हिटलर भारताबद्दल काय म्हटलाय ते आधी बघा मग खुशाल त्याची वकिली करा

आमच्या गण्याला सोशल मीडियावर काहीतरी वेगळं बघून नवीन ट्राय करण्याचा उगीच नाद. काहीतरी ट्रेंडिंग मधलं बघणार आणि लगेच ते ट्राय करणार. असंच एक दिवस त्याच्या मनात खूळ घुसलं हिटलरचं. ट्विटरवर एक ट्विट वाचलं आणि गण्याला नवीन हिरो मिळाला. लागलीच स्प्लेंडरवर त्यानं हिटलरचं चिन्ह लावलं.

”तुला माहितेय का हिटलर लै भारी माणूस हुता. आणि भारताबाबद्दल लै भारी बोलायचा. भारताचं स्वस्तिक त्यानं त्याच्या झेंडयावर लावलं होतं…” 

आता इतिहासात फक्त हिटलर आणि जर्मनी एवढंच आपल्याला शिकवलेलं. आणि त्यात पण त्यानं ज्या पद्धतीनं ज्यू लोकांना मारलं हे मास्तरनं सांगितलं होतं तेव्हापासून तो माणूस म्ह्णून लय घाणपडा होता, हे मनात फिक्स बसलेलं. पण त्यो भारताबद्दल काय विचार करत होता हे कळलं नाही. त्यामुळं गण्या काय म्हणत होतं ते शांतपणे ऐकण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

त्यानंतर गण्याच्या आईनं म्हणजेच आमच्या विठाकाकूनं आपलं चांगलं भगव्या रंगातलं स्वस्तिक गण्याने काळ्या रंगात आणि ते पण वाकडं लावलंय बघून चार शिव्या घालून ते गाडीवरनं काढायला लावलं ही गोष्ट वेगळी. पण हिटलर भारताचा मित्र होता. हे काय गाण्याच्या मनातनं जात नव्हतं. त्यामुळं मग म्हटलं बघावं तरी हिटलर भारताबाबद्दल काय म्हटलाय की, ज्यामुळं जग शिव्या घालत असताना देखील आमचा गण्या त्याचा एवढा फॅन झाला आहे.

मग शोधाशोधिला सुरवात झाली. आणि जेव्हा हिटलर भारताबाबद्दल काय म्हणत होता याचा शोध लागला तेव्हा गण्या पुन्हा फसलंय हेच कळलं.

तर अडॉल्फ हिटलर भारताबद्दल काय विचार करत होता हे आपल्याला पाहिलं लक्षात येतं त्याचे रेसबद्दल म्हणजेच वंशाबद्दल काय विचार होते यातून.

इथे वंशाचा अर्थ भारतीय वंशाचे, आर्य वंशाचे, निग्रो वंशाचे या अर्थाने घ्या. रेस हा हिटलरच्या नाझी आयडियॉलॉजीचा सर्वात प्रमुख भाग होता. याच्याच जीवावर त्याने आर्यन वंश हा जगातला सगळ्यात बेस्ट वंश आहे आणि प्युअर आर्यन वंशाचे लोकंच जगावर राज्य करण्यास पात्र आहेत असं खूळ जर्मन लोकांच्या डोक्यात भरून तो जग जिंकायला निघाला होता.

हिटलरला त्याचा वंशाबद्दल वाटणारा अभिमान आला होता ह्यूस्टन स्टीवर्ट चेंबरलेन या माणसाच्या लिखाणामुळं.

ह्यूस्टन स्टीवर्ट चेंबरलेन. चेंबरलेन हा एक ब्रिटीश होता पण त्याला जर्मन लोकं एवढी आवडायला लागली की तो स्वतःच जर्मन नागरिक बनला. आर्य आक्रमण सिद्धांताच्या (आर्यन इन्वेजन थेअरी) चेंबरलेनचा असा विश्वास होता की, 

‘पांढऱ्या त्वचेचे आर्य सुमारे १५०० वर्षांपूर्वी उत्तर-पश्चिमेकडून भारतीय उपखंडात दाखल झाले होते. त्यांनी आपल्या सांसारिक आणि इतर जगाच्या बाबींच्यामध्ये  आपल्या बुद्धीच्या विचारांची उंची गाठली होती. परंतु स्थानिक लोकांमध्ये मिसळून त्यांची वांशिक शुद्धता “नाश” झाली आहे,’ 

असा याचा सिद्धांत.

आता यावर कळस चढवला हिटलरचा मित्र असलेल्या अल्फ्रेड रोसेनबर्गने. 

इंजिनिअरिंग केलेल्या अल्फ्रेड रोसेनबर्गला आज कालच्या इंजिनेरींगच्या पोरांसारखं आपलं काम सोडून दुसरीच कामं करण्याचा नाद. त्याचं मग वंशाबद्दल असलेलं अगाध ज्ञान आणि तो करत असलेली जर्मनीची स्तुती पाहून हिटलर पण पिघळला आणि आपल्यापेक्षा ४ वर्षांनी लहान असूनही हिटलरनं त्याला आपलं मित्र बनवलं.

अल्फ्रेड रोझेंबर्गची थिअरी अशी होती की,

आर्यन लोकांनी आपल्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या जोरावर भारतावर ताबा मिळवला होता. आणि त्याच बरोबर भारतातले तेव्हाचे जे लोकल काळे लोकं होती त्यांच्याशी ते मिक्स झाले नाहीत. वर्ण सिस्टमच्या जोरावर त्यांनी आपली रेशिअल प्युरिटी जपली. मात्र हळू हळू हे लोक स्थानिक काळ्या लोकांशी मिक्स झाले आणि त्यांच्याशी शुद्धता संपली. आज जरी वर्ण व्यवस्था असली तरी त्यांच्यात आर्यन लोकांची वंश शुद्धता संपली. 

अगदी रोझेंबर्गच्या शब्दात सांगायचं तर 

“वांशिक प्रदूषण” मुळे आधुनिक काळातील भारतीय “पुअर बास्टर्ड्स” (poor bastards) आहेत आणि ज्यांना आर्यन  किंवा प्रोटो-आर्यन म्हणलं जाऊ शकत नाही.” 

हिटलरनं आपल्या वैचारिक गुरूंचे आणि मित्राचे हेच विचार उचलले होते. त्यामुळे भारतीय वांशिकदृष्ट्या प्रदूषित आहेत आणि ते राज्य करण्यासाठी नाही तर दुसऱ्याचा राज्याखाली राहण्यासाठीच आहेत हे हिटलरचं मत कायमच राहिलं.

भारताकडे तुच्छतेने पाहण्याचा हिटलरचा दृष्टिकोन अनेकवेळा त्याच्या भाषणातूनही दिसून आले आहेत.

१९३६ मध्ये, म्युनिकमध्ये एका राजकीय सभेला संबोधित करताना, हिटलरने म्हटले की, 

”भारतीयांना चालणे देखील शक्य नाही आणि ब्रिटिशांनी त्यांना कसे चालायचे ते शिकवले.” 

असे वैभव पुरंदरे जे ‘हिटलर अँड इंडिया: द अनटोल्ड स्टोरी ऑफ हिज हेट्रेड फॉर द कंट्री अँड इट्स पिपल’चे लेखक आहेत त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते. 

“हिटलरसाठी वंश हेच सर्व काही होते. तीच जीवनाची व्याख्या होती. ब्राऊन आणि काळ्या वंशाच्या लोकांना तो माणूसच मानत नसे.” 

असे पुरंदरे पुढे सांगतात.

अनेकवेळा जर्मन लोकांना संबोधित करताना तो, ब्रिटननं ज्याप्रकारे आपल्यापेक्षा कित्येक ट मोठा असलेला भारतासारखा महाकाय देश ताब्यात ठेवला ते शिकण्यासारखं आहे असं सांगायचा.

माईन काम्फ या आत्मचरित्रातही अनेक ठिकाणी  हिटलरने भारताविरोधात गरळ ओखलेली आहे.

जेव्हा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने सुभाषचंद्र बोस हिटलरला भेटले होते तेव्हा त्यांनीही हिटलरकडे त्याचा हा मजकूर काढून टाकण्याची विंनती केली होती. मात्र आमच्या लोकांना गुलामी मनोवृत्ती काय असते हे दाखवण्यासाठी तो उल्लेख गरजेचा आहे असं म्हणत मजकूर काढून टाकण्यास हिटलरनं नकार दिला होता.

त्याच बरोबर भारताला स्वतंत्र करण्यासाठी मदत करण्याची विनंतीही हिटलरने धुडकावून लावली होती.

हिटलरने त्याच्या कार्यकाळात अनेक भारतीयांना कोणत्याही आरोपांशिवाय त्यांचं कम्युनिस्टांशी साटंलोटं आहे असं म्हणत जेलमध्ये टाकलं होतं.

आत जेवढी मिळाले तेवढे रेफरन्स गोळा करून ही सगळी माहिती गण्याला दिली. आता आमचा गण्या तर सुधारलाय तुमचा कोणी असाच मित्र असेल तर त्याला पण ही माहिती पाठवा, बघा काय फरक पडतोय का?

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.