अमेरिकेच्या CIA ने बसवलेल्या सेन्सरमुळे उत्तराखंडमध्ये महाप्रलय आलाय ?

उत्तराखंडमध्ये ७ फेब्रुवारीला आलेल्या संकटाशी आपण सगळेच परिचित आहोत. रैणी इलाख्यातील धौली गंगा आणि ऋषि गंगा नदीचा संगम आहे. याच संगमाजवळ ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्ट. याच्या जवळच परवा हिमकडा तुटून नदी ओव्हरफ्लो झाली आणि पूर आला.

पुराच्या पाण्यासोबत हिमकड्यासोबत कोसळलेल्या दगडांचा ढीग पण खाली आली. पाण्याची गती एवढी होती की, पॉवर प्रोजेक्टच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तिथून पुढं ५ किलोमीटरवर असलेल्या NTPC प्रोजेक्टवर देखील परिणाम झाला. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची संख्या ३० पेक्षा जास्त झाली आहे, तर १९० हुन अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत.

या सगळ्या जीवित आणि आर्थिक नुकसानीनंतर हे संकट का आलं याच उत्तर शोधायचं चालू असतानाच जेष्ठ पत्रकार आणि दैनिक भास्करचे राष्ट्रीय संपादक लक्ष्मी पंत यांचं ट्विट आलं. यात ते म्हणाले,  

१९६५ मध्ये चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारताने नंदादेवी पर्वतावर एक न्यूक्लियर डिव्हाइस लावलं होतं. पण हे बर्फामध्ये हरवलं असून आज पर्यंत सापडलेलं नाही. याच्यात प्लुटेनियम २३८ आणि प्लुटेनियम २३९ चा वापर केला होता. ५-६ दिवसापूर्वी जिथं हा हिमकडा कोसळला हा तोच भाग आहे. 

आता हा दावा खरा मानायच्या आधी १९६५ मध्ये नक्की काय झालं होतं ते समजून घ्या. 

पहिली तर गोष्ट म्हणजे असं काही डिव्हाइस बसवलं होतं का? तर हो. कॅप्टन मनमोहन सिंग कोहली हे या मिशन साठीच नेतृत्व करत होते. सध्या ९० वर्षांच्या असलेल्या काहोली यांनी २०१८ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली होती. यात त्यांनी याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे.

चीनने १९६४ साली आपली पहिली अणू चाचणी घेतल्यानंतर अमेरिकेने चीनच्या आण्विक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारताला मदतीची विचारणा केली. सीआयएने भारत सरकारला एक सेन्सर बसवण्याची परवानगी मागितली. सरकारने देखील सीआयए ही परवानगी तात्काळ देऊ केली. 

त्यानुसार २३ जून १९६५ रोजी आयबीच्या माध्यमातून कॅप्टन कोहली आणि त्यांच्या टीमने अलास्का पर्वतावर याची चाचणी घेतली आणि नंतर नंदादेवी पर्वतावर जायला निघाले होते. पण खराब हवामानामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. ते डिव्हाईस वजनाने जाड आणि आकाराने मोठं असल्याने सगळ्यांनी ते तिथंच सोडून येण्याचा निर्णय घेतला.

पुढील जवळपास ११ महिने तिथं कोणाला ही जाता आलं नव्हतं. 

मे १९६६ मध्ये हे डिव्हाईस शोधण्यासाठी कोहली पुन्हा नंदादेवी पर्वतावर दाखल झाले. पण ते सापडले नाही. पुढे १९६७, १९६८ असं सलग ३ वर्ष हे डिव्हाईस शोधण्याचं काम चालू होतं.

हे एक अत्यंत सिक्रेट मिशन असल्याने त्यावेळी याबद्दल कुठेही वाच्यता करायला परवानगी नव्हती, अगदी घरात देखील नाही. त्यानंतर आजवर हे डिव्हाईस शोधण्यासाठी जवळपास १८ अभियान राबवली गेली आहेत. या दरम्यानच्या काळात स्थानिकांमुळे हे अभियान उजेडात येत गेलं.

कॅप्टन कोहली सांगतात, या डिव्हाईसच आयुर्मान कमीत कमी १०० वर्षाचं आहे, म्हणजे अजून देखील ४० वर्ष बाकी आहे. पण त्यांनी जे पुढं सांगितलं त्यामध्येच आजच्या संकटाचे उत्तर आहे. 

हे डिव्हाईस खूप गरम असल्याने त्याचा बर्फावर परिणाम होतो, आणि दगड लागेपर्यंत बर्फ वितळत जातो. सोबतच जर हे डिव्हाईस ऋषीगंगेच्या पात्रात गेलं किंवा ते फुटून काही हानी झाली तर त्यामुळे ऋषी गंगा नदीवर पहिल्यांदा परिणाम जाणवेल. पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जीवित हानीला समोर जावं लागू शकते. आणि जर हे गंगेच्या मुख्य पात्रात गेलं तर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकत.  

आता सध्या जी दुर्घटना झाली आहे तो भाग ऋषी गंगेचाच आहे. 

२०१८ मध्ये उत्तराखंडच्या मंत्र्यांनी घेतली होती पंतप्रधानांची भेट. 

२०१८ मध्ये उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी हे डिव्हाईस शोधण्याच्या अभियानाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ५ दशकांपासून जमिनीत गाडल्या गेलेल्या या डिव्हाईसमुळे ऋषी गंगा नदीच्या पाण्यावर परिणाम होतं असल्याचा दावा केला होता.

त्यावर मोदींनी या अभियानासाठी मान्यता देत लवकरचं सुरु केलं जाईल असे आश्वासन दिल होतं. 

आता आलेल्या या संकटानंतर पर्यावरवादी आणि स्थानिक लोकं त्यामुळे अधिक चिंताग्रस्त झाले आहेत. २०१३ मध्ये आलेलं संकट देखील गंभीर होतं. पण यंदा या डिव्हाईसमुळेच हिमकडा तुटून हे संकट ओढवलं असल्याच स्थानिक लोकांनी दावा केला आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.