रात्री पाकिस्तानात झोपले सकाळी उठे पर्यंत गाव भारतात आलं होतं..

१४ ऑगस्ट १९४७, मध्यरात्री १२ च्या ठोक्याला इंग्रजांनी सत्ता सोडली. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. दीडशे हुन अधिक वर्षे आपल्यावर पडलेला पारतंत्र्याचा जोखड उखडून पडला. आपला देश आपण चालवणार ही भावनाच काही वेगळी होती. हजारो वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं.

पण इंग्रजांनी जाता जाता भारताच्या स्वातंत्र्यामध्ये एक मेख मारून ठेवली होती. पाकिस्तान तिचे नाव. भारताची फाळणी होऊन दोन देशांची निर्मिती झाली. बॉर्डर नावाची एक रेष पण अनेक कुटुंबाची ताटातूट झाली. अनेकांना मर्जीच्या विरुद्ध देश सोडायला लागला. अनेकांना मर्जीच्या विरुद्ध नको असलेल्या देशात अडकावे लागले.

असच एक गाव म्हणजे टुरटुक.

लेह लद्दाखची उंच पर्वतांची भूमी. डोळे दिपवणारे निसर्गसौंदर्य, हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात श्योक नदीच्या तीरावर वसलेलं हे टुमदार गाव. तुमच्या आमच्या सारखच एक छोटंसं खेडेगाव. रोज सकाळी शाळेला जाणारी मुलं, शेतात कामाला जाणारे बाप्ये, संसार गाडा आवरण्यात बिझी असलेल्या बाया, तुरळक हॉटेलच्या बाहेर चहा पीत उभे असलेले उडाणटप्पू तरुण. असच चित्र तुम्हालाही दिसेल.

फक्त आपल्या आणि या गावात फरक एकच की साधारण पन्नास वर्षांपूर्वी हे गाव पाकिस्तानच्या हद्दीत होतं.

टुरटुक गावाचा इतिहास मात्र हजारो वर्षे जुना आहे. एकेकाळी चीन पासून ते युरोपपर्यंत पसरलेला रेशीम मार्ग याच गावातून जायचा असं म्हणतात. या गावात शेकडो वर्षे तिबेटी साम्राज्याचा ताबा होता. त्यामुळे बुद्धिझमचा इथल्या लोकांवर प्रभाव राहिला. साधारण इसवी सण ९०० च्या दरम्यान तुर्की लोकांनी तिबेटींकडून हा भाग हिसकावून घेतला. त्यांचं इथं तब्बल हजार वर्षे राज्य चाललं.

पुढे तेराव्या शतकात एक मीर सय्यद अली हमदानी नावाचे मुस्लिम सुफी संत आले आणि या भागात इस्लामचा प्रसार सुरु झाला.

तुर्की याब्गो घराण्याचा पराभव करून शिखांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला. पुढे इंग्रजांची सत्ता आली  काही काळाने तीही गेली. अशी अनेक स्थित्यन्तरे अनुभवणारे टुरटुक फाळणी नंतर मात्र पाकिस्तानच्या ताब्यात गेले.

लष्करी दृष्ट्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी असलेल्या या गावात पाकिस्तानने तिथला विकास व्हावा याकडे विशेष लक्ष दिले नाही. ना या गावात शाळा बांधली ना तिथल्या लोकांना काम मिळवून दिलं. मिलिटरीच ठाणे या पलीकडे त्यांचे टुरटुकबद्दल काहीही आत्मीयता नव्हती.

अशातच १९७१ साली बांग्लादेशच्या मुद्द्यावरून भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले. पंतप्रधान इंदिरा गांधी व लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या युद्धात भारताने सर्व पातळीवर पाकिस्तानची पुरती धुलाई केली होती.

आपल्या वीर जवानांनी पूर्व पाकिस्तान तोडून बांगलादेशची निर्मिती तर केलीच मात्र सोबतच पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर देखील चौफेर हल्ले केले.

टुरटुकच्या अगदी जवळ असलेल्या बॉर्डर वर युद्धाची आघाडी सुरु असल्यामुळे तिथले नागरिक घरातून बाहेर देखील पडत  नव्हते. संचारबंदी सुरु होती. पाकिस्तानी लष्कराचे जवान यांची ये जा चालू असायची. मशीनगनच्या धडधडण्याचे आवाज, तोफगोळे फुटल्याचे आवाज यांनी आसमंत भरून राहिलेला होता.

१४ डिसेंबर १९७१ची रात्र

त्या रात्री घनघोर युद्ध झाले. त्याकाळी २३ वर्षांच्या असलेल्या फातिमा बानो सांगतात

सुबह करीब 6 बजे दरवाजा खटखटाने की आवाज आई. गेट खोला तो देखा आर्मी के जवान गर्म चाय लेकर खड़े थे. वो मुझे चाय देकर बोले वेलकम टू इंडिया…’

फातिमा बानो यांना धक्काच बसला, हातातला चहाचा कप सांडला.

टूरटूकचे नागरिक रात्री पाकिस्तान मध्ये झोपले होते आणि सकाळी उठले तेव्हा गाव भारतात आलं होतं.

काही काही ठिकाणी असं झालं की घरातले निम्मी लोकं शेजारच्या गावात असल्या मुळे पाकिस्तान मध्ये गेले आणि काही जण भारतात. गिलगिट बाल्टिस्तानचा भाग असलेल्या, मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या या गावाला हा मोठा धक्का होता. भारतात आपलं काय होणार आपल्या बाल्टी संस्कृती वर आक्रमण होणार काय असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते.

पण भारत सरकारने त्यांच्यावर कोणताही दबाव आणला नाही. उलट इथे रस्ते दळणवळण याच्या सोई केल्या, महत्वाचं म्हणजे शाळा सुरु केली. आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. लोकांना काम मिळवून दिलं. टुरटुकचे लोक भारतात रमले.

काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव असला तरी सीमेवरच्या या गावातलं जीवन मात्र शांतताप्रिय आहे. ७१च्या युद्धा नंतर भारत सरकारने इथल्या रहिवाशांना भारतीय ओळखपत्रं दिली आहेत. शिवाय टुरटुक पर्यटनासाठी खुलं झाल्याने विकासाची नवी कवाडं खुली झाली.

आजही लेह लद्दाख प्रमाणे आपली खास संस्कृती जपलेलं गाव आपल्या स्वागतासाठी सज्ज असते. तिथे गेल्यावर तिथली जख्ख म्हातारी माणसे पाकिस्तानात राहण्याचा आणि भारतात राहण्याचा फरक सांगतात.

“त्या वेळी आमच्याकडे काय होतं? गावात शाळाच नव्हती म्हणून तर सगळं गाव अडाणी होतं. दिवसभर मेंढ्यांमागे हिंडणं, मिळेल ते काम करणं, क्वचित भीक मागणं हेही केलंय. युद्धानंतर बऱ्याच काळानंतर आम्हांला कळलं की आपण आता भारतात आलो  आहोत. हळूहळू स्थैर्य आलं व सुधारणा झाल्या. आता गावात शाळा आली. आमच्या तरुण मुलांना सरकारी, खाजगी नोकऱ्या मिळू लागल्या, यापेक्षा आणखी काय हवं? “

अनेकांची मात्र आपल्या सख्ख्या पाहुण्यांशी ताटातूट झाली. त्यांना भेटायला जायचे झाले तर पंजाब मध्ये बाघा बॉर्डर ओलांडून जावे लागते.

काहीजण मात्र सोपा मार्ग म्हणून भारताच्या हद्दीचा शेवट असलेल्या थांग या ठिकाणी जातात. इथं दहा बारा घरे आहेत. थांग पासून २ किलोमीटर वर पाकिस्तान आहे. काही काही वेळा जोरात ओरडून भारतातले नागरिक आपल्या पाकिस्तान मधल्या नातेवाईकांशी गप्पा मारतात. हा संपर्काचा शेवटचा उपाय आहे.

पण एकूणच टूरटूकचे नागरिक भारतात खुश आहेत. एकजण तर सांगतो, माझ्या वडिलांनी इंग्रज, पाकिस्तान आणि भारत या तिन्ही राजवटी पाहिल्या. ते मला सांगायचे की अल्लाहचे उपकार म्हणून तुम्ही भारतात जन्माला आला. शिका आणि याचा फायदा करून घ्या.

तिथले लोक आपल्या शेजारच्या गावाची एक गंमत सांगतात. १९७१ साली युद्ध झाल्यामुळे एका गावातले नागरिक खूप घाबरले आणि गाढवावर सामान लादून त्यांनी अख्ख गाव सोडून पाकिस्तानच्या सुरक्षित जागी स्थलांतर केलं. आज टूरटूकी नागरिक त्यांच्या नशिबावर खूप हसतात.

जर लेह लद्दाखला गेला तर या सुंदर गावाला नक्की भेट द्या. इथे आपली मराठा बटालियनची जंगी पलटण तैनात असते. छत्रपती शिवाजी महाराज की जयचा नारा तुम्हाला भारताच्या शेवटच्या टोकावर हमखास ऐकायला मिळेल.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.