सदगुरू अचानक महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भेटी का घेवू लागलेत..?

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १२ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या भेटीचे फोटो आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील जग्गी वासुदेव भेटले. त्यांचेही फोटो ट्विटरवरून पोस्ट करण्यात आले..

सदगुरू जग्गी वासुदेव नेमकं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या गाठीभेटी का घेत आहेत, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर याचं कारण सांगण्यात येतंय जग्गी वासुदेव यांनी सुरू केलेलं एक अभियान..

सदगुरू जग्गी वासुदेव आहेत तरी कोण..? 

कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात एक तेलगू घराण्यातले जन्मलेल्या सदगुरूचं जगदिश जग्गी वासुदेव असं पूर्ण नाव. मात्र त्यांच्या अनुयायांमध्ये त्यांना ‘सद्गुरू’ म्हणून ओळखलं जातं. कारण ते एक भारतीय योगगुरू असून अध्यात्माचे पुरस्कर्ते आहेत.

१९८२ पासून ते दक्षिण भारतात योग शिकवत आहेत. 

याव्यतिरिक्त एक लेखक म्हणूनही सद्गुरू यांची ओळख आहे. त्यांच्या इनर इंजिनीअरिंग : अ योगीज गाईड टू जॉय, कर्मा : अ योगीज गाईड टू क्राफ्टिंग युवर डेस्टिनी या दोन्ही पुस्तकांना ‘द न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट सेलर’च्या यादीमध्ये स्थान मिळालं आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर ते व्याख्यान देतात. सोशल मीडिया वापरात असाल तर त्यांचा एखादा व्हिडीओ डोळ्यांसमोरून गेला नाही हे अशक्यच.आजकालचे युवक तर त्यांना मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखतात. कारण त्यांच्या वयाने भलेही साठी पार केली असेल मात्र वेगवेगळ्या आधुनिक विषयांवर त्यांची पकड आणि त्याला धरून त्यांचं समुपदेशन तरुण पिढीलाही अपील होतं.

त्यांनी १९९२ साली कोयंबटूरजवळ ईशा फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या मार्फत ते शैक्षणिक उपक्रम राबविणारं आश्रम आणि योग केंद्र चालवतात.

थोडक्यात असं म्हणलं जातं कि,

इशा फाऊंडेशन ही लोकहितासाठी काम करणारी संस्था आहे, जी योग शिबीर चालवते. इशा फाऊंडेशन भारतात तर आहेच तसेच अमेरिका, इंग्लंड, लेबनन, सिंगापूर आणि आस्ट्रेलिया या देशातही योगा शिकविते. सद्गुरू भारतात तर फेमस झालेच तसेच विदेशात ही झालेत.

ईशा फाउंडेशनमार्फत अनेक पर्यावरणीय कार्यक्रम देखील आखले जातात. ‘ग्रीन हँड्स प्रोजेक्ट’ हा त्यांचा पर्यावरणविषयक प्रस्ताव आहे. त्यामार्फत तामिळनाडूमध्ये सुमारे १६ कोटी झाडं लावण्याचं उद्दीष्ट आहे. त्यांच्या अनुयायांसोबत आजवर त्यांनी ८२ लाखांहून जास्त रोपं लावली आहेत. 

तर १७ ऑक्टोबर २००६ रोजी या संस्थेने तामिळनाडूतील २७ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ८.५२ लाख रोपांची लागवड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.

पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल २००८ सालचा इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक कल्याणातील त्यांचं योगदान बघता त्यांना २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’ हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार देऊन सद्गुरूंना गौरविण्यात आलं होतं.

इंडियन एक्सप्रेसच्या २०१२ मधील १०० सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत ते ९२ व्या स्थानावर होते, आणि इंडिया टुडेच्या २०१९ मधील पन्नास सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीमध्ये चाळिसाव्या क्रमांकावर होते.

असं असलं तरी त्यांच्यावर अनेक आरोप देखील झाले आहेत. 

वासुदेव यांनी १९८४ मध्ये विजया कुमारी यांच्याशी लग्न केलं होतं. २२ जानेवारी १९९७ रोजी, विजया यांचे ईशा योग केंद्रात निधन झालं. त्यावेळी वासुदेव यांच्या विरुद्ध विजया यांच्या आई-वडिलांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

अंधश्रद्धेला चालना देणं आणि विज्ञानाचा चुकीचा अर्थ लावणं, असा आरोपही वासुदेवांवर ठेवण्यात आला आहे. त्यांनी या गोष्टीचा प्रसार केला की, चंद्रग्रहणाच्या वेळी शिजवलेल्या अन्नामुळे मानवी शरीरातील प्राणिक ऊर्जा नष्ट होते. हिग्ज बोसॉन आणि विभूती यांच्या कथित फायद्यांविषयीची त्यांची मतं विज्ञानाने अप्रमाणित म्हणून नाकारली आहेत.

काहींचं असं देखील म्हणणं आहे की,

जग्गी वासुदेव भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाची विचारसरणी फॉलो करतात आणि ते माध्यमांमध्ये ‘असहिष्णु राष्ट्रवादी’ भूमिका दाखवतात.

वासुदेव यांनी २०१९ बालाकोट हवाई हल्ला, सर्वसमावेशक जीएसटी लागू करणं आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा, २०१९ च्या बाजूने समर्थनार्थी भाष्य केलं तर थुथुकुडी आंदोलन हे उद्योगासाठी धोकादायक नाही, असं म्हटलं होतं.

२२ आणि २३ मे २०१८ रोजी तमिळनाडूतील थुथुकुडी इथे स्टरलाइट कॉर्पोरेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या तांब्याच्या स्मेल्टर प्लांटच्या उभारणी विरोधातआंदोलन झालं होतं. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला ज्यात १३ जणांचा मृत्यू झाला तर १०२ जण जखमी झाले होते. या हिंसाचाराचं समर्थन त्यांनी केल्याचा आरोप आहे.

डाव्या विचारसरणीच्या उदारमतवाद्यांवर वासुदेव यांनी काश्मीरमधील दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. शिवाय जेएनयूच्या राजद्रोहाच्या वादादरम्यान कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना तुरूंगात डांबण्यात यावं, असं म्हणाले होते. त्यामुळे राजकारण आणि इतिहासाबद्दलच्या त्याच्या आकलनावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.

इतकंच काय त्यांनी १५० एकर जमिनीवर उभारलेलं इशा फाउंडेशन देखील बेकायदेशीर असल्याचा आरोप केला जातो.

त्यांच्या संस्था आणि इतर कार्यक्रमांवर पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कित्येक आरोप केलेत, कर्नाटक उच्च न्यायालयातही एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, हायकोर्टाने असा निर्णयही दिला की फाउंडेशनला त्यांच्या  निधी उभारणीच्या पद्धतींचा तपशील जाहीर करण्याची आवश्यकता आहे, पण त्याचे पुढे काय झाले याची माहिती नाही.

नेहमी वादग्रस्त राहिलेले सद्गुरू पर्यावरणाच्या बाबतीत आग्रही दिसले आहेत.

सध्या ते ‘रॅली फॉर रिव्हर’ म्हणून नद्यांच्या संवर्धनासाठी प्रचार करत आहेत. सोबतच त्यांनी याचवर्षी ‘माती वाचवा’ ही मोहीम सुरु केली आहे. 

काय आहे माती वाचवा मोहीम?

मातीला ऱ्हासापासून वाचवण्यासाठी, तिची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी माती वाचवा अभियान सुरू केलं आहे. मार्चपासून सद्गुरू १०० दिवसांचा बाईक प्रवास करत आहेत. सद्गुरू आणि टीमच्या सदस्यांनी लंडनहून याची सुरुवात केली आहे. जवळपास २७ देश यामध्ये कव्हर केले आहेत.

त्यांचे अनुयायी देखील याबद्दल इतरांना जागृत करत आहेत. मार्चला सुरु झालेल्या या यात्रेची सांगता २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनी कावेरी खोऱ्यात होणार आहे. 

सद्गुरू सांगतात…

“मातीची गुणवत्ता टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यात खनिजांचं प्रमाण कमी होऊ नये. कारण असं झालं तर जागतिक उत्पन्नावर आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नपदार्थांच्या उपलब्धतेवर मोठ्या परिणाम होऊ शकतो.”

“भारताबद्दल सांगायचं तर भारतातील सुमारे ३०% सुपीक जमीन आधीच ओसाड आणि नापीक झाली आहे. अशा वाळवंटीकरणामुळे २०४५ पर्यंत अन्नधान्य उत्पादनात ४० टक्के घट होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेनं दिला आहे. आणि जर अशीच जमिनीची दुर्दशा चालू राहिली, तर २०५० पर्यंत ९० टक्के पृथ्वी वाळवंटात बदलू शकते” असं सद्गुरूंनी सांगितलं. 

हे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ‘माती वाचवा चळवळ’ सुरु केली. मातीकडे लक्ष वेधणं, सरकारमध्ये आवश्यक निधी जमा करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, हा या चळवळीचा उद्देश आहे.

भेट दिलेल्या सर्व देशातील धोरणकर्त्यांसोबत त्यांनी बैठका घेतल्या. त्यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले असून आतापर्यंत ७४ देशांनी घोषणा केली आहे की ते आमच्या सेव्ह सॉईल हँडबुकनुसार पुढे जातील, असं सद्गुरूंनी सांगितलं आहे.

हाच प्लॅन घेऊन सद्गुरू सध्या यूरोप आणि पश्चिम आशियातील अनेक देशांमधून प्रवास करत भारतात परतले आहेत. इथे येऊन त्यांनी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देत त्यांची पुस्तिका देणं सुरु केलं आहे आणि राज्यांना त्यांच्या उपक्रमात ते सामील करून घेत आहेत. 

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी मोदींनी त्यांच्या मोहिमेत सोबत असल्याचं सांगितलं. राजस्थान, गुजरात, भोपाळ, युपी, मध्यप्रदेशनंतर आता १२ जूनला ते पोहोचले मुंबईत….

याठिकाणी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ दरम्यान अनेक दिग्गजांशी संवाद साधला. यावेळी ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘ईशा फाऊंडेशन’ यांच्या दरम्यान पर्यावरण संवर्धन, अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती तंत्र आणि इतर उपक्रमावर सक्रियपणे सहकार्य करण्यासाठी एकत्र काम करण्या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

तेव्हा आता या करारांतर्गत कोणते बदल येत्या काळात बघायला मिळतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.