युद्ध थांबवणं ते गावात रस्ता बनवण्यापर्यंत Sex Strike म्हणजे महिलांचं पावरफुल अस्त्र राहिलंय…

अमेरिकेमध्ये काही दिवसांपासून भयानक राडा सुरु आहे. सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरु आहे. दिवसेंदिवस आंदोलन पेट घेत जातंय. हे आंदोलन केलं जातंय सर्वोच्च न्यायालयाचा एका निर्णयाविरोधात.

गेल्या ५० वर्षांपासून अमेरिकेतील महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार होता. हाच गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा कायदा न्यायालयाने रद्द केला आहे. 

ज्यावर बाळ केव्हा हवंय, हा सर्वस्वी महिलांचा निर्णय आहे. म्हणून गर्भपाताचा कायदेशीर अधिकार कायम राहिला पाहिजे, असं अनेक महिलांचं म्हणणं आहे.

न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सुरु झालेल्या या निदर्शनांना नवीन वळण लागलंय. अमेरिकेच्या महिलांनी ‘सेक्स स्ट्राईक’ जाहीर केलीये. म्हणजेच या महिला आता तेव्हाच जोडीदारासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करतील जेव्हा त्यांना मूल हवंय. दरम्यान पुरुषांना कितीही वाटलं तरी ते महिलांसोबत शारीरिक संबंध ठेऊ शकणार नाहीत.

या निर्णयामागचं कारण म्हणजे – महिलांना त्यांच्या लढाईत पुरुषांची साथ हवी आहे.

आमचे जोडीदार असलेले पुरुषच जर आमच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरत नसतील तर ते आमच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास पात्र नाहीत. जर आमची निवड नाकारली गेली तर तुमची निवड देखील नाकारली जाईल, असं या महिलांचं म्हणणं आहे.

रस्त्यावरची लढाई सोशल मीडियावरही सुरू झाली आहे. #Abstinence आणि #SexStrike अमेरिकेत ट्विटरवर ट्रेंड करतंय. महिलांचा गर्भपाताचा घटनात्मक अधिकार परत मिळवण्यासाठी सेक्स स्ट्राईक योग्य अस्त्र असल्याचा विश्वास या महिलांनी वर्तवलाय आणि या विश्वासाचा आधार आहे…

सेक्स स्ट्राईकचा इतिहास

सेक्स हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. मानवी शरीराच्या गरजांमध्ये याचा समावेश होतो. मानवी संस्कृतीत तर सेक्सला एक ‘कला’ म्हणून संबोधलं गेलं आहे, ज्याचा वापर अनेकदा महिला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी करतात, अशी याबद्दलची धारणा आहे. 

आता पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील शारीरिक संबंधांची इच्छा असते, हे अलीकडे सर्वमान्य होत असलं तरी एक गोष्ट मात्र आहे की… महिलांच्या संमतीशिवाय पुरुष सेक्ससाठी त्यांना जबरदस्ती करू शकत नाही. त्यांचा होकार खूप महत्वाचा असतो. 

याच गोष्टीचा उपयोग महिलांनी अनेकदा ‘परिवर्तन’ घडवून आणण्यासाठी केल्याचं इतिहास सांगतो. 

सेक्स स्ट्राईक सगळ्यात पहिले १६०० च्या शतकात झाल्याचं इतिहास सांगतो.

१६०० च्या शतकात अमेरिकेमध्ये केव्हाही युद्ध पुकारलं जात होतं. मात्र त्यामध्ये फक्त पुरुष लढायचे स्त्रियांना त्याचा हक्क नव्हता. केवळ लैंगिक संबंध ठेवणं आणि मूल जन्माला घालणं इतकाच स्त्रियांचा रोल होता. याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी इरोकोइस समूहाच्या स्त्रियांनी (Iroquois women) पहिली सेक्स स्ट्राईक जाहीर केली. 

आम्ही लैगिक संबंध प्रस्थापित करणार नाही आणि मूल जन्माला घालणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी महिलांची ही युक्ती यशस्वी झाली आणि त्यांना युद्धात सामील होण्याचा हक्क मिळाला होता. इतकंच काय ‘जन्म देण्याची ताकद असलेल्या महिलांमध्ये अभूतपूर्व शक्ती आहे’ असं पुरुषांना वाटलं आणि त्यांनी स्त्रियांना राजकीय घडामोडींमध्येही सामावून घेतलं.

या पहिल्या सेक्स स्ट्राईकने भविष्यातील स्त्रीवादी बंडाचा मार्ग मोकळा केला…

अलीकडच्या काळाचा विचार केला तर लायबेरियामधील सेक्स स्ट्राईक हे सगळ्यात प्रभावी उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो. 

२००३ दरम्यान लायबेरियामध्ये भयानक गृहयुद्ध सुरु होतं. हे युद्ध संपावं म्हणून लेमाह गुओवी (Leymah Gbowee) नावाच्या महिला शांतता कार्यकर्त्या समोर आल्या होत्या. त्यांनी स्त्रियांची अहिंसक शांतता चळवळ उभी केली होती. या चळवळीचा एका भाग म्हणून त्यांनी सेक्स स्ट्राईकचा पर्याय अवलंबला होता.

लायबेरियन महिला जेव्हा सामूहिक सेक्स स्ट्राईकवर गेल्या तेव्हा युद्धखोरांनी हे गृहयुद्ध संपवलं होतं. त्यानंतर लेमाह यांनी सेक्स स्ट्राईक करण्यामागचा हेतू एका मुलाखतीत सांगितला होता…

“असं नाही की पुरुषांना दोन दिवस लैंगिक संबंधांपासून दूर ठेवलं आणि त्यांनी ताबडतोब आपल्या सर्व बायकांच्या इच्छेपुढे गुडघे टेकले. पण आमच्या शांतता चळवळीकडे माध्यमांचं लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल खूप मोलाचं ठरलं. आम्ही आमची बाजू मांडू शकलो आणि आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला, परिणामी युद्ध लवकर संपवण्यात मदत झाली” 

असं लेमाह म्हणाल्या होत्या. 

चळवळचं नेतृत्व करत देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लेमाह यांना २०११ मध्ये नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलं होतं.

यानंतर जगातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं अनुकरण केल्याचं दिसतं…

कोलंबियाच्या परेरा शहरात अनेक महिलांनी त्यांच्या पतींना गुंड प्रवृत्तीपासून सुरू करण्यासाठी सेक्स स्ट्राईकचा पर्याय निवडला होता. आपल्या पतींनी त्यांच्याकडील शस्त्र शासनाकडे सुपूर्द करावी आणि एका चांगल्या जीवनाकडे वळावं, स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं असं त्यांचं म्हणणं होतं.

द गार्डियनच्या वृत्तानुसार, या संपाची कोणतीही अधिकृत तारीख त्यांनी ठरवली नव्हती. म्हणजे बेमुदत सेक्स संप होता, जो परिणामकारक ठरला.  परेरा शहरातल्या अनेक पुरुषांनी सुपारी घेऊन हत्या करण्याचा मार्ग सोडला. आणि लोकांच्या हत्येच्या दरात जवळपास २६.५% घसरण झाली होती.

२०११ मध्ये कोलंबियाच्या एका गावात महिलांनी परत सेक्स स्ट्राईकची घोषणा केली होती. यावेळी त्यांची खूप साधी मागणी होती – गावात रस्ता तयार करणं. 

जवळपास साडेतीन महिने स्त्रियांनीक्रॉस्ड लेग्स’ नावाने संप पुकारला होता. त्यामुळे पुरुषांनी महिलांची गरज जाणत हालचाली केल्या आणि शासनाचं त्यांच्याकडे लक्ष जाऊन गावात रस्ता तयार करण्यात आला होता.

दरम्यान केनियामध्ये देखील सेक्स स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला होता. २००९ मध्ये केनिया सरकारचा विरोध करताना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. ही भांडणं वाढत जाणून केनियाची स्थिती खूप खालावली होती. तेव्हा हा राजकीय कलह थांबेपर्यंत महिलांनी शारीरिक संबंध थांबवण्याची घोषणा केली होती.

यामध्ये राजकारण्यांच्या बायका आणि सेक्स वर्कर्सला देखील त्यांनी सामावून घेतलं होतं. ज्यामुळे राजकीय नेते आणि केनियाच्या पुरुषांसाठी सेक्ससाठीचे सगळे मार्ग बंद झाले होते. केनियात तर याचा इतका प्रभावी परिणाम झाला होता की, फक्त सात दिवसांत स्थिर सरकार स्थापित झालं. 

तसं दरवेळी सेक्स स्ट्राईक यशस्वी होतंच असं देखील नाहीये. टोगो आणि इटलीमध्ये जेव्हा महिलांनी असाच काहीसा हेतू सध्या करण्यासाठी सेक्स स्ट्राईकचा निर्णय घेतला होता तेव्हा तो प्रॉपर फ्लॉप ठरला होता. याचं कारण म्हणजे – महिलांमध्ये आपसी संघटन नसणं.

शिवाय सेक्स स्ट्राईकला अनेकदा टीकांचा देखील सामना करावा लागला आहे.

‘सत्तेच्या बदल्यात स्त्रियांनी लैंगिक संबंधांचा आधार घेऊ नये, त्यांना इतर मार्ग नाहीत का?’

असं वेळोवेळो ऐकावं लागलं आहे. यात तथ्य देखील आहे, इतर मार्ग अवलंबता येतात मात्र काही गोष्टी आणि मागण्या अशा असतात ज्यासाठी सेक्स सारखा ‘नाजूक’ पर्यायच ‘ताकदवर’ ठरतो, असं महिला कार्यकर्त्या सांगतात.

युद्धात सहभागी होण्याची संमती मिळवणं, युद्ध संपवणं, स्थिर सरकार स्थापन करणं ते गावात रस्ता आणणं अशा अनेक राजकीय मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी स्त्रियांनी ‘सेक्स स्ट्राईक’ला हत्यार बनवल्याचं इतिहास सांगतो.

इतिहासाकडे बघूनच या हत्याराचा उपयोग आता अमेरिकेच्या महिलांनी त्यांचा ‘हक्क’ परत मिळवण्यासाठी करण्याचं ठरवलं आहे. 

त्यामुळे आजवर राजकीय बदलांसाठी वापरण्यात आलेली सेक्स स्ट्राईक ही स्ट्रॅटेजी ‘न्यायिक’ बदलासाठी कामी येते का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे…

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.