म्हंटले होते,
‘बदल चांगला दिसत आहे. इथले (जुन्या खुणा) काय काढून टाकले मला माहिती नाही,’
झालं. एवढ्या गोष्टीवर तर माध्यमांमधलं वातावरण तापू लागलं. खुद्द कॅप्टन साहेब जर भाजपची उघड उघड स्तुती करत असतील तर ते काय भाजपमध्ये जाणार का ? अशा ही चर्चा झडू लागल्यात. पण खरच कॅप्टन जातील का भाजप मध्ये, तर त्याला काही गोष्टींचा आधार द्यावा लागेल ज्या मागच्या काही दिवसात घडल्यात आणि त्यावरून अंदाज येईल कि नक्की काय घडू शकत.
तर
१. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा विरोध असतानाही नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष केले गेले. व आता अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मोहीम सिद्धू गटाकडून चालवली जात आहे असं कॅप्टनना वाटतंय होते.
२. आता याच पंजाब काँग्रेसमधील गोंधळावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे प्रभारी हरीश रावत मंगळवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर चंदीगडला गेले होते. मात्र, पंजाबला रवाना होण्याच्या एक दिवस आधी, हरीश रावत यांनी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत दीड तास पंजाबमधील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती.
३. हरीश रावत यांनी पंजाबमधील चार काँग्रेस मंत्री आणि सुमारे दोन डझन आमदार मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांना विरोध करत असल्याची चर्चा राहुल गांधी यांच्या कानावर घातली. मग राहुल गांधींचा मॅसेज घेऊन रावत चंदीगडला रवाना झाले होते. त्यामुळे पंजाबमध्ये काही तरी घडणार याबाबत चर्चा गेल्या २ महिन्यापासून वर्तविण्यात येत होत्या.
या वादाला मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. ते वेगळा काही निर्णय घेतात का? हे लवकरच समजेल.
हे ही वाच भिडू
- युवराज राहुल गांधी यांची युवा काँग्रेस टीम तयार होण्यापूर्वीच विस्कटत आहे
- राहुल गांधी यांना बोलण्यातील आक्रमकपणा पक्षात देखील आणण्याची गरज आहे
- संसदेत गैरहजर राहणारे राहुल गांधी काँग्रेसचे लोकसभा नेते झाले तर पक्षाला फायदा होईल ?