इम्रानला सलग दोन सिक्स हाणले आणि तिथंच या मराठी बॅट्समनच करियर संपवण्यात आलं

साल होतं १९७९, पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. भारतीय टीमचा कप्तान सुनील गावस्कर होता. तेव्हा देखील भारताची बॅटिंग आणि पाकिस्तानची बॉलिंग भारी समजली जायची. भारताच्या टीम मध्ये गावसकर सोबत गुंडाप्पा विश्वनाथ, वेंगसरकर, संदीप पाटील, कपिल ही मंडळी होती तर पाकिस्तानमध्ये वसीम राजा, जावेद मियांदाद, अब्दुल कादिर, सिकंदर बख्त असे मोठे प्लेअर्स होते.

पण त्या टीमचा स्टार होता फास्टर बॉलर इम्रान खान.

तो त्याचा पीक पिरियड होता. उंच देखणा तगडा इम्रान जगातल्या सर्वोत्तम बॉलर्स पैकी एक समजला जायचा. त्याचा तुफान स्पीड भल्याभल्यांची भांबेरी उडवून द्यायचा. इम्रानने ज्याप्रकारे बॉल स्विंग करायला सुरवात केली होती त्याकाळी तरी त्याचे उत्तर कोणत्याही बॅट्समन कडे नव्हते. सगळं जग त्याच्या मागे वेडं झालं होतं.

सात कसोटीच्या आधी पाक टीम एक सराव सामना मध्य विभागाविरुद्ध खेळणार होती. त्यांना भारतीय कंडिशनशी ऍडजस्ट करण्यासाठी हा सामना तर होताच पण या मॅच वर भारतीय सिलेकटर्सच देखील लक्ष होतं. नवीन खेळाडूंना खेळवून याच वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी चाचपणी केली जात होती.     

मध्य विभागाचा कप्तान होता पार्थ सारथी. या टीममध्ये विनोद माथूर, गोपाळ शर्मा, सुरेश शास्त्री, अनिल भानोत यांच्या बरोबर विदर्भाचे अनिल देशपांडे आणि विजय तेलंग हे होते.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये हि मॅच होणार होती. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. जावेद मियांदादने नेहमी प्रमाणे फटकेबाजी करत नाबाद शतक झळकवले. पाकिस्तानने ४ बाद ३०३ धावांवर डाव घोषित केला. हि मॅच सहज खिशात टाकली या भ्रमात त्यांची टीम बॉलिंगला उतरली.

इम्रानने नेहमीप्रमाणे सुरवातदेखील धमाकेदार केली. पहिल्याच ओव्हर मध्ये मध्य प्रांताच्या माथूरला त्याने पव्हेलियनमध्ये धाडले. इथून पुढे विकेटची रांग लागणार असच सगळ्यांना वाटत होतं पण एका खेळाडूने मात्र पाकच्या सगळ्या आशांवर पाणी फेरलं.

त्याच नाव विजय तेलंग.   

विजय तेलंग ओपनिंगला येऊन फटकेबाजी करण्यास फेमस होते. गेल्या काही वर्षांपूर्वी जयसूर्या, सेहवाग,सचिन, या खेळाडूंनी सुरवातीच्या ओव्हर मध्ये फास्टर बॉलरची पिटाई करायची टेक्निक सुरु केली होती ते विजय तेलंग तीस चाळीस वर्षांपूर्वी करत होते.

त्यांनी इम्रान खानला देखील सोडलं नाही. त्याच्या एका रोरावत येणाऱ्या बॉल ला तर त्यांनी हुक करून षटकार ठोकला. सगळं स्टेडियम स्तब्ध झालं. त्याकाळी आजच्या प्रमाणे इतके सहज षटकार मारले जात नव्हते. तेव्हा कॉमेंट्री मैदानातच माईक व स्पीकर घेऊन लाईव्ह केली जायची.

कॉमेंट्रीला होते भारतीय टीमचे चीफ सिलेक्टर राजसिंग डुंगरपूर.

राजसिंग आपल्या तिखट व स्पष्ट बोलण्यासाठी फेमस होते. त्यांनी विजय तेलंग यांच्या त्या षटकारानंतर हा अंदाजपंचे शॉट होता असं सांगितलं. इम्रानच्या फास्ट बॉलला तेलंग यांची बॅट लागून बोल सीमापार गेला असं ते थेट कॉमेंट्री मध्ये म्हणत होते. बॅटिंग करत असलेल्या तेलंग यांना हे शब्द ऐकू गेले. त्यांना हा आपला अपमान वाटला.

तिकडे इम्रान खान पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज उभा होता. त्याला देखील धक्का बसला होता. हा कोण कुठला नवीन बॅट्समन आपल्याला सिक्स मारतो हे त्याला आवडलं नव्हतं. धडधड पावले टाकत इम्रान धावत आला आणि मगाशी पेक्षाही जोरात बॉल फेकला.

विजय तेलंग वाटच बघत होते. त्यांनी त्याला थेट मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलं. इम्रान खानला बसलेला हा सलग दुसरा सिक्सर होता. आपला सिक्सर म्हणजे अंदाजपंचे शॉट नव्हता हे त्यांनी दाखवून दिलं होतं.

अख्ख स्टेडियम नाचत होतं. विजय तेलंग यांनी आनंदाने बॅट वर केली आणि कॉमेंट्री बॉक्सकडे इशारा केला पण इथेच त्यांची चूक झाली. 

पुढे मॅचमध्ये विजय तेलंग यांनी पाकिस्तानच्या प्रत्येक बॉलरला झोडपून काढले. पाकिस्तानच्या कप्तानाने अगदी जावेद मियांदादला देखील बॉलिंगला उतरवलं पण तेलंगचे वादळ थांबलेच नाही. मनसोक्त पिटाई केल्यावर ६६ धावांवर असताना त्यांना अब्दुल कादिरने आउट काढलं. मॅच अनिर्णयीत राहिली.

इम्रान खान हि मॅच कधीच विसरला नाही. त्याने आपल्या आत्मचरित्रात देखील विदर्भाच्या एका बॉलरने माझी पिटाई केली होती असा उल्लेख केला आहे. तेलंग यांच्या बॅटिंगने त्याला प्रचंड प्रभावित केलं होतं. असा तुफानी बॅट्समन मी कधी पाहिला नव्हता असं तो सहकाऱ्यांपाशी बोलला होता.

जस इम्रान खान तेलंग यांना विसरला नाही तस आणखी एक व्यक्ती होती जिने तेलंग यांना लक्षात ठेवलं, ते म्हणजे राजसिंह डुंगरपूर.

भारतीय टीमचे मुख्य सिलेक्टर असलेल्या डुंगरपूर यांना तेलंगनी सिक्सर नंतर दाखवलेली बॅट आवडली नव्हती. त्यांनी मनात गैरसमज करून घेतला व वर्ल्डकप च्या टीम मध्ये तेलंग यांच्या जागी कृष्णाम्मचारी श्रीकांत यांना ओपनर म्हणून संधी दिली. यानंतर विजय तेलंग यांच्यासाठी भारतीय टीमचे दरवाजे बंद झाले ते कायमचेच.

आजही त्यांना विदर्भाचा सर्वश्रेष्ठ बॅट्समन समजलं जातं. त्यांनी सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली पण राजसिंग यांनी मानापमानाच्या प्रश्न केल्यामुळे भारतीय टीम त्यांच्या बेस्ट वनडे बॅट्समनला मुकली हे मात्र खरं. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.