एका मृत्युपत्रावरून वल्लभभाई आणि सुभाषबाबू यांच्यात कोर्टात केस जाईपर्यंत भांडणे झाली

भारताचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल म्हणजे एकेकाळी भारतीय राजकारणातील सर्वात ताकदवान व्यक्ती. असं म्हटलं जायचं की पंतप्रधान जरी पं.जवाहरलाल नेहरू असले तर पक्ष संघटनेवर मजबूत पकड सरदार पटेलांची होती.

पण एक काळ असा होता जेव्हा सरदार पटेलांचा भाऊ काँग्रेसच्या सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक होता. त्यांचं नाव विठ्ठलभाई पटेल.

विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म गुजरातच्या नाडियाद गावी एका धार्मिक कुटुंबात झाला. सर्व भावंडांमध्ये ते तिसरे. सरदार वल्लभभाई यांच्या पेक्षा दोन वर्षांनी थोरले. नाडियाद हे गाव सुशिक्षितांची भूमी म्हणून ओळखले जाते. त्याकाळी देखील या गावात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा होती.

विठ्ठलभाई यांनी मुंबईला जाऊन आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना लंडनला जाऊन बॅरिस्टर बनायचं होतं पण घरची परिस्थिती यथातथाच होती त्यामुळे विठ्ठलभाई ज्युनियर वकील म्हणून काम पाहात. वल्लभभाई त्यांच्या मानाने शाळेत खूप हुशार नव्हते. ते मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांचं वय २२ वर्षे इतकं होतं. पण वल्लभभाई जिद्दी होते. त्यांनी देखील आपल्या भावाप्रमाणे लंडनला जाऊन बॅरिस्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.

ते विठ्ठलभाईंना वकिलीमध्ये मदत करत आणि यातून मिळालेला पैसा इंग्लंडला जाण्याचे तिकीट काढण्यासाठी सेव्हिंग करत.

पुरेसे पैसे साठल्यावर वल्लभभाईंनी लंडनला जाणाऱ्या जहाजाचं तिकीट आणि पासपोर्ट काढलं. हे तिकीट पोस्टाने त्यांच्या घरी आलं. योगायोगाने ते विठ्ठलभाई पटेलांच्या हाती पडलं. या तिकिटावर व्ही.जे.पटेल असं लिहिलं होतं. घरच्यांचं म्हणणं पडलं कि थोरल्या भावाचे शिक्षण आधी पूर्ण झाले पाहिजे. म्हणून वल्लभभाईंच्या तिकिटावर विठ्ठलभाईंनी इंग्लंडला जावे.

धाकटा भाऊ या नात्याने वल्लभभाईंनी पडती बाजू घेतली आणि आपलं तिकीट विठ्ठलभाईंना दिलं. विठ्ठल पटेलांचे चरित्र लिहिणारे गोवर्धनभाई पटेल आपल्या पुस्तकात लिहितात

आपण पै अन् पै जोडून काढलेलं तिकीट विठ्ठलभाईंनी परस्पर वापरलं ही गोष्ट वल्लभभाईंना पसन्त पडली नव्हती. या घटनेनंतर दोघांच्यातील संबंध बिघडण्यास सुरवात झाली.

विठ्ठलभाई लंडनला गेले काही दिवसांनी वल्लभभाई देखील तिथे आले. दोघांनी आपली बॅरिस्टरकी चांगल्या मार्काने पास केली. विठ्ठलभाई पटेल तर आपल्या क्लास मध्ये टॉपर होते. दोघांनी भारतात आल्यावर वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. यात बराच पैसा कमवला. घरचे दारिद्य हटवले.

या दोन्ही भावात करार झाला होता की  विठ्ठलभाई मुंबई हाय कोर्टात प्रॅक्टिस करतील आणि वल्लभभाई अहमदाबादला जेणेकरून दोघांच्यात वाद होणार नाहीत.

पुढे विठ्ठलभाई पटेल राजकारणात आले तेव्हा त्यांनी वल्लभभाईंना वकिलीच्या केसेस सांभाळायला दिल्या. वल्लभभाईंचा राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नव्हता मात्र मित्रांच्या आग्रहाखातर ते अहमदाबाद म्युनिसिपालटीची निवडणूक लढवून राजकारणात आले.

विठ्ठलभाई पटेल यांनी मुंबईत राहून राष्ट्रीय राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. वकील म्हणून ते प्रसिद्ध होतेच पण काँग्रेसच्या सभांमध्ये जोरदार भाषण करून बरीच लोकाप्रियता देखील त्यांनी मिळवली होती. त्यांनी मुंबई प्रांतीय सभेत ब्रिटिश सरकारला अनेकदा धारेवर धरलं आणि भारतीय जनतेला उपयोगी पडतील असे अनेक कायदे मंजूर करून आणले.

१९१७ साली गोध्रा येथे वल्लभभाई पटेल यांची आफ्रिकेतून भारतात परतलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी पहिली भेट झाली. पूर्वी ज्यांची चेष्टा उडवली होती ते महात्मा गांधी यांच्यात लोकांना प्रभावित करण्याची शक्ती आहे हे वल्लभभाईंनी अनुभवलं आणि आयुष्यभर म.गांधींचा अनुयायी बनण्याची शपथ घेतली.

त्या काळात महात्मा गांधी यांचं गारुड सगळ्या देशभरात पसरत चाललं होतं. काँग्रेसच्या राजकारणावर देखील त्यांची पकड घट्ट होत चालली होती. त्यांचे मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल असे जुने नेते अनिच्छेने का होईना पण गांधीजींच्या बरोबर उभे राहू लागले.

१९२० सालच्या गांधीजींच्या असहकार आंदोलनास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सत्याग्रहामुळे ब्रिटिशांना खरोखरच भारत सोडून जावे लागते कि काय असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र चौरीचौरा येथे घडलेल्या  पोलीस स्टेशनवरील हल्ल्यामुळे गांधीजींनी तडकापडकी हे आंदोलन थांबवलं.

ही गोष्ट विठ्ठलभाईंना आवडली नाही. त्यांनी गांधीजींचा विरोध केला.

मतभेद वाढत असलेलं बघून त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारणीमधून बाजूला व्हायचं ठरवलं आणि मोतीलाल नेहरू,चित्तरंजन दास यांच्यासोबत स्वतःचा स्वराज्य पक्ष स्थापन केला. या स्वराज्य पक्षाने केंद्रीय सभेच्या निवडणुका लढवल्या. विठ्ठलभाई पटेल यांची खासदार पदी निवड झाली. एवढंच नाही तर त्यांनी १९२५ साली संसदेचे सभापती बनण्याचा मान पटकवला.

भाऊ काँग्रेसच्या विरोधातील राजकारण करत असताना देखील वल्लभभाई पटेल यांनी म.गांधींची साथ सोडली नाही.

त्यांची गांधीजी व पक्षावरील निष्ठा अभंग होती. त्यांची निवड योग्य ठरली. देशातील जनतेने काँग्रेसबरोबरच राहायचं ठरलं. स्वराज्य पक्षातील अनेक नेते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहामध्ये परत आले.

विठ्ठलभाई पटेलांनी देखील गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात भाग घेतला. त्यांना जेल देखील झाली. पुढे त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे लवकरच सुटका झाली. विठ्ठलभाई पटेल यांचं आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठं वजन होतं. युरोप व अमेरिकेतील विविध ठिकाणी त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रण देण्यात आलं.

या दौऱ्यावर असताना ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना येथे त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं तेव्हा त्यांच्यासोबत सुभाषचंद्र बोस हे होते. मृत्यू शय्येवर असताना त्यांनी आपले अंतिम इच्छा पत्र लिहिले. यावेळी तिथे हजर असणारे गोवर्धन पटेल व डॉक्टर डीटी पटेल यांना हे इच्छापत्राची पूर्तता होते का हे पाहण्याची जबाबदारी सोपवली.

२२ ऑकटोबर १९३३ रोजी विठ्ठलभाई पटेल यांचा स्विझर्लंडच्या जिनिव्हामध्ये मृत्यू झाला.

वल्लभभाई पटेल तेव्हा नाशिक जेलमध्ये बंदी होते. तेव्हा तिथेच त्यांना ही दुःखद बातमी कळवण्यात आली आणि विठ्ठलभाईंचे मृत्युपत्र वाचण्यास देण्यात आले. हे मृत्युपत्र वाचून वल्लभभाई पटेलांना प्रचंड धक्का बसला कारण विठ्ठलभाईंनी संपत्तीचे वारसदार म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड केली होती.

वल्लभभाईंनी या मृत्युपत्राच्या वैधते वरच शंका उपस्थित केली. त्यांचं म्हणणं होतं की विठ्ठलभाई यांची कोणीतरी खोटी सही केलेली आहे.

या मृत्युपत्रावरून प्रचंड वाद झाले. वल्लभभाई पटेलांनी सुभाषचंद्र बोस यांच्या विरुद्ध कोर्टात केस घातली. त्यांचा दावा होता कि लहान भाऊ म्हणून विठ्ठलभाईंच्या संपत्तीवर माझा अधिकार आहे.

पुढे सुभाषचंद्र बोस जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले तेव्हा हा वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा ठरलं. वल्लभभाईंनी सगळी संपत्ती काँग्रेस पक्षातील काही मान्यवरांची समिती बनवून त्यांच्याकडे सुपूर्द करायचा प्रस्ताव मांडला. सुभाष बाबुंचा देखील याला होकार होता पण या समितीत कोण असावं यावरून पुन्हा भांडणे झाली आणि हा प्रस्ताव बारगळला.

मुंबई हायकोर्टात खटला भरपूर दिवस चालला. सुभाषचंद्र बोस यांच्या वतीने शरतचंद्र बोस यांनी केस लढवली मात्र यात त्यांचा पराभाव झाला. जस्टीस बी.जे.वाडीया यांनी वल्लभभाई पटेल यांनाच विठ्ठल भाई पटेल यांचे खरे वारसदार मानले.

वल्लभभाई पटेलांनी सगळी संपत्ती विट्ठलभाई मेमोरियल ट्रस्टला दान देऊन टाकली. याविरुद्ध सुभाषबाबूंनी वरच्या कोर्टात अपील केली मात्र तिथेही निर्णय त्यांच्याविरोधात लागला.

वल्लभभाई पटेल आणि सुभाषचन्द्र बोस हे भारतीय राजकारणात स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्व करणारे नेते मात्र एका मृत्युपत्रावरून झालेला वाद त्यांच्यात कायमचा दुरावा आणणारा ठरला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.