संजय राऊत, अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका झाली नवाब मलिक यांची कधी ?

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी ईडी आणि सीबीआयने माजी गृहमंत्री देशमुख यांना अटक केली होती. बुधवारी १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी देशमुख तुरुंगाबाहेर आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक झाली होती.

तसेच या दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी इडीने अटक केली होती. यातील संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. नवाब मलिक यांचा जामीन मात्र कोर्टानं याआधी फेटाळलाय, ९ जानेवारीला पुन्हा मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळं त्यांना दिलासा मिळणार की, त्यांची रवानगी पुन्हा एकदा कोर्टात होणार ? हा प्रश्न चर्चेत आलाय.

पण एक मुद्दा कायमच बातम्यांमध्ये असतो तो म्हणजे,नवाब मलिक यांची जेलमधून सुटका कधी होईल, सध्या कुठल्या कोर्टात त्यांची केस सुरु आहे ?

मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ ला अटक करण्यात आली होती. यानंतर मलिक यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या नंतर ७ मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालायने मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

तेव्हा पासून नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान २१ एप्रिल रोजी ईडीच्या वतीने विशेष न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात ५ हजार पानांची चार्जशीट दाखल केली होती. यात जमिनीची कागदपत्रे, जबाब, पुरावे सादर केले होते. यानंतर मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज केला होता.

मलिक यांनी नियमित जामिनाची मागणी करताना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याचीही मागणी विशेष पीएमएलए न्यायालयात केली होती. ३० नोव्हेंबर रोजी  मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. यावेळी जामीन का नाकारण्यात आला आहे याचा ४३ पानाचा तपशीलही दिला होता.

मलिक यांनी हसीना पारकर आणि सलीम पटेल यांच्याशी संगनमत करून मुनीरा प्लम्बर हिच्या मालकीची जागा बळकावल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. तसेच नवाब मलिक यांच्या वकिलाने त्यांच्या तब्बेत बिघडली आहे. त्या आधारावर जामीन मंजूर करावा अशी मागणी केली होती. मात्र ती फेटाळून लावण्यात आली आहे.

स्पेशल कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता .नबाब मलिक यांच्या जामीन अर्जावर ७ डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. 

सुनावणी दरम्यान कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला. मलिक यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ईडीला आपलं उत्तर दोन आठवड्यात दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.  यादरम्यान काही आवश्यक वाटल्यास मलिक यांना सुट्टीकालीन कोर्टात दाद मागण्याची मुभा दिली आहे.

जामिनावर तातडीची सुनावणीस नकार दिल्याने मलिक यांचा नववर्षाची सुरुवात तुरुंगातच होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी झाली. त्या दरम्यान मलिक यांच्या वतीने वकील अमित देसाई यांनी नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाल्याचे सांगितले. ते सध्या एकाच किडनीवर आहेत. तरी देखील ईडी त्यांच्या डिस्चार्जसाठी घाई करत असल्याचे सांगितले.

यावर नवाब मलिक यांची वैद्यकीय अवस्था गंभीर असेल आणि जर ते उपचार कैदेत असताना शक्य नसतील तरच तातडीची सुनावणी घेण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले होते. जर याचिकाकर्ता बऱ्याच काळापासून रूग्णालयात दाखल आहे तर घाई काय आहे? असा प्रश्न न्यायालयाने केला होता.

नवाब मलिक सध्या कुर्ला स्थित क्रिटी केअर या खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. अमित देसाई यांनी मलिक यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आम्हाला दुसऱ्या मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत असे सांगितले. पण न्यायालयाने तातडीची सुनावणी करण्यास नकार देत ६ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

तुमच्या व्यतिरिक्त इतर लोक सुद्धा आहेत ज्यांच्या अर्जावर सुनावणी करायची आहे, असेही पुढे कोर्ट म्हणाले.

याबाबत बोल भिडूशी बोलताना वकील तोसीफ शेख यांनी सांगितले की,

“कुठल्याही प्रकरणात किती दिवसात जामीन अर्ज मिळू शकेल हे सांगता येत नाही. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च सुनावणी होईल. जर अर्ज फेटाळला तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार आहे. जामीन कधी मिळेल ते आता तरी सांगता येणार नाही.”

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.