विध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण ? उत्तर नागनाथ कोत्तापल्ले सर !

शिक्षण व साहित्य क्षेत्रात मोठं काम असलेले ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. मागच्या 15 दिवसांपासून ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात होते. मराठी साहित्य क्षेत्रात कोत्तापल्ले यांचं असलेलं योगदान हे उल्लेखनीय आहे.

केवळ एक लेखक नाही तर ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड या गावात २९ मार्च १९४८ रोजी नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म झाला. कोत्तापल्ले यांचे वडील लालुजीराव हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. सातत्याने त्यांच्या बदल्या होत असत. त्यामुळे सरांना एका जागी स्थिर पणे शिक्षण घेता आलं नाही.

मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी बीडमधल्या बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबादला आले आणि औरंगाबाद विद्यापीठामध्ये त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. नोकरी करत असतानाच 1980 मध्ये त्यांनी मराठी साहित्यामध्ये पी एच डी केली.

औरंगाबाद विद्यापीठात नोकरीनंतर 1993 च्या दरम्यान पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. पुणे विद्यापीठात कार्यरत असतानाच त्यांची औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कुलगूरूपदी नेमणूक झाली होती.

विद्यार्थ्यांच्या समस्यांची त्यांना चांगलीच जाण होती.

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिलेत. विशेषत: जे विद्यार्थी घरापासून दूर शिक्षणासाठी एकटे राहत त्यांच्याविषयी त्यांना विशेष कळवळा होता. कोत्तापल्ले 1969 ते 1971 दरम्यान पदव्युत्तर शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरीही केली होती.

नोकरीतून मिळणाऱ्या पैश्यांवर ते स्वत:चा शैक्षणिक व वैयक्तित खर्च चालवत असत. नोकरी करून शिक्षण घेतल्यामुळे त्यांना गावातून, घरापासून लांब राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी चांगल्याच माहिती होत्या.

या विद्यार्थ्यांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पैश्यांची. नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी, अश्या विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी आणि घरापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करून घेतली.

त्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले होते. ही वाढ विद्यार्थ्यांसाठी फार गरजेची होती. अनेक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळेच, नागनाथ कोत्तापल्ले यांना त्यांचे विद्यार्थी लेखक किंवा विचारवंत म्हणुन नाही तर ‘कोत्तापल्ले सर’ म्हणुनच जास्त चांगल्याप्रकारे ओळखतात.

साहित्यातील योगदान :

नागनाथ कोत्तापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. हा ग्रंथ ज्योतिबा फुले यांचं सामाजिक भान, परिवर्तनवादी विचार आणि पुढारलेपणा अगदी अचूकपणे दाखवतो. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ या कादंबऱ्या मनाला भिडणाऱ्या अन् विचार करायला लावणाऱ्या आहेत. ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या कोत्तापल्ले यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत.

86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भुषवलंय. त्यांच्या विद्रोही स्वभावाविषयी बोलाचं झालं तर, आणीबाणीच्या काळात त्यांना राज्य शासनाने जाहीर केलेला पुरस्कार त्यांनी नाकारला होता. सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्यंगचित्रकार आणि संवाद लेखक शरद जोशी यांनी ज्यावेळी जागतिकीकरणाचं समर्थन केलं होतं त्यावेळी कोत्तापल्ले यांनी त्यांचा जोरदार विरोध केला होता.

त्यांना आजवर मिळालेल्या पुरस्कारांचा विचार करायचा झाला तर, त्यांच्या 5 वेगवेगळ्या साहित्याविष्कारांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालाय. याशिवाय, केशवराव विचारे परितोषिक, बी. रघुनाथ पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, ग्रामीण साहित्याचा परिमल पुरस्कार यांच्यासह अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.

एकंदरीत, जीवनप्रवास पाहिला तर नागनाथ कोत्तापल्ले हे सामाजिक भान असलेले, शिक्षणावर प्रेम करणारे, आपलं मत रोखठोक आणि निर्भिडपणे मांडणारे लेखक होते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.