एकट्या फॉक्सकॉनचं काय घेऊन बसलात, मागच्या ९ महिन्यात गुजरातमध्ये या ८ गोष्टी गेल्यात…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच गांधीनगर ते मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. वाराणसी ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते वैष्णो देवी या मार्गांनंतर आता गुजरातमधूनही भारताची सध्याची सगळ्यात वेगवान ट्रेन धावणार आहे. आता सप्टेंबर महिन्यात गुजरातचं नाव सतत आपल्या कानावर पडत होतं ते वेदांता फॉक्सकॉनमुळं. महाराष्ट्रातला हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आणि यावरुन लय राडाही झाला.

पण जरासं खोलवर जाऊन शोधलं की समजतंय येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर माहिन्यात जिथं विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, त्या गुजरातमध्ये २०२२ च्या फक्त नऊ महिन्यात कित्येक महत्त्वाच्या गोष्टी गेल्या आहेत. याच एक एक करुन बघुयात…

विषय ताजा आहे म्हणून वंदे भारत एक्सप्रेस उदाहरण पहिलं –

२०१८ मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची पहिली चाचणी चेन्नईमध्ये करण्यात आली. त्यानंतर वाराणसी ते दिल्ली आणि दिल्ली ते वैष्णोदेवी असे मार्गही सुरु झाले होते. विशेष म्हणजे पहिल्या दोन वंदे भारत एक्सप्रेसनंतर बातम्या आल्या होत्या की, पुढची वंदे भारत एक्सप्रेस ही तेलंगणामध्ये असेल, इतकंच काय तर हैदराबादचंही नाव पुढं आलं होतं.

 मात्र सध्या तिथल्या ट्रायल्सच्या बातम्याही चर्चेत नसताना, गुजरातमध्ये मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसला थाटात सुरुवातही झाली आहे.

दुसरा मुद्दा कंपन्यांचा –

वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर बनवणारा प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार याची बरीच चर्चा झाली होती. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झालं, पण तरीही वेदांता फॉक्सकॉन १.५४ लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार हे जवळपास निश्चित झालंच होतं. अशातच ५ सप्टेंबर २०२२ ला वेदांताचे अनिल अग्रवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि १४ सप्टेंबरला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये होणार असल्याची बातमी पुढं आली.

बरं एवढंच नाही, भारतातली आयटी हब हा विषय निघाला की, बँगलोर आणि पुणे ही दोन नावं लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण गुजरातच्या २०२२-२७ च्या आयटी ईएस धोरणांतर्गत अनेक आयटी कंपन्यांनी वडोदरामध्ये होणाऱ्या आयटी हबची वाट धरलीये. यातलं अगदी ताजं उदाहरण म्हणजे एल अँड टी या नावाजलेल्या कंपनीनंही ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत गुजरातचीच वाट धरली आहे, ज्या माध्यमातून गुजरातमध्ये जवळपास १२ हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो.

नंबर ३, आयपीएल ट्रॉफीला विसरुन कसं चालेल…

२०२२ च्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायन्ट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या टीमची एंट्री झाली. खरंतर आधी अहमदाबादची टीम येणार अशी चर्चा होती, पण या टीमचं नाव इतर टीम्सप्रमाणं  शहरावरुन न ठेवता थेट राज्यावरुनच ठेवण्यात आलं. 

टीमच्या थीम सॉंगमध्ये सुरुवातीलाच ‘जय जय गरवी गुजरात’ या गुजरातच्या राज्य गीतामधल्या ओळी वापरण्यात आल्या होत्या. टीमच्या मॅचच्या वेळीही स्टेडियममध्ये गुजरातचं राज्य गीत वाजवलं जायचं.

यंदाची आयपीएल फायनल अहमदाबादच्याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली आणि गुजरात टायटन्सनं आयपीएल जिंकली. यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या टीमचा सत्कारही केला. आता एवढ्या आयपीएल झाल्या, पण मुख्यमंत्र्यांनी राज्याची टीम म्हणून विजेत्या टीमचा सत्कार केला, हे पहिल्यांदाच घडलं. थोडक्यात काय तर, यंदा आयपीएल ट्रॉफीही गुजरातलाच गेली.

खेळाचा विषय सुरु आहे, तर नॅशनल गेम्सचा नंबर चौथा लागणार

लॉकडाऊनमुळं २०२० मध्ये भारतात नॅशनल गेम्स झाल्याच नाहीत. एका बाजूला भारताचे खेळाडू ऑलिंपिक्स, कॉमनवेल्थ या स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना नॅशनल गेम्सचं महत्त्व अनेकदा अधोरेखित झालं होतं. 

२०१५ नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या नॅशनल गेम्स यंदा कुठं होतायत तर, गुजरातमध्ये.

 यासाठी गुजरातमध्ये भव्यदिव्य अशी तयारी तर करण्यात आली आहेच, पण स्पर्धेच्या उदघाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर कार्यक्रमांना अमित शहा यांची उपस्थिती यामुळे होणारे इव्हेंट, स्पर्धेच्या दृष्टीनं समोर आलेलं इन्फ्रास्ट्रक्चर निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपला फायद्याचं ठरू शकतं.

ऑस्करला गेलेला पिक्चर गुजराती…

जिंकेल न जिंकेल हा पुढचा प्रश्न पण भारताकडून यंदा ऑस्करला काश्मीर फाईल्स जाणार की आरआरआर यावरुन लय चर्चा रंगल्या. कुणी स्टोरीमुळं काश्मीर फाईल्ससाठी आग्रही होतं तर कुणी ऍक्शन सीन्समुळं आरआरआरसाठी. पण भारताकडून ऑस्करला पिक्चर कुठला गेला, तर ‘छेल्लो शो’ नावाचा गुजराती पिक्चर.

या पिक्चरची भारतात फारशी चर्चा नव्हती, त्यात एका इटालियन पिक्चरची कॉपी मारल्याचा आरोपही ‘छेल्लो शो’वर झाला. पण कॉंट्रोव्हर्सीचे राडे बाजूला ठेवले, तरी यंदा भारतातून ऑस्करला जाणारा पिक्चर मात्र गुजराती आहे, एवढं खरं.

आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेली अभिनेत्रीही गुजराती.

भारतीय चित्रपट सृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मिळाला. कटी पतंग, लव्ह इन टोकियो आणि अनेक सुपरहिट्स देणाऱ्या आशा पारेख यांना १९९२ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

आता ज्युरींनी केलेल्या निवडीनुसार त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळेल, आशा पारेख यांचा जन्म गुजरातमध्येच झाला होता.

या किरकोळ गोष्टी वाटत असल्या, तर यापेक्षा ग्रँड विषय सांगतो

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची गुजरात भेट. २१ एप्रिल २०२२ ला बोरीस जॉन्सन भारतात आले तेच थेट गुजरातला. या दौऱ्यात त्यांनी गुजरातमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटही दिली. आता ब्रिटनसारख्या मोठ्या देशाचा पंतप्रधान पदावर असताना भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातमधून करतो म्हणजे काही साधा विषय नाही. 

त्यात ज्यावेळी जॉन्सन गुजरात दौऱ्यावर होते, त्याचवेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालकही गुजरात भेटीवर होते.

आकडेवारी बघायची झाली तर २०१४ पासून एकूण १६ राष्ट्रप्रमुखांनी गुजरातला भेटी दिल्या आहेत, यात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये बोरिस जॉन्सन यांच्या रुपानं गुजरात भेट देणाऱ्यांच्या यादीत आणखी एका बड्या नेत्याची भर पडली.

जगातलं पहिलं सीएनजी टर्मिनलही गुजरातमध्येच

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातल्या पहिल्या सीएनजी टर्मिनलची पायाभरणी गुजरातच्या भावनगर बंदराजवळ केली. वर्षाला १.५ मिलियन मेट्रिक टन इतकं प्रचंड सामान कॅरी करण्याची क्षमता या टर्मिनलमध्ये असेल. 

२०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेनं कार्यरत होणाऱ्या या पोर्टलमुळं सागरी व्यापारात गुजरातचं महत्त्व आणखी वाढणार आहे आणि कित्येक जॉब्सही निर्माण होणार आहेत.

ज्या वर्षी निवडणूका आहेत, त्याचवर्षी गुजरातमध्ये या ८ महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात. बाकी पंतप्रधान मोदींनी केलेली डायमंड सिटी अर्थात ड्रीम सिटीच्या प्रोजेक्टची पायाभरणी, गिफ्ट सिटीमध्ये आलेले प्रोजेक्ट या गोष्टीही आहेतच. या सगळ्या मागचं कारण फक्त निवडणुकाच नाही, तर नरेंद्र मोदींचा २००७ पासून सुरू असलेला ‘गुजराती अस्मिता’ प्रोजेक्ट आहे, असं सांगण्यात येतं. या प्रोजेक्टबद्दल बोल भिडूनं आधीच लिहून ठेवलेलं आहे, ज्याची लिंक खाली देतोय, निवांत वाचा.

क्रिकेट, पिक्चर आणि व्यवसाय या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं गुजराती माणसाच्या ‘गुजराती अस्मितेला’ सुखावणाऱ्या आहेतच. त्यामुळं आता याचा फायदा पंतप्रधान मोदी आणि भाजपला होईल का ? हे आगामी निवडणुकांमध्ये कळेलच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.