गौतम अदानींचा १ लाख कोटींचा बाजार उठणारा NSDL नावाचा मॅटर काय आहे?

कोरोना काळात उद्योग-धंदे बंद असल्यामुळे अनेकांचा अक्षरशः बाजार उठला होता. आपल्या झालेल्या नुकसानीचे आकडे मोजतं होता. पण त्याचं वेळी एक माणूस मात्र खोऱ्यानं पैसा ओढत होता. त्या माणसाच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झालेली पहायला मिळाली. त्यांचे काही शेअर्स एका वर्षात दुप्पट ते दहापट वाढले होते. नवीन कंपन्या विकत घेतं होता.

एकूणच या काळात हा माणूस भलताचं फायद्यात होता. या माणसाचं नावं म्हणजे गौतम अदानी.

वरच्या ५ ओळींमध्ये सगळीकडे ‘होतं’ असं लिहिलं आहे. कारण गेल्या वर्षभरात शेअर बाजारात जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या अदानी ग्रुपचे शेअर्स आज भूकंप झाल्यासारखे हादरले. एकाच दिवसात अदानी ग्रुपचं भांडवली बाजारातलं मूल्य तब्बल १ लाख ३ हजार कोटी रुपयांनी कमी झालं आहे. आणि याला कारण ठरलं आहे,

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, अर्थात एनएसडीएल.

एनएसडीएलने अदानी ग्रुपमध्ये पैसा गुंतवलेल्या तीन विदेशी फर्मचे खाती गोठवल्याची बातमी समोर आली. यात अल्बुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्वेस्टमेंट फंड या तीन फर्ममधले तब्बल ४३ हजार कोटी रुपयांचे शेअर्स गोठवण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं. आणि याच बातमीनंतर अदानी ग्रुपचे शेअर्स अचानक आपटले.

एनएसडीएल म्हणजे नेमका काय विषय आहे ते समजून घ्या…

भारतात २ प्रमुख डिपॉजिटरीज आहेत. एक म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरीज लिमिटेड अर्थात एनएसडीएल आणि दुसरी सेंट्रल डिपॉजिटरीज सर्विसेस लिमिटेड सीडीएसएल. पण आता गौतम अदानी यांचा बाजार उठवला आहे तो एनएसडीएलनं. त्यामुळे या ठिकाणी आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

एनएसडीएल ही एक अशी सरकारी संस्था आहे जी ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना कागदविरहित पद्धतीने म्हणजे फुल्ली ऑनलाईन पद्धतीनं शेअर्स आणि सिक्युरिटीजची खरेदी-विक्री करण्याच्या कामात मदत करण्याचं काम करते. 

८ ऑगस्ट १९९६ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावर स्थापन होणार हा पहिला इलेक्ट्रॉनिक डिपॉजिटरीज होता. या संस्थेच्या स्थापनेमुळेचं भारतीय शेअर बाजारचं आधुनिकीकरण आणि कागद विरहित होण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल होतं.

याआधी शेअर्सला प्रत्यक्ष शेअर्स प्रमाणपत्राच्या स्वरूपात ठेवलं जायचं. पण शेयर्सचं डिमटेरियलायझेशन झाल्यानं ट्रेडर्सना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपले शेअर्स ठेवण्यासाठी इकडे स्विच मरावं लागलं.

एनएसडीएलनं या सगळ्या बदलात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आणि आजपर्यंत ही संस्था प्रत्यक्ष व्यवहार स्वरूपात शेयर्स आणि सिक्युरिटीजशी संबंधित ज्या रिस्क होत्या त्या कमी करण्यासाठी काम करतं आहेत. आता या रिस्क म्हणजे चोरी होणं, धोकेबाजी, डिलिव्हरीजसाठी वेळ होणं आणि त्यातून नुकसान होणं अशा काही.

एनएसडीएलकडे आणखी एक काम आहे ते म्हणजे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचं खातं उघडण्याची सोय उपलब्ध करून देणं. याची तुलना आपण एखाद्या नॅशनलाईज बँकेशी देखील करू शकतो. आता हे खातं कशासाठी तर ग्राहक अर्थात ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार आपले फंड्स स्टोअर्स करू शकतील. हे फंड्स शेअर्स आणि सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक रूपमध्ये असतात.

हे खात उघडण्यासाठी आपल्याला थेट या संस्थेशी संपर्क साधता येत नाही. त्याऐवजी आपल्याला डिपॉजिटरीज पार्टिसिपेंटच्या माध्यमातून आपलं खात उघडावं लागतं. डीपी म्हणजे असे एजंट्स असतात जे एनएसडीएल आणि ट्रेडर्स, गुंतवणूकदारांमध्ये लिंकचं काम करतात.

एनएसडीएलकडे आणखी एक काम आहे. ते म्हणजे डिस्पिलरी ऍक्शन कमिटीला कोणत्याही गुंतवणूकदाराला शेअर बाजारातून निलंबित करणं, त्यांना बाजारातून बाहेर काढणं किंवा सिक्युरिटीजला अपात्र घोषित करण्याचा आधिकार आहे.

या सोबतच कोणत्याही गुंतवणूकदाराच्या अकाउंटला फ्रीझ करण्याचा, त्या खात्याबाबत तपासणी करण्याचा, संबंधित गुंतवणूकदाराचे कॉल रेकॉर्ड करण्याचा किंवा त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा देखील अधिकार आहे. यात जर कृत्रिम गुंतवणूक करून शेअर्स वाढवण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्याबाबत देखील चौकशी केली जाते.

या सोबतचं एनएसडीएलकडून पॅनकार्ड बनवण्याचं काम देखील केलं जातं. पॅनशी संबंधित सगळा डाटा हीच संस्था गोळा करत असते आणि संग्रहित देखील करत असते.

एकूणच डिपॉजिटरीजने शेयर बाजारचं काम बरंच सोपं बनवलं. यात शेअर्सचं हस्तांतरण, ऑफ-मार्केट ट्रान्सफर, इंटर-डिपॉजिटरीज ट्रान्सफर आणि अन्य कॉर्पोरेट कार्य या सारख्या विविध सेवांसह एनएसडीएल आज बाजारामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.