सांगलीतल्या आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी कधी ठरते, धोक्याची घंटा ?  

सांगलीनं आजवर अनेक महापूर पाहिलेत. कृष्णाकाठी वसलेल्या या शहराला १९१४ व १९१६ मध्ये महापुराचा फटका बसला आणि त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरवात झाली ती १४ फेब्रुवारी १९२७ मध्ये. आता या पुलाचा समग्र इतिहास वाचायचा असेल तर बोल भिडूच्या खालील लिंकवर क्लिक करा.

सांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.  

आज आपण बघूया, सांगलीतल्या आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी धोक्याची घंटा कधी ठरते ?

२००५ आणि २०१९ साली सांगलीत आलेल्या महापुराने स्थानिक नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडवली होती. २०१९ च्या पुरादरम्यान सांगलीवाडी भागातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी निघालेले १५० जण आयर्विन पुलावर अडकून पडले होते. पूर्ण रात्र या पुलावर काढल्यानंतर स्थानिक प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांसाठी सकाळी ११ वाजता बोट पाठवली होती. सांगली शहरातील जवळपास ६५  टक्के भाग पाण्याखाली गेला होता.

सध्या सांगलीच्या आयर्विन पूल पाणी पातळी ४३ फुट ७ इंच असून धोका पातळी ४५ फुट आहे.

नागरिकांवर २०१९ सारखी परिस्थिती ओढवू नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून २००५ आणि २०१९ च्या पाणी पातळीचा तुलनात्मक आढावा घेतला आहे.

२००५ च्या महापुरात २८ जुलै रोजी आयर्विन पुला जवळची पाणी पातळी ४३ फूट होती. २९ तारखेला ती ११ इंचाने वाढून ४३ फूट ११ इंच झाली. ३० जुलैला पाणी पातळी ४४ फूट होती. ती अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच १ ऑगस्टला ४६ फुटांवर गेली. आणि पुढील २४ तासांत २ ऑगस्टला पाणी पातळी ५० फूट २ इंच होऊन महापूर आला.

अवघ्या ६ दिवसांत पाणी पातळी ४३ फुटांवरून ५० फुटांवर गेली. आणि सलग २ दिवस म्हणजेच ३ व ४ ऑगस्टला पाणी पातळी ५३ फूट ९ इंचावर होती.

पाणी ५ ऑगस्ट नंतर उतरू लागलं. आणि १० ऑगस्ट २००५ ला पातळी ४० फुटांवर आली.

२००५ च्या पुरात पाणी चढायला ५ दिवस लागले. तर ४ दिवस पुरसदृश परिस्थिती जैसे थे होती. आणि पुराचं पाणी उतरायला ५ दिवस लागले.

२०१९ च्या पुरादरम्यान ६ ऑगस्टला सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी साडे ४९ फुटांहून अधिक होती. आणि अवघ्या ३ दिवसांत म्हणजेच ९ ऑगस्टला पाणी पातळी ५७ फुटांवर पोहोचली. पाणी उतरायची गती फार संथ होती.

त्यामुळे गेल्या १२ तासात कृष्णा नदीचे पाणी केवळ १ फुटाने कमी झाले होते.

कृष्णा नदीची धोक्याची पातळी ४५ फूट असून इशारा पातळी ही  ४० फूट आहे. त्यामुळे सध्याची पाणी पातळी पाहता २ फूट वाढायला तसा काही वेळ लागायचा नाही. त्यामुळं पाणी पातळी धोका पातळीच्या वर गेल्यास नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.