जेम्स वेब टेलिस्कोपनं काढलेले फोटो तर आपण पहिले, पण त्यात नेमकं आहे काय ?

नासा वाले बहोत खतरनाक है, वो चांद पे पौदे लगाने वाले है, असा आवाज आणि अचाट ग्राफिक्स असणारा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर हमखास पाहिला असेल. त्या व्हिडीओची आठवण येण्याचं कारण म्हणजे, नासानं खरंच दाखवून दिलंय ते किती खतरनाक आहेत ते.

मंगळवारपासून सोशल मीडियावर नासाच्या जेम्स वेब या स्पेस टेलिस्कोपनं काढलेले फोटो व्हायरल होतायत.

पण या फोटोत नेमकं आहे काय ? हे इतके भन्नाट फोटोज आपल्यापर्यंत पोहोचवणारी जेम्स वेब टेलिस्कोप काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं अवकाश अभ्यासक रुचिरा सावंत यांच्याशी संपर्क साधला. या फोटोजमागचं रहस्य आणि जेम्स वेब अवकाशात पाठवण्याचे फायदे सोप्या शब्दांमध्ये जाणून घेऊयात.

सुरुवात करूयात जेम्स वेब टेलीस्कोपपासून.

WhatsApp Image 2022 07 13 at 5.39.12 PM
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप

जेम्स वेब ही एक अवकाश दुर्बीण आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत बनलेल्या सगळ्या अवकाश दुर्बिणींपैकी जेम्स वेब सगळ्यात पॉवरफुल आहे. याआधी ज्या अवकाश दुर्बिणीनं आपल्याला विश्वाचं चित्र उलगडून दाखवलं, त्या हबलची जागा जेम्स वेबनं घेतली आहे. 

१९६१ ते १९६८ या काळात नासाचे प्रशासक असणाऱ्या आणि अपोलो मिशन सारख्या महत्त्वाच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या जेम्स वेब यांचं नाव या दुर्बिणीला देण्यात आलंय. १९९६ मध्येच जेम्स वेबच्या निर्मितीविषयीची प्रक्रिया सुरू झाली होती.

 २००७ मध्येच ही दुर्बिण लॉंचसाठी तयार होईल आणि त्यासाठी ५०० मिलियन डॉलर्स खर्च येईल असं सांगण्यातही आलं होतं. मात्र प्रत्यक्षात २५ डिसेंबर २०२१ ला जेम्स वेबचं प्रक्षेपण करण्यात आलं आणि यासाठी खर्च आला १० बिलियन डॉलर्स. 

जेम्स वेबला सोन्याचा मुलामा असलेल्या बेरोलियम पासून बनवलेले षटकोनी आकाराचे १८ आरसे आहेत, जे एकूण २१ फूट व्यासाचा आरसा तयार करतात. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या एकत्रित प्रयत्नातून तयार करण्यात आलेली ही दुर्बीण ३० दिवसात १६ लाख किलोमीटर अंतर कापून अवकाशात आपल्या लँगरेंज पॉईंट म्हणजेच स्थिर बिंदूवर पोहोचलीये. 

पाच लेयर असलेलं सनशिल्ड, तापमान अतिशीत ठेवण्याची व्यवस्था आणि उच्चस्तरीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं जेम्स वेबनं अवकाशाची रंगीत छायाचित्रं पाठवली आहेत.

नासानं प्रकाशित केलेल्या फोटोजमध्ये नेमकं काय आहे ? हे पाहुयात. 

पहिला फोटो आहे गॅलॅक्सी क्लस्टर SMACS 0723 चा. 

WhatsApp Image 2022 07 13 at 5.41.46 PM
गॅलॅक्सी क्लस्टर SMACS 0723

या फोटोमध्ये आपल्याला काही चमकणारे तारे दिसतात, काही वेगवेगळे आकार दिसतात. या फोटोमध्ये जो प्रकाश दिसतो तो तब्बल १३ बिलियन वर्ष जुना आहे. बारा तास फ्रेम रेकॉर्ड केल्यानंतर जेम्स वेबला हा फोटो मिळालाय. यात जे वेगवेगळे आकार दिसतायत, तो आहे दीर्घिकांचा समूह. 

यात काही तारे चमकताना दिसतायत, बघताना असं वाटतं की हे लई जवळ असतील. पण हे तारे त्या दीर्घिकांच्याही मागे आहेत. पण तिथं असणाऱ्या मजबूत गुरुत्वाकर्षणाच्या भिंगासारख्या कामामुळं हे तारे आपल्याला जवळ दिसतात. 

सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे, ज्या बिग बँगमधून विश्वाची निर्मिती झाली असं मानलं जातं, ते बिग बँग १३.९ बिलियन वर्ष जुनं आहे, म्हणजे आपण विश्वाच्या निर्मितीच्या रहस्यापासून फक्त .९ बिलियन वर्ष लांब आहोत. यात आपल्याला अनेक दीर्घिका, तारे दिसत असले, तरी हा संपूर्ण युनिव्हर्सचा एका गव्हाच्या दाण्या एवढा भाग आहे. 

या फोटोला ‘वेब्स फर्स्ट डीप फिल्ड’ असंही म्हणलं जातंय.

पुढचा फोटो आहे, सदर्न रिंग नेब्युलाचा

WhatsApp Image 2022 07 13 at 5.45.40 PM
Southern Ring Nebula

यात आपल्याला अगदी मध्यभागी एक तारा दिसतोय आणि आजुबाजूला गॅस पेटल्यावर दिसतात तसे रंग. पण हे नेब्युला असतंय काय, तर अवकाशात ताऱ्यांचे स्फोट होतात म्हणजेच तारे मृत पावतात. त्यावेळी धूळ आणि वायू तयार होतात. या धूळ आणि वायूंपासून तयार झालेला एक ढग म्हणजे नेब्युला.

काही नेब्युला असे असतात जे नवीन तारे तयार होणाऱ्या भागांमध्ये निर्माण होतात. सदर्न रिंग नेब्युला हा एका मृत ताऱ्याचा अवतीभवती तयार झालाय. जो आपल्या पृथ्वीपासून दोन हजार प्रकाशवर्ष दूर आहे. आपल्याला दिसणाऱ्या फोटोत या नेब्युलामधला तारा, त्याच्या आजूबाजूचे धूळ आणि वायूचे पदर, ही प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतीये. 

२ हजार प्रकाशवर्ष दूर असलेल्या नेब्युलाचे इतके स्पष्ट फोटो देणं हेच जेम्स वेबचं वैशिष्ट्य मानलं जातंय. यामुळं नवीन तयार होणाऱ्या ताऱ्यांचा अभ्यास करणं वैज्ञानिकांसाठी सोपं होणार आहे.

यानंतरचा फोटो आहे करिना नेब्युलाचा. 

WhatsApp Image 2022 07 13 at 5.47.06 PM
Carina Nebula

याबद्दलची माहिती देताना नासानं कॉस्मिक क्लिफ हा शब्द वापरलाय. नवीन तारे तयार होण्याचं क्षेत्र असतं तिथं जे पर्वत किंवा खोरी तयार होतात, ज्याला कॉस्मिक क्लिफ असं म्हणतात. करिना नेब्युलातल्या कॉस्मिक क्लिफवर फोकस करताना तारे तयार होण्याची या आधी कधीच न दिसलेली एक अत्यंत रॅपिड फेज समोर आणण्यात जेम्स वेबला यश आलंय.

आता बोलूयात स्टीफन क्विंटेट बद्दल.

WhatsApp Image 2022 07 13 at 5.48.23 PM
Stephen Quintet

फोटोत आपण शाळेत असताना आकाशगंगेचं चित्र पाहायचो तसे वेगवेगळे आकार दिसतायत, काही तारे चमकताना दिसतायेत. कारण स्टीफन क्विंटेट हा पाच आकाशगंगांचा समूह आहे. या फोटोमध्ये NGC 7318 मधल्या ए आणि बी आकाशगंगांची टक्कर होताना दिसतेय. 

या आकाशगंगांची टक्कर झाल्यानं एक शॉकव्हेव्ह तयार झालेलीही स्पष्ट दिसतीये. हा पाच आकाशगंगांचा समूह आपल्यापासून २८० मिलियन प्रकाशवर्ष दूर आहे. एवढ्या दूर घडणाऱ्या कॉस्मिक घटना आपल्याला जेम्स वेबमुळं स्पष्टपणे पाहता येतायत.

या फोटोंसोबतच नासानं रिलीझ केलेला एक ग्राफ आहे, WASP-96b स्पेक्ट्रमचा.

WhatsApp Image 2022 07 13 at 5.50.00 PM
WASP-96b

हा ग्राफ एका ग्रहाच्या वातावरणाचा आहे, जो ग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाहेर आहे. या ग्राफमुळं तिथल्या वातावरणामधलं पाणी, धुकं आणि ढग याबद्दलचे सिग्नल मिळतायत. आपल्या सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या ग्रहावर पाण्याचे अंश सापडतायत, दुसऱ्या ग्रहमालांमधल्या वातावरणाचा अभ्यास करणं या फोटोंमुळं शक्य होणार आहे.

पण या सगळ्या फोटोजचा आपल्याला नेमका फायदा काय होणार आहे, याबाबत माहिती देताना रुचिरा सावंत सांगतात,

“हे सगळे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, एक मृत ताऱ्याभोवतीच्या नेब्युलाचा आहे, एक तारे तयार होतानाच्या नेब्युलाचा आहे. एक पाच आकाशगंगांचा आहे, एक ग्राफ आपल्या सूर्यमालेबाहेरच्या ग्रहाचा आहे, तर एक फोटो १३ बिलियन प्रकाशवर्ष लांब असलेल्या जगाचा आहे.

थोडक्यात जेम्स वेबमुळं आपल्याला प्रचंड मोठ्या पातळीवर संशोधन करता येणार आहे. जेम्स वेब टेलिस्कोपचा प्रवास हा काही वर्षांचा नाही, तर काही दशकांचा आहे आणि अनेक लोकांच्या प्रयत्नांचा आहे. जेम्स वेबमुळं आपल्याला आजवर माहीत असलेल्या जगाच्या पलीकडच्या अज्ञाताचा शोध घेता येणार आहे.

मानवाला विश्वाच्या उगमाच्या रहस्याच्या मुळाशी पोहोचवण्याचा प्रयत्न जेम्स वेब टेलिस्कोपच्या माध्यमातून होणार आहे. 

जेम्स वेबमुळं मानवाला अवकाशाबद्दल पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सोबतच आणखी नवे प्रश्न तयारही होतील.”

थोडक्यात काय, तर वर वर पाहायला हे चार फोटोज आणि ग्राफ नॉर्मल वाटत असले, तरी त्यातून विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडलं जाऊ शकतं. कदाचित नव्या जीवसृष्टीचा, वातावरणाचाही शोध लागू शकतो, ज्यामुळं आपलं भविष्य बदलू शकतं, हेही तितकंच खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.