त्या दिवशी रेल्वे वेळेत पोहचली असती तर या रेल्वे मंत्र्यांचा मृत्यू झाला नसता
रेल्वेमंत्री ललित मिश्रा. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९२३ ला झाला. तर मृत्यू ३ जानेवारी १९७५ ला झाला. ललित नारायण मिश्रा हे स्वतंत्र भारताचे पहिले कॅबिनेट मंत्री होते. इंदिरा गांधी यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जायचे. ते असते तर बिहारचा विकास खूप झाला असता, अस आजही बोललं जात.
पण त्यांचा मृत्यू हा एका बॉम्बस्फोटात झाला….
बिहार मधील सहरसा या जिल्ह्यातील बलुआ बाजार येथे ललित मिश्रा यांचा जन्म झाला. ते ललित बाबू या नावाने ओळखले जायचे. बिहार मधील लोक आजही म्हणतात ललित बाबू आज असते तर बिहार प्रगतीपथावर असता. जर त्यांचा मृत्यू झाला नसता तर ते पंतप्रधान झाले असते. त्यांची हत्या म्हणजे मोठा कट होता. अशा अफवा त्यांच्या मृत्यू नंतर देशात पसरल्या होत्या.
ती तारिख होती २ जानेवारी १९७५…
ललित मिश्रा तेव्हा रेल्वे मंत्री होते. आपल्याच खात्याच्या म्हणजे एका रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या एका नव्या लाईनचं उद्धाटन करण्यासाठी ते येणार होते. हे रेल्वेस्टेशन बिहारच्या समस्तीपूर येथे होतं.
ठरल्याप्रमाणे ललित मिश्रा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तेव्हा त्यांच्यासोबतच त्यांचा भाऊ जगन्नाथ मिश्रा हे देखील उपस्थित होते. सोबतच कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते असा मोठ्ठा समुदाय उपस्थित होता.
ललित मिश्रा स्टेजवर गेले. भाषण ठोकलं, रेल्वेच्या नव्या प्रकल्पाबद्दल भरभरून बोलले. अस म्हणलं जायचं की लोकांना ललित मिश्रांच्यात भावी पंतप्रधानच दिसायचा. तशा पद्धतीने त्यांच्या राजकारणाची दिशा देखील चालू होती…
पण इथेच ललित मिश्रांचा डाव कोसळला…
ललित मिश्रा भाषण संपवून स्टेजवरून खाली उतरत होते तोच गर्दीतून एक गोळा आला आणि त्यांच्या अगदी शेजारी आपटला. हा गोळा काय साधासुधा नव्हता, तर तो हातगोळा होता. या हातगोळ्याचा क्षणात स्फोट झाला आणि लोकांना काही कळण्यापूर्वीच त्या स्फोटात अनेकजण जखमी झाले.
कोणालाचं नेमका प्रकार कळत नव्हता, इतक्यात लोकांची नजर जखमी अवस्थेत पडलेल्या ललित मिश्रांकडे गेले. ललित मिश्रांसोबत तिथे असणारे १०-१२ लोक देखील जखमी झाले होते. पण जीवावर कोणाच्याच बेतलं नव्हतं.
या घटनेबद्दल आजही ललित मिश्रांचे जे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते ते सांगतात,
ललित मिश्रा जखमी होते पण त्यांचा मृत्यू होईल अस वाटलं नव्हतं. तशा जखमा खोल देखील नव्हत्या..
आत्ता पुढील उपचारांची तयारी सुरू करण्यात आली. ललित मिश्रा काही साधेसुधे व्यक्ती नव्हते. ते एक रेल्वेमंत्री होते. त्यांच्यासाठी एक स्पेशल रेल्वे येवून त्यांना थेट पटनाला घेवून गेली असती. मात्र आजही या घटनेमागे संशय घेतला जातो कारण तुम्हाला-आम्हाला जसं वाटतं तस काहीच झालं नाही…
झालं अस की, पुढील उपचारांसाठी ललित मिश्रांना पटन्याला घेवून जाण्यासाठी एका नियोजित रेल्वेतच बसवण्यात आलं. साधारण समस्तीपूर ते पटण्याचा प्रवास हा आजच्या काळात चार तासात पुर्ण होता. त्या काळात हाच प्रवास याच रेल्वेनी साधारण ८ तासात होत असे. पुढच्या आठ तासात ललित मिश्रा पटण्याला पोहचतील अस नियोजन करुनच त्यांना रेल्वेत बसवण्यात आलं…
ललित मिश्रा बिहार मधील समस्तीपूर मध्ये रेल्वे स्टेशनवर एका लाईनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते.
पण ललित मिश्रा यांना घेवून जाणारी रेल्वे पटण्याला चक्क १४ तासांनी पोहचली. १३२ किलोमीटरचं अंतर आठ तासात पार करणारी रेल्वे एका जखमी रेल्वेमंत्र्यांना घेवून १४ तासानंतर पटण्यात पोहचली होती.
हा वेळ झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आजही या प्रकरणावर संशयाची सुई आहे. कारण काय तर एक रेल्वेमंत्री आपल्या सहज प्रवासासाठी देखील रेल्वे नॉनस्टॉप घेवून जावू शकतो, अस असताना बॉम्बहल्यासारख्या भयंकर घटनेतून जखमी झालेल्या एका रेल्वेमंत्र्याला घेवून जाणारी रेल्वे कसा काय उशीर करु शकते…?
ही घटना झाली ती १९७५ साली. मात्र त्यांच्यावर बॉम्ब टाकणाऱ्या चौघांना शिक्षा झाली ती २०१५ साली…
हेही वाच भिडू
- नागपुरात पोलिसांच्या काठ्या खाणाऱ्या तरुणाला बोलवून इंदिरा गांधींनी आमदारकीचं तिकीट दिलं
- इंदिरा गांधींच्या काळात त्रिशूळधारी नागा साधूंनी संपूर्ण संसदेला वेढा घातला
- अगदी हट्टाने लोकसभेच तिकीट मागुन घेतलं पण शेवटी इंदिरा गांधींची भिती खरी ठरली