विनायक मेटेंच्या अपघाताबाबत संशय का व्यक्त केला जातोय ?

लोकप्रिय नेत्याचा जेव्हा अपघाती मृत्यू होतो तेव्हा लोकांना विशेषत: कार्यकर्त्यांना अशा नेत्यांचा मृत्यू पचवणं अवघड होवून जातं. संबंधित नेत्याच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा पसरतात, शंका विचारल्या जातात. घातपात असल्याची शंका व्यक्त केली जाते. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रश्न विचारण्यात आले होते. संशय व्यक्त करण्यात आला होता.

आत्ताही विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर प्रश्न विचारले जात आहेत. विनायक मेटेंचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे असा संशय त्यांच्या मृत्यूच्या काही तासानंतरच व्यक्त करण्यात आला. असा संशय व्यक्त करणाऱ्यांमध्ये विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

त्यातच सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात शिवसंग्रामचे कार्यकर्ते आण्णासाहेब वायकर एका स्थानिक पत्रकाराशी बोलताना दावा करत आहेत की, ‘३ ऑगस्टला शिक्रापूरजवळ काही गाड्यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता. एक एर्टिगा गाडी तेव्हा सारखी कट मारत होती.’ 

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विनायक मेटेंच्या पत्नीनंही ‘या गाड्यांचा आणि अपघातामधल्या गाडीशी काही संबंध आहे का हे तपासायला हवं आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी केली. 

त्यामुळे अपघात कसा झाला याबाबत तपास चालू असल्याने, हा प्रश्न चर्चेत आला आहे की हा अपघात होता की घातपात ?    

या प्रश्नाचं उत्तर सर्वात पहिलं अपघाताच्या ठिकाणावर कोण आणि किती वाजता पोचलं यातून मिळतं. याबद्दलची माहिती घटनास्थळावर दाखल झालेले महामार्ग पोलीस पळस्पेचे प्रभारी अधिकारी गणेश बुरकुल यांना सांगितली आहे, ते म्हणालेत, अपघाताची माहिती पोलीसांना ५.५८ मिनीटांनी मिळाली. पोलीस स्टेशनपासून अपघाताचं ठिकाण ६ किलोमीटरवर होतं. हे सहा किलोमीटरचं अंतर ७ मिनिटात पार करत मी घटनास्थळावर पोहचलो.

ज्या रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला आहे, त्या रसायनी पोलीसांच्या अहवालात काय म्हणलंय ते पण पाहू.

पोलीस अहवालात पहाटे ५ वाजून ५ मिनीट ही अपघाताची वेळ सांगण्यात आली आहे. अपघाताचे कारण सांगताना म्हणलंय की, ‘ नमूदवेळी व तारखेस फोर्ड एंडेएव्हर MH01DP6364 चालक एकनाथ कदम हे विनायक मेटे यांना घेवून मुंबई बाजूकडे दूसऱ्या लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे.

बॉडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आयआरबी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल, कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला घेतली आहे.

सदर वेळी आम्ही PSI चव्हाण तसेच रसायनी पोलीस स्टेशन API बालवडकर व स्टाफ तसेच IRB चे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते. सदर अपघाताची माहिती रसायनी पोलीस स्टेशनला दिली आहे.’

पुढे अपघाताची माहिती मिळाल्याची वेळ 5 वाजून ५८ मिनिट तर पोलीस निघाल्याची वेळ ५ वाजून ५८ मिनिट आणि अपघातस्थळी पोहचण्याची वेळ सकाळी ६ वाजून ५ मिनिटं तर कारवाई पूर्ण होण्याचा वेळ हा सकाळी ७ वाजून १० मिनिट सांगण्यात आला आहे.

थोडक्यात पोलीस अहवालात अपघाताची वेळ सकाळी ५ वाजून ५ मिनीट सांगण्यात आली आहे, तर सहा किलोमीटर अंतरावरच्या पोलीस स्टेशनला माहिती पोहचण्याची वेळ ही ५ वाजून ५८ मिनीट सांगण्यात आली आहे. पोलीसांना या अपघाताची माहिती ५३ मिनीटांनी मिळाली हे पोलीस अहवालातूनच स्पष्ट होतं आणि यामुळेच अपघात कि घातपात असा संशय व्यक्त करण्यात येतोय. कारण आहे अपघाताच्या ठिकाणी मदत पोहचण्यास झालेला वेळ..

याविषयी माध्यमांसोबत बोलताना विनायक मेटे यांच्या पत्नींनीही मदत पोहचण्यास झालेल्या वेळेबद्दल शंका व्यक्त केल्या आहेत.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्यात की, “आपत्कालीन सेवा असलेल्या रुग्णवाहिकेचा नंबर सर्वांनाच माहित असतो. मेटे यांच्या ड्रायव्हरला तो माहित नसेल हे शक्य नाही. ड्रायव्हरने आम्हाला ते नेमके कुठे आहेत, हे सांगितलं नाही, शिवाय लोकेशनही पाठवलं नाही. वाहतूक पोलिसांकडून माहिती मिळताच मी जवळपास पाऊण तासात रुग्णालयात पोहोचले.”

“मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं, की पाऊण तासापूर्वी ही घटना घडलेली नाही, किमान दोन तास उलटले होते. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस काही वेळ गेल्यानंतर पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं. म्हणजे आमच्यापासून काहीतरी लपवलं जातंय…”

तर विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलंय की,

आम्ही बीडकडून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकनं कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, १०० नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अँम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते..

पोलीस अहवालात चालकाचं नियंत्रण सुटलं अस सांगण्यात आलं आहे, तर चालकानं ट्रकनं कट मारला अस सांगितलं आहे. दूसरीकडे पोलीसांनी अपघाताची वेळ ५ वाजून ५ मिनिट सांगितली आहे, पण अपघाताची माहिती मिळाली ती वेळ ५ वाजून ५८ मिनीट सांगितली आहे.

तर चालकानं आपण १०० नंबरला फोन करत होतो तरीही कोणी फोन उचलला नाही अस सांगितलं आहे. या घटनाक्रमामुळेच घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

आत्ता सर्वात शेवटचा मुद्दा पहायला हवा तो म्हणजे, अपघात कोणत्या ट्रकमुळे झाला आणि पोलीस तपासात कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत…

रायगड पोलीसांनी सिसीटिव्हीच्या आधारे ट्रक शोधला. हा ट्रक दमण पासिंगचा असल्याची माहिती त्यांना मिळाली. तर ट्रकचा मालक पालघर जिल्ह्यातल्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतला असल्याची माहितीही मिळाली. ट्रक मालकाला सोबत घेवून चालकाची माहिती घ्यायला पोलीसांनी सुरवात केली. ट्रक आणि ट्रकचालक दमणमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर दमणमध्ये जाऊन पोलिसांच्या पथकानं ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतलं.

कासा पोलिसांनी रात्री उशिरा कासा पोलीस स्टेशनला ट्रक आणि चालकाला आणलं. त्यानंतर रायगडमधल्या रसायनी पोलीस ठाण्यात ट्रक आणि चालकाला सुपूर्द करण्यात आलं.

१४ ऑगस्टच्या रात्रीच रायगड पोलिसांकडे चालक आणि ट्रकचा ताबा देण्यात आला असल्याचं पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे. ट्रकचालकासोबतच्या अधिकच्या चौकशीनंतर आणि अपघातस्थळी पोहचण्यास उशीर का झाला ? पोलीसांना अपघाताची माहिती वेळेत का मिळाली नाही ? व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तथ्य आहे का ?

या तपासानंतरच अधिकच्या गोष्टी स्पष्ट होण्यास मदत मिळेल. तुर्तास तरी या अपघातावर संशयाचं वातावरण कायम आहे, ते सांगितलेल्या कारणांमुळेच…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.