मुंबईमधलं गूढ बंकर वालचंद शेठजींनी बनवलं होतं..

वालचंद हिराचंद दोशी यांची ओळख भारताच्या उद्योगजगताचे भीष्म पितामह अशी केली जाते. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जखडलेल्या देशात त्यांनी
जहाज बनवण्यापासून ते कार, विमान बनवण्याचे स्वदेशी कारखाने उभारले.

वालचंद मूळचे सोलापूरचे.

घरचा कापडाचा उद्योग होता. वालचंद यांचं त्यात मन रमत नव्हतं. लक्ष्मण बळवंत फाटक या रेल्वे क्लार्कच्या मदतीने त्यांनी एक कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली.

सुप्रसिद्ध बार्शी लाईट ही रेल्वे लाईन त्यांचे सुरवातीच्या काळचे प्रोजेक्ट होते.

त्यांनी केलेलं जबरदस्त काम व त्यांची सचोटी पाहून मुंबई पुण्याला जोडणाऱ्या भोर घाटात मोठमोठे बोगदे बांधण्याच काँट्रॅक्ट वालचंद यांच्या कंपनीला मिळालं.

वालचंद यांना फक्त रेल्वेचे काँट्रॅक्टर राहायचं नव्हतं. त्यांनी खाणीची कामे घेण्यास सुरुवात केली. वालचंद यांची महत्वाकांक्षा आपल्याला झेपणार नाही म्हणून फाटक त्यांच्या पासून वेगळे झाले.

बांधकाम क्षेत्रात वालचंद यांचं नाव मोठं झालं होतंच पण त्यांनी जहाज बांधणी, विमान उद्योग, साखर कारखाना, चॉकलेट कंपनी असे शेकडो उद्योग स्थापन केले.

विसाव्या शतकात भारतातील सर्वात मोठा उद्योगपती म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं होतं.

याच काळात मुंबईमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठ्या साठी सरकारने तानसा धरण ते मुंबईदरम्यान पाईपलाईन बनवण्याची योजना आखली होती. हे सिमेंटचे भलेमोठे पाईप बनवण्याचा कारखाना वालचंद यांनी सुरू केला.

याच कारखान्या जवळ एका टेकडीवरची जागा त्यांना पसंत पडली. तिथे काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचे तीन चार बंगले होते.

ही टेकडी म्हणजे आज मुंबईतील फेमस अँटोपहिल.

अंतोबाचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या टेकडीवर वालचंद हिराचंद यांनी आपल्या कुटुंबासाठी एक प्रशस्त महाल बनवून घेतला. हा बंगला म्हणजे तेव्हाच्या मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय होता.

दरम्यान जागतिक पातळीवर मोठी खळबळ सुरू होती.

हिटलरच्या आडमुठेपणामुळे दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले होते. इटली जपान यांनी देखील त्याच्या साथीने इंग्लंड फ्रांस या दोस्त राष्ट्रांच्या विरोधात आघाडी उघडली.

भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असल्यामुळे आपल्यावरही हे महायुद्ध लादण्यात आलं. भारतीय सैन्य इथली साधनसामुग्री ब्रिटिशांनी वापरली. यात वालचंद यांचा लढाऊ विमाननिर्मितीचा कारखाना देखील होता.

वालचंद यांच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे ब्रिटिश सरकारने नॅशनलायजेशन केले.

महायुद्धात इच्छेविरुद्ध वालचंद जोडले गेले. पहिले महायुद्ध पाहिल्यामुळे युद्धाची दाहकता वालचंद यांना ठाऊक होती. भारतावर पूर्वेकडून जपान हल्ला करणार याची त्यांना खात्री होती.

मुंबई कलकत्ता दिल्ली या प्रमुख शहरांवर बॉम्ब हल्ला करायचा जपानचा प्लॅन होता.

मुंबईवर जर बॉम्ब हल्ला झाला तर आपलं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून वालचंद यांनी गुप्तपणे अँटोपहिलच्या बंगल्याजवळ सिमेंटच्या पाईप वापरून एक मजबूत बंकर उभारण्यात आले.

वालचंद यांनी कोणालाही या बंकरचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.

कित्येक वर्षे ते गुप्तच राहिले. पुढे स्वातंत्र्यानंतर या बंकर चा शोध लागला.

सुरवातीला हे गूढ भुयार कसले याबद्दल तिथल्या रहिवाश्यांना ठाऊक नव्हते. भुताटकी किंवा चोरांचा अड्डा असे समजून तिकडे कोणी फिरकत नसत.

पण पुढे अभ्यासातून हे बंकर वालचंद यांनी बनवले आहे हे समोर आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.