विलासराव देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचा नाही…

राज्याच्या राजकारणात हजरजबाबीपणाच्या बाबतीत नाव घ्यायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यावं लागत ते विलासराव देशमुख यांचे. विरोधकावर टीका करताना देखील अगदी देशमुखी शैलीत करायचे पण विरोधक देखील त्यावर पोट धरुन हसायचे. भाषणात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता म्हणून पण विलासरावांना ओळखलं जायचं.

विलासरावांच्या अश्याच हजरजबाबीपणाचा आणि शैलीदार टीकेचा अनुभव आलेला तो शिवसेनेच्या शिशिर शिंदे यांना.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटच्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदे यांचा समावेश होता. आक्रमक स्वभाव आणि आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी यासाठी ते आजही ओळखले जातात. शिवसेनेसाठी त्यांनी केलेली आंदोलने हे नेहमीच चर्चेचा विषय ठरायचे. १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी भारत- पाकिस्तान क्रिकेट मालिकेला विरोध दर्शवला होता. त्यावेळी शिशिर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियममध्ये घुसून खेळपट्टी उखडून टाकली होती.

अश्या या आक्रमक स्वभावाच्या शिंदेंचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सोबत देखील तितकाच घनिष्ठ स्नेह होता. शिंदे यांना विलासराव ‘शिंदे सरकार’ अशी हाक मारायचे. शिशिर शिंदे देखील विलासरवांच्या वाढदिवशी आठवणीने फोन करुन त्यांना शुभेच्छा द्यायचे. वरचेवर भेटी देखील व्हायच्या.

अशीच एक भेट झाली होती १९९९ साली. त्यावेळी नुकतेच युतीचे सरकार जावून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आले होते आणि यात मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख.

एके दिवशी शिशिर शिंदे एका ३५ वर्षे वयाच्या कर्करोगग्रस्त रुग्णाला मदत करण्याचे पत्र घेऊन त्यांच्याकडे गेले होते. अत्यंत तरुण वयात त्या रुग्णावर ही बिकट वेळ आली आहे, मुख्यमंत्री निधीतून २५ हजार रुपये मदत मिळावी, असे ते पत्र होते. शिशिर शिंदे आतमध्ये शिरताच विलासराव आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले

‘या, शिंदे सरकार कसे येणे केलेत?’

विलासरावांसमोर त्यावेळी काँग्रेसचे आठ ते दहा आमदार बसलेले होते. हजरजबाबी विलासराव समोर पाहत म्हणाले, यावेळी वाढदिवस वर्षा बंगल्यावर होणार. भरपूर गर्दी होणार. पण हे शिंदे सरकार आम्हाला कधी विसरले नाहीत. हा टोला काँग्रेसच्या आमदारांना चांगलाच वर्मी बसला होता.

पण अजून शिंदे यांना देखील एक अनुभव येणं बाकी होतं. शिंदे यांनी मदतीचे पत्र दिल्यावर विलासरावांना सांगितले, साहेब मी २५ हजार लिहिलेय, पण तुम्ही १५ हजार दिलेत तरी चालतील. पण नक्की द्या.

त्यावर विलासराव उद्गारले,

‘शिंदे सरकार, तुम्ही लिहिले २५ हजार, मी मंजूर करीन १५ हजार अस तुम्हाला वाटत?. मी काय युतीचा मुख्यमंत्री आहे का? २५ हजार मंजूर म्हणजे मंजूर, असे म्हणत त्यांनी पत्रावर सही केली.

मी काय युतीचा मुख्यमंत्री आहे का, असे म्हणून त्यांनी शिंदे यांना अगदी हजरजबाबीपणे टोला हाणला आणि नेहमीच्या लकबीत जोरजोरात हसले. शिंदे यांनी देखील खिलाडूवृत्तीने ही टिका घेतली आणि सोबतच त्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला मदत देखील मिळवून दिली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.