अधिकारी टाळाटाळ करत होते, अटलजींनी हट्टाने तुकोबारायांचं नाणं बनवून अनावरण केलं

तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झालेले बाळासाहेब  विखे पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रात सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. बाळासाहेब विखेंनी हाच वारसा पुढे नेला.

बाळासाहेब विखे पाटील यांची जडणघडण जरी काँग्रेस पक्षात झाली असली तरी त्यांचा इतिहास बंडखोरीचा होता. साखर लॉबीशी झालेल्या वादातून शंकरराव चव्हाण यांच्या सोबत महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसची स्थापना,  राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे-पाटील देशभरातील 45 खासदारांना एकत्र करून कॉंग्रेस फोरम फॉर ॲक्शन स्थापन करणे, पुढे शिवसेनेत प्रवेश अशा बंडखोरीतून त्यांनी आपला स्वतंत्र विचार असल्याचं दाखवून दिल होतं.

इंदिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपद देखील देऊ केलं होतं मात्र बाळासाहेब विखेपाटलांनी शंकरराव चव्हाणांच्या मैत्री साठी त्याला नकार दिला.

अशा अनेक कृतीतून विखे पाटलांनी राज्याच्या राजकारणात आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला. कितीही मोठा नेता असो किंवा किंवा सिस्टीम विरोधात असो तरी त्याच दडपण न घेता लोकांची कामे करतच राहायची हि  बाळासाहेबांची खासियत होती. आपल्या विधायक कार्याची नोंद जनतेच्या दरबारी घयायला भाग पाडली.

त्यातलाच असच एक कार्य म्हणजेच, तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे तिकीट व नाणं ! 

सामाजिक, राजकीय जीवनामधले वातावरण किंवा त्या- त्या घटना, प्रसंगांचा साक्षीदार, भागीदार असणे आणि त्यासाठी त्या त्या वेळी भूमिका घेणे हे वाटतं तितकं सोपं नसतं. एकदा त्यांच्या डोक्यात विचार आला कि, विश्वनाथ कराड यांच्या पुढाकाराने ज्ञानेश्वरांचं नाणं निघालं मग तुकाराम महाराजांचे का निघू नये?

आणि ते कामाला लागले.

साल असावे २००१-०२. केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता होती. बाळासाहेब विखे पाटील तेव्हा शिवसेनेत होते. केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला होता. एक अनुभवी नेता म्हणून वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्यांना मानाचं स्थान होतं. 

तुकाराम महाराजांचे नाणं काढण्याची कल्पना मलाच सुचली हे माझं भाग्यच म्हणावं, असं विखे पाटील त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात.            

संतशिरोमणी तुकाराम महाराज यांना बहुजन समाज व वारकरी संप्रदाय आपले दैवत मानतात. महाराष्ट्रातील सामान्य, कष्टकरी, दुबळ्या, बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत तुकोबाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय स्तरावर दखल घेणार स्मरण चिन्ह स्वीकारलं जावं, यासाठी वारकरी संप्रदायामध्ये सक्रिय असणाऱ्या संत महंतांचा आग्रह होता. 

विखे पाटलांच्या कुटूंबात वारकरी संप्रदायाची परंपरा होती.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाणं काढावं ते शक्य नसेल तर पोस्टाचे तिकीट काढावं, असे विखे पाटील यांचे प्रयत्न चालू होते. त्यावेळी यशवंत सिन्हा अर्थमंत्री आणि पर्यटनमंत्री जगमोहन होते. दोघेही यासाठी अनुकूल होते पण अधिकारी सांगायचे नाणं काढायला तीन-चार वर्षे लागतील. त्यासाठी विखे पाटील स्वतः फक्त एकदाच अटलजींना भेटले.

अटलजींना भेटून त्यांनी हा विषय त्यांच्या कानावर टाकला,

“नाणं तयार करणे वैगेरे च्या प्रक्रियेत खूप वेळ लागेल त्यापेक्षा आपण तिकीट काढूयात”. 

त्यावर अटलजी म्हणाले,  “क्यूँ? ऐसा क्यूँ, टिकीट निकालेंगे और कॉइन भी निकालेंगे, ये काम बहुत पहले ही होना चाहिये था. वो तो एक महामानव थे, जल्दी करो”. 

हे काम होण्यासाठी त्यांनी हुकूमच दिला. पटापट सूत्रे हलू लागली. ज्या गोष्टीला तीन चार वर्षे लागतील असं म्हटलं जात होतं ते काम वाजपेयींच्या हट्टामुळे अवघ्या काही महिन्यात झालं.  

यावरून त्यांचं तुकाराम महाराजांवर किती प्रेम होतं हे लक्षात येते. अटलजी स्वतः बऱ्याच वेळा देहूला गेले होते. त्याची दखल घेऊन तुकाराम महाराजांची मुद्रा असणारा चांदीचं नाणं निघालं. अधिकृतपणे पंतप्रधान वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. ही संधी नियतीने मला दिली किंवा ती मला मिळाली हे माझे परम भाग्य मानतो, असे विखे पाटील म्हणायचे.

तिकिटाचे वितरण देहूला प्रमोद महाजनांनी केलं. तर नाण्याचं अनावरण दिल्लीला अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते फेब्रुवारी 2003 मध्ये झालं. यावेळी वाजपेयीजी यांनी मराठीत भाषण केलं. आणि तुकाराम महाराजांचे अभंग ही म्हटले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वगैरे, ‘वो मानवता और गरिबोंका मसीहा है, असेही म्हणाले होते.  यावेळी अटलजी खूप आनंदी दिसत होते. त्यांना जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथला ही समाज उपस्थित होता. अतिशय हृदयस्पर्शी व अविस्मरणीय अशा प्रकारचा उद्योग भवनातील पहिलाच समारंभ पार पडला.

प्रमोद महाजन यांच्या हस्ते देहू येथील पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्याचा सोहळाही दृष्ट लागेल असा झाला.

सारं वातावरण तुकाराम माऊलींच्या अभंगात न्हाऊन निघाले होते. महाराष्ट्राची समस्त जनता व वारकऱ्यांना आनंदाचं भरतं आलं.

याशिवाय याअगोदर लोणी प्रवरानगर येथे 10 ऑगस्ट 2002 रोजी सहकारी क्षेत्रातील अग्रदूत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील टपाल तिकिटाचं अधिकृत प्रकाशन झाल्यानं त्याच्या कार्याची वेगळी नोंद राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याचं एक वेगळंच समाधानही वाटतं.

शिर्डीच्या विकासातही विखे पाटील यांचे योगदान..

साई दर्शनासाठी देश-विदेशातून शिर्डीला येणार्‍या भाविकांचा अखंड ओघ चालू असतो. अलीकडच्या दोन दशकांमध्ये शिर्डीला धाव घेणारे सर्वधर्मीय, सर्वपंथीय साई भक्तांची संख्या अनपेक्षितपणे प्रचंड वाढत चालली होती. ती यापुढे वाढतच राहतील, आणि या वाढत्या वर्दळीमुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या संधीही वाढतील असा तर्क विखेंच्या मनात घोळत होता.

त्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केवळ शिर्डी मध्येच नव्हे तर जवळच्या परिसरातही वाढेल त्यामुळे साईभक्तांची नव्हे तर स्थानिक समाजाचीही शिर्डीसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी सुरु होती.

राजकारण, प्रशासन, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमधील उच्चपदस्थ मान्यवरांमध्ये ही साईभेटीचा ओढा वाढल्याचं दिसत होतं. त्यामुळे जवळपास विमानतळ असावं अशीही अपेक्षा होती.

रेल्वे कोपरगाव मार्गे येणार होती. तर गोदावरीवरील मोठा पूल टाळण्यासाठी पुणतांबा मार्गे ती रेल्वे आणावी म्हणून विखे पाटील यांनी आग्रह धरला. त्यामुळे हा प्रकल्प फार कमी खर्चात पूर्ण झाला. रोजगाराच्या संधी वाढतील हे लक्षात घेऊन बाळासाहेबांनी या योजनांचा पाठपुरावा सुरू ठेवला. सुदैवानं तेंव्हा बाळासाहेब विखे पाटील मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं. शिर्डी-पुणतांबा या 18 कि.मी लोहमार्ग साठी पुरेसा निधी उपलब्ध झाला. कामास गती मिळून तेही पूर्ण झालं. साईभक्तांची सोय झाली आणि रोजगार वाढीलाही गती मिळाली.

शिर्डीचा वाढतं महत्त्व लक्षात घेऊन 100 कोटी रुपयांच्या ‘शहरविकास आराखड्याला’ही मंजुरी मिळाली.

गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी घोषणा केली व विकास आराखड्याचे उद्घाटन केलं. पिण्याच्या पाण्यासाठी कामाला मान्यता मिळाली. उद्घाटनाला लालकृष्ण अडवाणी आले होते. अशा कार्यक्रमांना पक्षीय रंग नसतो. विमानतळ उभारणीसाठी जागेची पाहणी झाली तेही काम आता पूर्ण झालं.

विमानतळाच्या कामाला प्रफुल पटेलांनी व तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तसेच त्यावेळची केंद्रीय नगर विकास मंत्री अनंतकुमार यांनी मोलाची मदत केली होती. बाळासाहेबांनी शिर्डीच्या सुविधांकडे केवळ श्रद्धेच्या भावनेतून पाहिलं नाही तर तीर्थक्षेत्राचे – पर्यटन क्षेत्रात होणारे रूपांतर म्हणून पाहिलं. धार्मिक क्षेत्र आणि तेथील  रोजगारवाढीसाठीची उपयुक्तता याच बरोबर त्या भागात वाढणारी आर्थिक उलाढाल हे सारे लक्षात घेऊन या उपक्रमांचा पाठपुरावा करत ते करीत राहीले. जे काही विधायक घडून आलं त्यात त्याचे संपूर्ण श्रेय बाळासाहेब विखे पाटलांना जाते!

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.