बिल्किस बानो प्रकरणातील निकालाचा जग निषेध करतंय, काय म्हणतोय जागतिक मीडिया ?

गेल्या चार दिवसांपूर्वी १६ ऑगस्टला बिल्किस बानो प्रकरणावर नवीन अपडेट आली. गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक मानल्या जाणाऱ्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ कैद्यांची १६ ऑगस्टला सुटका करण्यात आली.

तेव्हापासून बिल्किस बानो प्रकरणावर गुजरात सरकारने दिलेल्या निर्णयावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ऍक्टिव्हिस्टपासून ते सामान्य नागरिक देखील बिल्किस केसमध्ये देण्यात आलेल्या न्यायावर (?) बोलते होतायेत.

आवाजात आवाज मिसळत आहे त्यामुळे लवकरच याचा ‘आक्रोश’ निर्माण होतो की काय अशी शंका व्यक्त केली जातेय.

चार दिवसांपासून बिल्किस बानो प्रकरणाने देशभरातील माध्यमांच्या टॉप हेडलाईनमध्ये स्थान मिळवलं आहे. छोट्यातील छोटी अपडेट दिली जात आहे. मात्र हे प्रकरण फक्त देशभरापुरतं मर्यादित नक्कीच राहिलेलं नाहीये.

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने म्हणजेच USCIRF ने बिल्किस बानो प्रकरणात दोषी ठरलेल्या ११ जणांच्या सुटकेचा निषेध केला आहे.

“२००२ च्या गुजरात दंगलीदरम्यान गर्भवती मुस्लिम महिलेवर बलात्कार केल्याच्या आणि मुस्लिम पीडितांची हत्या केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ११ जणांच्या लवकर आणि अन्यायकारक सुटकेचा यूएससीआयआरएफ तीव्र निषेध करतं” 

असं यूएससीआयआरएफचे उपाध्यक्ष अब्राहम कूपर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

हे दाखवून देतं की जागतिक स्तरावर देखील बिल्किस बानो प्रकरणावर बोललं जात आहे. 

म्हणूनच बिल्किस बानो प्रकरणावर जागतिक स्तरावर काय प्रतिक्रिया उमटत आहेत, हे जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियाने हे प्रकरण कसं कव्हर केलं जातंय? बघूया…

अल -जझीरा 

अल -जझीरा हा अरब कंट्रीजचा मीडिया आहे. कतारमधून त्याचं काम चालतं.  

‘Eleven convicts in Gujarat gang rape, murder cases freed in India’

‘गुजरातमधील सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील ११ दोषींची भारतात सुटका’ या हेडलाईनने अल -जझीराने १६ ऑगस्टला बिल्किस बानो प्रकरणाची बातमी छापलीये. हेडलाईन वाचूनच अगदी उपहासात्मक शब्दांत या प्रकरणाचं वृत्तांकन त्यांनी केल्याचं लक्षात येतं. 

बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींना गुजरातच्या गोध्रा शहरातील तुरुंगातून मुक्त करण्यात आलंय. कारण राज्य सरकारने शिक्षेत सूट देण्याचा त्यांचा अर्ज मंजूर केलाय, असं केवळ २-३ ओळीत सध्या काय घडलंय हे सांगून लगेच ‘बिल्किस सोबत काय झालं होतं?’ हे सांगणाऱ्या मुद्द्याला हात लावण्यात आलाय. त्यात ‘घटना घडली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते’ हे आवर्जून सांगण्यात आलंय. 

प्रकरण सांगून झाल्यानंतर त्यांनी एकच मुद्दा सांगून वृत्त संपवलंय. 

यात दिल्लीतील वकील मेहमूद प्राचा यांची अल -जझीराने घेतलेली प्रतिक्रिया मांडलिये. “भारतीय जनता पक्षाच्या राजकीय नेतृत्वात दोषींच्या सहभागाचा हा आणखी एक पुरावा आहे.” अशी ती प्रतिक्रिया आहे. म्हणजे भारतात राजकीय नेत्यांवर दोषींचा कसा वचक आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या वाचकांना सांगितलेलं दिसतं. 

या प्रकरणात त्यांनी १८ ऑगस्टला अजून एक बातमी दिली आहे ज्यात त्यांनी पूर्णतः बिल्किस बानोचं सरकारच्या निर्णयावर काय म्हणणं आहे, हे छापलं आहे.

वॉशिंग्टन पोस्ट 

वॉशिंग्टन पोस्ट हा युनाइटेड स्टेट्सच्या वॉशिंग्टनमधून चालणारा मीडिया आहे. 

‘Outrage in India as men convicted of rape, murder walk free’

‘बलात्कार, खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्यांची सुटका झाल्याने भारतात संताप’ या हेडलाईनने त्यांनी १८ ऑगस्टला बिल्किस बानो प्रकरणाची बातमी छापलीये. 

कोणत्याही देशात जेव्हा नागरिकांत खळबळ निर्माण होते तेव्हा काहीतरी मोठं आणि गांभीर्याचं घडलेलं असतं, हे समजून येतं. याच गोष्टीला लक्षात घेऊन वॉशिंग्टन पोस्टने ‘भारतीय लोकांत असंतोष का बळावलाय’ हे सांगत वाचकांचं या प्रकरणाकडे लक्ष वेधलंय. 

इतकंच नाही तर स्टोरीला त्यांनी महिला प्रोटेस्टर्सचा फोटो छापून महिलेच्या बाबतीत अन्याय झाल्याचं प्रतीकात्मकपणे दर्शवल्याचं दिसतं. 

“बिल्किस बानो २००२ मध्ये पाच महिन्यांची गर्भवती होती तेव्हा हिंदू टोळीने गुजरातच्या मुस्लिमविरोधी हिंसाचारादरम्यान तिच्यावर हल्ला केला होता. तिच्याच शेजारच्यांनी शस्त्र दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलीला आपटून मारण्यात आलं होतं.”

अशा शब्दांत त्यांनी बातमीची सुरुवात केलीये. सुरुवातीलाच प्रकरणाचं गांभीर्य सांगून तिच्या दोषींची आता गुजरात सरकारने सुटका केलीये, असं एका ओळीत त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्याच खाली पुन्हा बिल्किसचं म्हणणं मांडलंय की, तिने न्यायव्यवस्थेवर विश्वास टाकला होता जो पूर्णतः भंग झालाय. 

बातमीच्या पहिल्या टप्प्यातच त्यांनी बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारने आणि न्यायव्यवस्थेने दिलेल्या न्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं दिसतंय. ते दर्शवताना त्यांनी न्याय देणाऱ्या पॅनेलवरील सुजल मयात्रा यांचं म्हणणं आवर्जून ‘दोन वाक्यांत’ छापलं आहे. ते असं.. 

‘दोषींनी १४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. गुन्ह्याचे स्वरूप, गुन्हेगारांचं वर्तन बघून आम्ही त्यांना मुक्त कारण्याचा निर्णय घेतला असून पीडितेची सुरक्षा देखील विचारात घेण्यात आली आहे.’

‘दोषींची सुटका’ आणि ‘पीडितेची सुरक्षा’ या शब्दांतील अंतर्विरोधाचा वॉशिंग्टन पोस्टने  नेमक्या शब्दांत वेध घेतल्याचं दिसतं. 

न्यूयॉर्क टाइम्स 

न्यूयॉर्क टाइम्सने या प्रकरणाचं वार्तांकन करताना भारतात दिवसेंदिवस भीतीदायक वातावरण वाढत असल्याचं सूचित केलंय. 

‘In India, New Wave of Trauma as 11 Convicted of Rape and Murder Walk Free’ 

‘भारतात ट्रॉमाची नवीन लाट, बलात्कार आणि हत्या करणारे ११ दोषी मुक्त’ इतक्या मोजक्या शब्दांत त्यांनी भारताची न्यायव्यवस्था आणि भारताचं बदलतं वातावरण समजावण्याचा प्रयत्न केलाय.

२००२ मध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर बिल्किस बानोने आता कुठे आपलं आयुष्य नव्याने सुरु करण्याकडे पाऊलं टाकली होती तितक्यात राज्य सरकारने तिच्या हल्लेखोरांची जन्मठेपेची शिक्षा कमी केली आहे, अशा शब्दांत त्यांनी बातमीचा मथळा छापलाय.

१५ वर्षे ती आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरोघरी फिरत होती. कोर्टाकडून या हमीची वाट पाहत होती की, ज्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या अनेक नातेवाईकांची हत्या केली, ते उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवतील.

२०१७ मध्ये कुठे तिला ती हमी मिळाली आणि २००२ साली तिला बसलेल्या ट्रॉमातुन बाहेर येत तिच्या पतीसोबत एका स्टेबल ठिकाणी स्टेबल आयुष्य घालवण्याची सुरुवातच तिने केली होती की बातमी आलीये… ‘तिचे आरोपी सुटलेत’

या आशयाने न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या वाचकांना एकीकडे बिल्किस बानो प्रकरणाची ओळख करून दिलीये तर दुसरीकडे भारतीय न्यायव्यवस्थेचा देखील परिचय करून दिलाय, असं दिसतं. आता तो कसा दिला आहे, ते योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. 

द गार्डियन 

आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये मोठं नाव आणि वार्तांकनात महत्वाचं स्थान निर्माण केलेल्या या वृत्तसंस्थेने काहीसं स्पष्ट बोलत भारतातील सध्याची वस्तुस्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. 

‘Muslim woman raped by Hindu mob shocked by release of 11 jailed men’

हिंदू जमावाकडून बलात्कार झालेल्या मुस्लिम महिलेच्या आरोपींची सुटका हे धक्कादायक असल्याचं त्यांनी हेडलाईनमधून सांगितलंय. भारतात वाढीस लागलेल्या हिंदू-मुस्लिम असंतोषाचं उदाहरण म्हणून त्यांनी या घटनेला दर्शवल्याचं दिसतं. 

सुरुवातीच्या ३-४ ओळींत त्यांनी २००२ च्या त्या एका दिवशी बिल्किस बानोने तिचं काय काय गमावलं हे सांगितलंय तर त्याच्या खालच्याच पॅराग्राफमध्ये त्यांनी गुजरात सरकारचा असा कोणता कायदा आहे ज्याने बिल्किसच्या दोषींची सुटका केलीये, हे सांगितलंय. 

शिवाय दोषींची सुटका करताना बिल्किस आणि तिच्या पतीला याची माहितीही दिली गेली नव्हती, हे त्यांनी आवर्जून अधोरेखित केलंय. 

त्यांनी बिल्किसचं प्रकरणावर काय म्हणणं आहे याला स्टोरीत वरती स्थान दिलं असून त्यानंतर भारतात सध्या होत असलेल्या मुस्लिम अत्याचारांची माहिती आकडेवारीनुसार दिली आहे आणि मग बिल्किस सोबत काय घडलं होतं तिथून सुरुवात करत आता काय झालंय आणि त्यावर कशाप्रकारे टीका होतीये इथपर्यंत सविस्तर स्पष्ट केलं आहे. 

गार्डियनने बिल्किसच्या प्रकरणातून भारतात वाढत चाललेला मुस्लिम जातीबद्दलचा द्वेष वाचकांना सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि या स्थितीचा निषेध केल्याचं दिसतंय. 

तरी तुम्ही स्वतः या स्टोरी वाचा आणि तुमचं यातून काय निरीक्षण निघतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा… 

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.