यशवंतरावांनी विदर्भ विकासात मागे का राहिला याचं कारण एकदा सांगितलं होतं…

विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष हा गेल्या कित्येक वर्षांचा विषय. महाराष्ट्रात असूनही हा भाग इतरांच्या मानाने विकासात मागे राहिलेला दिसतो. यात अस्मानी कारणे तर आहेतच पण शिवाय राजकीय करणे देखील आहेत. वर्षानुवर्षे पश्चिम महाराष्ट्रातील तालेवार राजकारण्यांनी विदर्भाचा विकास आपल्या भागात खेचून नेला हि टीका होत असते.

एकदा हाच प्रश्न जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं हे आपण पाहू.

एकदा यशवंतराव चव्हाण औरंगाबादहून नांदेड येथे जाणार होते. त्यांच्यासोबत वसंतदादा पाटील होते, मधुकर भावे त्या दिवसांत औरंगाबाद लोकमत आवृत्तीच्या तयारीसाठी औरंगाबादमध्ये होते. यशवंतराव औरंगाबादच्या विश्रामगृह ‘सुभेदारी’वर आहेत, असं कळलं. भावे त्यांना भेटायला गेले.

यशवंतराव त्यांना म्हणाले, 

‘पत्रकार मित्रा नांदेडला येतोस का? शामराव कदमांचा सत्कार आहे, गप्पा मारत जाऊ, वसंतदादा आहेतच.’ 

ठरल्याप्रमाणे ते सकाळी नांदेडला निघाले. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील मागच्या सीटवर तर पुढच्या सीटवर मधुकर भावे. त्यांच्या गप्पा सुरु होत्या. भावेंना हि सुवर्णसंधी सोडायची नव्हती. त्यांनी इतकी वर्षे मनात राहिलेला सवाल विचारायचं ठरवलं. ते यशवंतरावांना म्हणाले, 

“यशवंतरावसाहेब, विदर्भ-मराठवाडा मागे राहिला आणि पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला, असा आक्षेप घेतला जातोय, नेमकं खरं काय? आणि तुमचं मत काय!” 

यशवंतराव म्हणाले, ‘मित्रा खरं बोलायचं की खोटं बोलायचं.’

मधुकर भावेंना काही कळलं नाही. ते म्हणाले, ‘म्हणजे काय’

यावर यशवंतरावांनी सांगितलं,

‘तू माझं उत्तर छापणार असशील तर खोटं बोलतो, छापणार नसशील तर खरं बोलतो.’

मधुकर भावेंनी मला विषय समजून घ्यायचा आहे असं सांगितल्यावर मग यशवंतराव खुलले आणि मग म्हणाले,

“मित्रा मला तू सांग, विदर्भात २५ इंचांपेक्षा कधीतरी पाऊस कमी पडलाय का? विदर्भातली सलग काळीभोर जमीन, कापसाचं उदंड पीक, मग तेथील एकही सहकारी सूत गिरणी धड का चालू शकत नाही? पश्चिम महाराष्ट्रात कापसांचं बोंड नाही, तेथे सहकारी सूत गिरण्या उत्तम चालतात.”

थोडंसं थांबून यशवंतराव म्हणाले,

‘इथे जागतिक कीर्तीचा संत्रा होतो. पण त्यावर प्रोसेस होते का? एक तरी प्रोसेसर कारखाना आहे का? तो कोणी करायचा? इथे महाराष्ट्रातली सर्वात जास्त वनसंपत्ती आहे. त्यावर आधारित उद्योग आहेत का? सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे, मग इथे उद्योग का होत नाही? तो कोणी काढायचा? मित्रा, एक गोष्ट लक्षात घे, सरकारपेक्षा सहकार हा अधिक प्रभावी आहे.

सरकार तोंडी लावण्यापुरतं असावं, पण मुख्य जेवण सहकार आहे. मला माफ कर, मी दोष देण्याकरिता सांगत नाही. पण हा चिंतनाचा विषय आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सहकारी कार्यकर्त्यांनी सहकाराची शक्ती समजून घेतली. विदर्भातल्या कार्यकर्त्यांना त्यात फार रस आहे, असं मला वाटत नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे.

यशवंतरावांच्या बोलण्यात हस्तक्षेप करून वसंतदादा म्हणाले,

‘साहेब, दोन-तीन लोक तिथे सहकारात आहेत, बापूराव देशमुख (वर्धा), नारायणराव काळे (आर्वी), बाबासाहेब केदार (नागपूर) यांनी सहकारात बरं काम केलेलं आहे.

दादांना पाठिंबा देत यशवंतराव म्हणाले, ‘दादा मान्य आहे, पण ते काम पुढच्या पिढीने पुढे नेलं का?

यशवंतराव आणखी बोलत होते, सांगत होते, ‘एक लक्षात घे, विकास हा खेचून आणायचा असतो, तुमच्या दारात पारिजातक असेल तरच त्याचा सडा पडेल त्याकरिता आधी पारिजातक दारात हवा आणि तो कार्यकर्त्यांनी लावायचा आहे. एवढी मोठी वैनगंगा सागरासारखी वाहते, त्या पाण्याचा उपयोग किती केला जातो? लिफ्ट एरिगेशन आहे का? या सगळया प्रश्नांभोवती विकास फिरत असतो.’

हे सगळं छापण्याकरिता तुला सांगितले नाही, असं बजावून यशवंतराव म्हणाले, सर्वच कटू सत्य राजकारण्यांना बोलता येत नाहीत. पण तुला विषय समजावून घ्यायचा होता म्हणून बोललो.

मधुकर भावे सांगतात, नांदेडपर्यंतच्या प्रवासात आणि परतीच्या प्रवासात वसंतदादा आणि यशवंतराव यांच्यासोबत छान चर्चा झाली. १९७२ दुष्काळात तासगावची द्राक्ष-द्राक्षाच्या मांडवाच्या वेलाला बर्फाचे खडे कापडाच्या पुरचुंडीत बांधून थेंब थेंब पाण्यावर द्राक्ष आम्ही कशी जगवली, तेही दादांनी सांगितले. ही दोन्ही माणसं महाराष्ट्राची फार मोठी माणसं होती. तो प्रवास छान झाला.

आज या घटनेला तीस चाळीस वर्षे ओलांडून गेली असतील पण मधुकर भावे यांच्या मते आजही हे मुद्दे तसेच आहेत. ५० वर्षात अर्थमंत्रीपद जास्तीत जास्त विदर्भाकडे. वीजमंत्री विदर्भाचा, पाटबंधारेमंत्री विदर्भाकडे, उद्योगमंत्रीपद विदर्भाकडे, ग्रामविकास मंत्रीपद विदर्भाकडे, महसूलमंत्रीपद सुद्धा विदर्भाकडे होते. ही सगळी महत्त्वाची खाती विदर्भाकडे होती, असं असूनही विदर्भाचा विकास का झाला नाही? याचा शोध विदर्भानेच घ्यावा असंही ते आपल्या लेखात सांगतात.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.